थायलंड : गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवणारा मराठी इंजिनिअर

थायलंड बचाव मोहीम, किर्लोस्कर लिमिटेड, भारत

फोटो स्रोत, KBL लिमिटेड

फोटो कॅप्शन, थायलंड बचाव मोहिमेत सहभागी झालेली भारती टीम
    • Author, स्वाती पाटील राजगोळकर आणि ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

थायलंडमध्ये गुहेत अडकलेली सगळी मुलं रविवारी सुखरुप बाहेर आली आणि त्यामुळे जगभरात सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अगदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून सगळ्यांनीच मोहीम राबवणाऱ्यांचं कौतुक केलं.

भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे थायलंडच्या या बचाव मोहिमेत महाराष्ट्राच्या किर्लोस्कर कंपनीचे पंप वापरण्यात आले आणि ते वापरण्यासाठी कंपनीची पाच जणांची टीमही आठवडाभर तिथे होती. या मदतीसाठी थायलंडच्या राजांनी भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याला पत्र पाठवून त्यांचे आभार मानले आहेत.

ही मदत थायलंड सरकारच्या बोलावण्यावरून करण्यात आली.

थायलंडला गेलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कंपनीचे डिझाईन हेड आणि सध्या आंतरराष्ट्रीय विक्री विभाग सांभाळणारे प्रसाद कुलकर्णी आणि श्याम शुक्ला हे भारतातून तिथ गेले. तर इंग्लंडमधून फिलीप डेलेनी आणि थायलंडमध्येच असलेले रेमको ड्युबॉईस आणि अँडिसन जिंदापून होते.

अवघड आणि खडतर बचाव मोहीम

23 जूनला अचानक गुहेत 11 मुलं आणि त्यांच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक असे 13 जण अडकल्याची बातमी आली. ताम लुआंग नावाच्या गुहेत 11 ते 16 वयोगटातली 11 मुलं अडकली होती.

बाहेर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे त्यांना बाहेर पडणं मुश्कील झालं होतं. पावसाचं प्रमाण हळूहळू इतकं वाढलं की त्यांना बाहेर काढायला महिने लागतील अशी भीती व्यक्त होऊ लागली.

थायलंड बचाव मोहीम, किर्लोस्कर लिमिटेड, भारत

फोटो स्रोत, KBL लिमिटेड

फोटो कॅप्शन, बचाव कार्याची आखणी करताना भारतीय टीम

अशा वेळी थायलंड सरकार आणि लष्कराने तातडीने थायलंडमधल्या भारतीय दूतावासाला पत्र पाठवून महाराष्ट्रातल्या किर्लोस्कर कंपनीची मदत मागितली. कंपनीचे पाण्याचा उपसा करणारे पंप त्यांना बचाव कार्यासाठी हवे होते.

किर्लोस्कर कंपनीची एक शाखा थायलंडमध्येही आहे. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन बचावासाठी एक कार्यक्रम आखला.

कुठल्या प्रकारची यंत्र लागतील आणि ती वापरणारे तज्ज्ञ यांचा आढावा घेऊन पाच जणांची एक टीम तयार करण्यात आली.

थायलंड लष्कराच्या अधिपत्याखाली ही मोहीम पार पडणार होती. मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली गुहेतल्या पाण्याचा उपसा करण्याचं काम सुरू झालं.

मुलांच्या बचावासाठी गुहेत जाणारे सैनिक

फोटो स्रोत, Twitter/ElonMusk

सतत कोसळणारा पाऊस आणि वादळ यामुळे ही मोहीम खडतर होती. शिवाय गुहेत खूप आतपर्यंत पाणी साचलं होतं.

कशी पार पडली मोहीम?

मुलांच्या सुटकेसाठी थायलंड लष्कराला जगभरातून मदत मिळत होती. जागतिक स्तरावरचे पाणबुडे सतत मुलांच्या संपर्कात होते. त्यांना जेवण पुरवलं जात होतं, वैद्यकीय मदतही दिली जात होती. प्रश्न होता त्यांना बाहेर काढण्याचा.

मुलांच्या बचावासाठी गुहेत जाणारे सैनिक

फोटो स्रोत, AFP/Getty

"मोहीम लगेच सुरू करायची होती. त्यामुळे पाच जुलैलाच आम्ही थायलंडला पोहोचलो. गुहेतून पाणी काढण्यासाठी तांत्रिक सहकार्य आणि मोहिमेला मार्गदर्शन करणं हे मुख्य काम होतं", या भारतीय पथकाचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी टाईम्स नेटवर्कला माहिती देताना सांगितलं.

"पण, गुहा मोठी होती आणि आत अनेक तीव्र वळणं होती. शिवाय जमीन समतल नव्हती. चढ-उतार होते. अशा वेळी गुहेत सगळीकडे पोहोचणं कठीण होऊन बसलं होतं",

बचाव कार्य सुरू झाल्यानंतरही बाहेर अतिवृष्टी आणि वादळ सुरूच होतं. त्यामुळे पाणी पातळी कमी होईना. त्यामुळे स्कुबा डायव्हर्सचे मुलांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्नही अनेकदा अपयशी ठरले.

त्याविषयी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, ''दुसरी समस्या होती अंधार आणि तिथल्या बाष्पाची. त्यामुळे पाऊस थांबला तरी काम आणखी अवघड व्हायचं. त्यात वीजपुरवठा अनियमित झाला."

"कमी क्षमतेचे उपसा पंप वापरण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळेच काही पंप आम्ही खास भारतातून नेले", असं ते म्हणाले.

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ‘त्या मुलांना आम्ही वाचवू शकू असं वाटलं नव्हतं’

गुहेतून पाणी उपसण्याचं महत्त्वाचं काम प्रसाद कुलकर्णी यांच्या टीमने केलं. नऊ दिवस ही मोहीम चालली.

थायलंड सरकारचं प्रशस्तीपत्र

अख्ख्या जगाचं लक्ष या मोहिमेकडे होतं. सर्वच्या सर्व मुलं सुखरुप बाहेर पडल्यामुळे मोहीम यशस्वीही झाली.

थायलंड सरकारने ही मोहीम सुरू असतानाच भारतीय पथकाने दिलेल्या योगदानासाठी टीमचे आणि भारत सरकारचेही आभार मानले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तसं पत्रच थायलंड सरकारने पाठवलं आहे.

थायलंड बचाव मोहीम, किर्लोस्कर लिमिटेड, भारत

फोटो स्रोत, भारतीय दूतावास

फोटो कॅप्शन, थायलंड सरकारने भारतीय टीमचे आभार मानले

खरं म्हणजे यापूर्वीही भारताने पूर परिस्थिती हाताळताना थायलंडला मदत केली आहे. थांग लुआंग गुहा आहे तो प्रांतच मुळात भरपूर पावसाचा आहे.

2011मध्ये जेव्हा थायलंडला पुराने वेढलं होतं तेव्हाही भारत सरकार आणि किर्लोस्कर कंपनीने उपसा पंपांबरोबर तांत्रिक सहकार्य केलं होतं.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)