You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सर्दी खोकल्यासाठी औषधं घ्यावीत की आजीबाईंचा बटवाच फायदेशीर?
सध्या हवा बदलतेय. सकाळी गारवा असतो, दुपारी उन तर संध्याकाळी उगाच पाऊस येईलसं वाटतं. अशा बदलत्या वातावरणात सर्दी खोकल्याचा त्रास झाला नाही तरच नवल.
बरेच जण घरातली लहान मुलं आणि ज्येष्ठ यांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपायोजना करतात.
काय असतं त्यात?
लिंबू, मध यासारख्या आपल्याला माहिती असलेल्या आजीबाईंच्या बटव्यातल्या उपायांचा त्यात समावेश असतो.
बीबीसीची विशेष सीरिज 'द ट्रुथ अबाउट'मध्ये डॉ. ख्रिस व्हॅन टुलकेन यांनी सर्दी खोकल्याची औषधं तसंच घरगुती उपाय यात जास्त परिणामकारक काय याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
खोकला दूर करणाऱ्या कफ सीरपचा घशाच्या आतल्या बाजूच्या रिसेप्टर्सवर एक थर बसतो. यामुळे घशाची खवखव कमी होते. म्हणूनच अनेक कफ सीरप दाट असतात.
डॉ. व्हॅन त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगतात. एकदा खोकला झालेला असताना त्यांच्या आईने त्यांना गरम पाणी, लिंबू आणि मध यांचा काढा पाजला.
वैद्यकीय शिक्षण घ्यायला लागल्यावर त्यांचा घरगुती उपचारांवर त्यांचा विश्वास हळूहळू कमी होऊ लागला.
त्याबद्दल आणखी माहिती घ्यायला डॉ. व्हॅन ब्रिटनच्या हॉल विद्यापीठात पोहचले.
तिथे त्यांची भेट कार्डिओव्हॅस्क्युलर आणि मेटाबॉलिक रिसर्च सेंटरमध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञ एलिन मॉरिस यांच्याशी झाली.
त्यांनी व्हॅन यांना व्होडका आणि मिरची खायला दिली. त्याचा त्यांना जोरात ठसका लागला. मग मॉरिस यांनी व्हॅनना लिंबू आणि मधाचा काढा दिला.
त्याचा परिणाम झाला आणि खोकला थांबताच व्हॅन म्हणाले, "अरे हा तर चमत्कार आहे."
'कफ सीरप' परिणामकारक असतात?
डॉ. व्हॅन यांनी सर्रास वापरल्या जाणाऱ्या तीन कप सीरप्सचाही अभ्यास केला. या तिन्ही सीरप्समध्ये ग्वेफिनेसन, डेक्सट्रोमैथॉर्फेन आणि स्यूडोफेडरीन असे घटक असतात.
पण या औषधांचा अभ्यास केल्यानंतर ही औषधं घेऊ नका, असा सल्ला डॉ. व्हॅन देतात.
पण प्रोफेसर एलिन सांगतात की, "माझ्यामते बाहेर मिळणारी बाटलीबंद औषधं लिंबू-मधाच्या काढ्यापेक्षा जास्त परिणामकारक आहेत, असं सिद्ध करणारे फारसे पुरावे नाहीत. पण लिंबू-मधाच्या काढ्याचा फायदा असा असतो की त्यात कोणत्याही प्रकारची कृत्रिम रसायनं नसतात. त्यामुळे तो काढा कितीही पिता येतो. अपाय होत नाही."
सर्दी-खोकल्याबरोबरच ताप असेल तर?
सर्दी-खोकल्याबरोबरच ताप आला तर लोक सगळ्यांत आधी तापाचं औषधं घेतात.
डॉ. व्हॅन सांगतात की ताप उतरावा म्हणून ज्या गोळ्या दिल्या जातात त्यात पॅरासिटामॉल, ब्रुफेन आणि डिकंजेस्टंट.
श्वास घ्यायला त्रास होत असेल तर तो त्रास डिकंजेस्टंटमुळे कमी होतो आणि ब्रुफेनने वेदना कमी होतात.
त्यामुळे डॉ. व्हॅन यांचं म्हणणं आहे की सर्दी, खोकला आणि तापाचे विषाणू वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करतात. त्यामुळे एकच औषध सगळ्या लोकांना उपयोगी पडेल असं अजिबात नाही.
उदाहरणार्थ, जर श्वास घ्यायला त्रास होत नसेल तर डिकंजेस्टंटची गरज नाही. पण डोक दुखत असेल तर 'पेनकिलर' घेता येते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)