'हो, माझ्या अंगावर केस आहेत'

फोटो स्रोत, BILLIE ON UNSPLASH
"माझ्या शरीरावर केस आहेत. ते तर प्रत्येकाला असतातच."
एका साध्याशा वाक्यामुळे अमेरिकेत या आठवड्यात सोशल मीडियावर एका मोठ्या चर्चेला उधाण आलं आहे.
एका रेझर कंपनीनं केलेल्या एका जाहिरातीत काही महिला शरीरावरील केस रेझरद्वारे काढताना दाखवण्यात आल्या आहेत. यामुळे खरं तर या चर्चेला सुरुवात झाली आणि सगळ्यांनी या कंपनीचं कौतुक केलं.
या जाहिरातीत काही फार जगावेगळी गोष्ट नाही, अपवाद एकच. या जाहिरातील्या मॉडेल्सच्या अंगावर केस दाखवले आहेत. सहसा रेझरच्या जाहिरातींमध्ये, भले मग ते स्त्रियांसाठी का बनवले असेना, महिलांचे पाय एकही केस नसणारे, गुळगुळीत दाखवले जातात.
ही जाहिरात बिली या प्रसिद्ध रेझर कंपनीकडून करण्यात आली आहे. या कंपनीनं सांगितल्याप्रमाणे, गेल्या १०० वर्षांत केस असलेल्या महिला प्रथमच एखाद्या जाहिरातीत दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच ही जाहिरात सगळीकडे पसरली.
'हे सॉल्लिड आहे'
या जाहिरातीमध्ये महिलांच्या केस असलेल्या पायांचे, हातांचे, भुवयांचे, पोटाचे जवळून घेतलेले फोटो वापरण्यात आले आहेत. सोशल मीडियावर महिलांनी या फोटोंचं जोरदार कौतुक केलं आहे.
"हे सॉल्लिड आहे", अशी प्रतिक्रिया इन्स्टाग्रामवरील @bigparadethroughtown या हँडलवरून देण्यात आली आहे. तर, "मला रेझर आवडत नाही. पण, ही जाहिरात खूपच भारी आहे," @hanguk0 असं या इन्स्टा हँडलवरून एका महिलेनं सांगितलं आहे.
याबाबत ग्लॅमर मॅगझीनसोबत बोलताना बिली रेझरच्या सह-संस्थापक जॉर्जिना गुली म्हणाल्या की, "जेव्हा एखादा ब्रँड सगळ्या महिलांना केस नाहीत असं खोटं खोटं दाखवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो एकप्रकारे बॉडी शेमिंगचाच प्रकार असतो. त्यामुळे शरीरावर केस असणं प्रचंड लाजिरवाणं आहे हे असा वाईट संदेश जाऊ शकतो."
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
या जाहिरातीबरोबरच बिली या ब्रँडनं काही फोटोही ऑनलाईन माध्यमांवर प्रसारित केले आहेत. हे फोटो त्यांनी सगळ्यांसाठी मोफत उपलब्धही करून दिले आहेत.
एका बाजूला या कंपनीला त्यांच्या वेगळ्या जाहिरातीसाठी पाठिंबा मिळत असला तरी काहींनी त्याविषयी प्रश्नही उपस्थित केले आहेत.
लेखिका रॅशेल हॅम्प्टन यांनी अमेरिकन वेबसाईट स्लेटसाठी लिहीताना यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
त्या लिहीतात, "या घडीला मला विचाराल तर मला स्वतःला एकही केस नसलेले गुळगुळीत पाय आवडतात. कोणत्याही बाईला आवडतील. पण मी माझ्या अंगावरचे केस काढले नसते जर वयाच्या अकराव्या वर्षापासून माझ्यावर हे बिंबवलं गेलं नसतं की बाईच्या शरीरावर केस असणं म्हणजे काहीतरी भयंकर आहे."
एका रेझर कंपनीने सांगावं की, 'अंगावर केस असण्यात काही वावगं नाही'. ही उलटी गंगा तर वाहात नाही ना?
पण या प्रश्नाचंही उत्तर कंपनीने त्यांच्या जाहिरातीत दिलं आहे. "जर तुम्हाला केस काढावेसे वाटले तर तुमची मदत करायला आम्ही तयार आहोत."

फोटो स्रोत, BILLIE ON UNSPLASH
तसंच जाहिरातीच्या शेवटी महिलांनी त्यांच्या अंगावरचे सगळे केस काढून शरीर गुळगुळीत केलं आहे, असंही दाखवलं नाही आहे.
यावर कंपनीच्या सह-संस्थापक गुली म्हणतात, "अंगावरचे केसं काढणं ही प्रत्येकीची वैयक्तिक बाब आहे. महिलांनी त्यांच्या केसांचं नेमकं काय करायचं हे त्यांना कोणी सांगू शकत नाही."
"आमच्यापैकी काही जणींना ते काढायचे असतील तर काही जणी अभिमानाने मिरवतील. काहीही असलं तर आपल्या निर्णयाविषयी आम्ही अपराधी वाटून घेणार नाही", गुली यांचं मत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








