इंडोनेशिया : लाँबॉक बेटावरील भूकंपात 14 ठार

इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती.

इंडोनेशियात पर्यटनासाठी सुप्रसिद्ध असलेल्या लाँबॉक या बेटाला बसलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी स्थानिक वेळेनुसार, 7 वाजता या बेटाला 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला.

बालीच्या पूर्वेला 40 किलोमीटर अंतरावर हे बेट वसलं आहे. देखणे सागर किनारे आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असल्यानं हे बेट जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. या भूकंपाच्या धक्क्यात 160 जण जखमी झाले असून हजारो घरांचं नुकसान झालं आहे. अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली.

इथल्या माऊंट रिनजानी या पर्वतावर ट्रेकिंगला गेलेल्या एका पर्यटकाचा या धक्क्यानंतर मृत्यू झाला. उत्तर लाँबॉकमधल्या मातारम शहराच्या उत्तर-पूर्वेला 50 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती US जिओलॉजीकल सर्व्हे या संस्थेनं दिली.

या भूकंपाच्या धक्क्यानंतर 60 छोट्या-मोठ्या भूकंपाची मालिकाच या भागात झाली. यात 5.7 रिश्टर स्केल तिव्रतेचा एक मोठा भूकंपही झाला.

इंडोनेशियाच्या आपत्कालीन यंत्रणेचे प्रवक्ते सुटोपो पुर्वो नुग्रोहो यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. ते सांगतात, "घराच्या भींतीचे छत, विटा कोसळल्यानंतर काहींचा मृत्यू झाला. जखमींवर उपचार अजूनही सुरू आहे. जखमींना ढिगाऱ्याखालून काढणे हे काम प्राधान्याने करत आहोत."

इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसलेल्या ठिकाणांचा नकाशा
फोटो कॅप्शन, इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसलेल्या ठिकाणांचा नकाशा

नुग्रोहो यांनी या भूकंपानंतर झालेल्या परिस्थितीचे फोटो ट्विटरद्वारे प्रसिद्धही केले आहेत.

"या भूकंपाची तिव्रता अधिक होती. बेटावरचे सगळेच पर्यटक घाबरले आणि हॉटेलमधून बाहेर पडले," असं इंडोनेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रतिनिधी लालू मोहम्मद इक्बाल यांनी बीबीसी इंडोनेशियासोबत बोलताना सांगितलं.

इंडोनेशियातल्या लाँबॉक बेटाला भूकंपाचा जोरदार धक्का बसल्यानंतर झालेली स्थिती

फोटो स्रोत, Reuters

बीबीसी मराठीचे प्रतिनिधी विनायक गायकवाड हे लाँबॉक बेटापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गिली ट्रोवाँगन या बेटावर आहेत.

विनायक यांनी माहिती देताना सांगितलं की, "भूकंपाचे धक्के खूप जोरदार होते. हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमधल्या पाण्यावरही लाटांसारखे तरंग उठले. माझ्यासह इतर एक पर्यटकांचा गट लगेचच धावत हॉटेलबाहेर पडला. भूकंपाच्या अर्ध्या तासानंतर पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. स्थानिक नागरिक यावेळी सर्वाधिक घाबरले होते. कारण, त्यांच्या हॉटेलांचं बांधकाम लाकूड आणि बांबूंचं आहे. पण, त्याहूनही अधिक पर्यटक घाबरलेले दिसले."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)