You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उडणाऱ्या टॅक्सी : रोल्स रॉयस, गुगल लागले कामाला
लोकलची गर्दी, रस्त्यावरचं ट्रॅफिक यातून मार्ग काढत ऑफीसला येण्याचं दिव्य रोजच पार पाडणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कारण येत्या काही दशकात रस्त्याने नाही तर हवेतून उडत ऑफिसला येता येईल, अशी उडती टॅक्सी निर्माण करण्यासाठी विविध कंपन्या प्रयत्न करत आहेत.
रोल्स रॉयस या कंपनीने एक इंजिन बनवलं आहे. हे इंजिन अशा उडत्या टॅक्सीसाठी प्रोप्लशन सिस्टिम म्हणून काम करू शकणार आहे.
या शोधामुळे येत्या काही वर्षांत उडत्या टॅक्सीने ऑफिसला येणं शक्य होईल, असं या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं.
या कंपनीने Electric Vertical Take-off and Landing (EVTOL) या योजनेची तयारी केली आहे. या टॅक्सीमध्ये चार ते पाच लोक बसू शकतील.
ही टॅक्सीचा वेग 402 किमी प्रतितास असेल. ही टॅक्सी तयार करण्यासाठी रोल्स रॉयस कंपनीने इतर कंपन्यांचीही मदत घेतली आहे.
या आठवड्यात होणाऱ्या फार्नबोरो एअर शोच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या इलेक्ट्रिकल टीमचे प्रमुख रॉब वॅटसन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, "वैयक्तिक हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात आम्ही आघाडी घेतली आहे. यासाठी इतरही काही कंपन्यांची मदत घेत आहोत."
उडत्या कार आतापर्यंत फक्त सायन्स फिक्शनचाच भाग होता. आता या उडत्या कारच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक कंपन्या काम करत आहेत.
एअरबस, उबर आणि गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी गुंतवणूक केलेल्या किटी हॉक या कंपन्यांनीसुद्धा अशा प्रकारच्या प्रकल्पांची घोषणा केली आहे.
रोल्स म्हणाले, EVTOL तंत्रात गॅस टर्बाईनमधून सहा इलेक्ट्रिक प्रोपल्सरसाठी उर्जा निर्माण होईल. त्यामुळे या गाडीचा आवाज कमी होण्यास मदत होईल.
या गाडीचे पंख 90 अंशापर्यंत वाकू शकतील. त्यामुळे ही गाडी उडायला किंवा लॅंड होण्यासाठी मदत होईल. ही गाडी सध्या अस्तित्वात असलेले हेलिपॅड किंवा विमानतळं वापरू शकते.
"आम्ही आता जे काम करतोय त्यानुसार ही उडणारी गाडी 2020पर्यंत तयार होईल. व्यवहारिक पातळीवरचे विषय मार्गी लागणे महत्त्वाचा मुद्दा आहे," असं ते म्हणाले.
फार्नबोरो येथे होणाऱ्या शोमध्ये याबाबत अधिक माहिती देण्यात येणार आहे. एअरफ्रेम मेकर आणि इलेक्ट्रिकल सिस्टीमच्या विविध गोष्टींसाठी भागीदारांच्या विचार केल जाणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)