माणसाचा बेस्ट फ्रेंड असा ठरणार आफ्रिकेतल्या तस्करांसाठी कर्दनकाळ

प्रशिक्षित कुत्रे

फोटो स्रोत, WWF

कुत्र्याला माणसाचा बेस्ट फ्रेंड म्हटलं गेलंय. पण हाच बेस्ट फ्रेंड आफ्रिकेतल्या तस्करांसाठी मात्र दु:स्वप्न ठरण्याच्या तयारीत आहे.

केनियाच्या मोम्बासा बंदरात एका नवीन पद्धतीची प्रात्यक्षिकं घेण्यात आली. आफ्रिकेतलं हे जंगल हस्तिदंताच्या तस्करीसाठी ओळखलं जातं. 2009 ते 2014 या कालावधीत एकूण 18,000 किलो हस्तिदंत जप्त करण्यात आले, असं एका अहवालात समोर आलं आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात हस्तिदंत मिळवण्यासाठी 2400 हत्तींना आपला जीव गमवावा लागला असेल, असं या अहवालात म्हटलं आहे.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता या खास श्वानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नवीन पद्धतीत, हस्तिदंत, गेंड्याची शिंग किंवा इतर अनधिकृत जंगली उत्पादनं ज्या मोठ्या कंटेनरमधून तस्करी केली जाते, त्या कंटेनरचा हे श्वान वास घेऊन काही प्रतिबंधित वस्तू शोधून काढू शकतात.

प्रशिक्षित कुत्रे

फोटो स्रोत, WWF

"ही पद्धत गेम चेंजर ठरू शकते. यामुळे दक्षिण पूर्व आशियासारख्या परदेशांतील मार्केटमध्ये लुप्तप्राय प्राण्यांच्या अवयवांची तस्करी कमी होऊ शकते," असं पर्यावरण संरक्षक ड्रीव मॅक्वे सांगतात.

"कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता अतुलनीय असते. ते 40 फूट कंटेनरमधील लहानातल्या लहान तुकड्यालाही बारकाईने हुंगू शकतात. प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करण्यासाठी संघटित गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. असं असलं तरी याला पायबंद घालण्यासाठी आपण सतत परिश्रम घेणं गरजेचं आहे," मॅक्वे पुढे सांगतात.

अशी आहे योजना...

Remote Air Sampling for Canine Olfaction (Rasco) या पद्धतीत कंटेनरमधली हवा शोषून तिला फिल्टरमधून पास केलं जाईल. नंतर हे फिल्टर प्रशिक्षित कुत्र्यांसमोर ठेवले जातील. त्यातून काही संशयास्पद वास आला तर कुत्रा खाली बसेल.

संशयास्पद वास म्हणजे एखाद्या हाडाचा, शिंगाचा, कातडीचा किंवा मौल्यवान लाकडांचाही.

ही मोहीम जागतिक प्राणी संवर्धन गट WWF, जंगली प्राण्यांच्या व्यापारावर लक्ष ठेवणारी यंत्रणा Traffic आणि Kenya Wildlife Service (KWS) यांच्या संयुक्त विद्यमानं चालवली जाते.

या मोहिमेअंतर्गत मोम्बासा बंदरातून दररोज जाणाऱ्या 2,000 कंटेनरची कुत्र्यांकडून तपासणी केली जाईल.

प्रशिक्षित कुत्रे

फोटो स्रोत, WWF

यापूर्वी त्यांना एक-एक करून अशा कंटेनर्सची तपासणी करावी लागायची. आफ्रिकेतल्या आग ओकणाऱ्या सूर्यामुळे हे कठीण काम होतं.

गेल्या 6 महिन्यांत या नव्या पद्धतीमुळे 26 वेळा तस्करी रोखण्यात यश आलं आहे. यामुळे वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या या बेकायदेशीर तस्करी माफियांना चपराक बसणार आहे.

पण जास्त वेळ नाहीये.

WWF या संघटनेचं म्हणणं आहे की आता फक्त 25,000 काळे आणि पांढरे गेंडे शिल्लक आहेत. गेल्या वर्षी तर एकट्या दक्षिण आफ्रिकेत 1,000 गेंड्याची शिकार झाली होती.

काही संवर्धनकर्त्यांनुसार तर हस्तिदंतांसाठी दररोज साधारण 55 आफ्रिकन हत्तींना मारलं जात आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)