You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स : हा काँप्युटर चक्क वादही घालतो
- Author, डेव ली
- Role, तंत्रज्ञान प्रतिनिधी, उत्तर अमेरिका
वादविवाद ही कला आहे, तुमच्यातील अनेकांनी शाळा कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धा नक्कीच गाजवल्या असतील. काही जण तर वाद घालण्यात पटाईत असतात. पण काँप्युटर वाद घालू लागला तर? आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे करून दाखवलं आहे.
सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये एका कार्यक्रमात IBMच्या 'प्रोजेक्ट डिबेटर'ने लोकांशी संवाद साधला, लोकांचं संभाषण ऐकलं आणि लोकांनी मांडलेले मुद्दे खोडूनही काढले.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं हे 'ग्राउंड ब्रेकिंग' सादरीकरण मानलं जात आहे.
या वादविवादासाठी या मशिनने लक्षावधी कागदपत्रांच्या लायब्ररीचा आधार घेतला. ही बहुतांश कागदपत्रं वृत्तपत्रांतील आणि अॅकडमिक जर्नलमधील होती. ज्या विषयाचा अभ्यास या मशिनने आधी केला नव्हता अशांना उत्तर देण्यासाठी त्यानं ही लायब्ररी वापरली.
अर्थात या मशिनच्या या कामगिरीमध्ये काही चुका नव्हत्या असं नाही. पण जे या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांना मात्र हे सादरीकरण आवडलं. त्यांच्या मते या वादविवादात सहभागी झालेल्या माणसांची 'डिलिव्हरी' चांगली होती तर या मशिनने मांडलेल्या मुद्द्यांत जास्त 'सबस्टन्स' होता.
IBM म्हणतं, उपलब्ध डेटाच्या आधारे अधिक वेगाने निर्णय घेणं शक्य व्हावं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नोआ ओव्हाडिया म्हणतात, "माणसं ज्या पद्धतीने आकडेवारी आणि वस्तुस्थितीला प्रतिसाद देत होती त्याबद्दल हे मशिन फार आशावादीपणे बोलत होतं. पण जेव्हा या मशिनच्या सहायाने आपल्याला मत बनवण्याची वेळ येईल, त्यावेळी हे मात्र हे मशिन सर्वस्व असणार नाही."
ओव्हाडिया इस्राईलची 2016ची राष्ट्रीय वादविवाद स्पर्धेतील विजेती आहे. या मशिनला स्पर्धक म्हणून ती IBMसोबत काम करत आहे.
ऑफलाईन थिंकिंग
प्रोजेक्ट डिबेटर इंटरनेटला जोडण्यात आलेला नव्हता. या ऐवजी IBMनं क्युरेट केलेल्या स्रोतांतून ते माहिती मिळवत होतं.
या मशिनने 2 वादविवादांत भाग घेतला. पहिला विषय होता अवकाश संशोधनासाठी सार्वजनिक निधीतून अधिकाधिक कार्यक्रमांची आवश्यकता आहे का? आणि दुसरा विषय होता, आपण टेलेमेडिसिन तंत्रज्ञानात अधिक गुंतवणूक केली पाहिजे का?
ओव्हाडिया यांनी मुद्दा मांडला की अवकाश संशोधनापेक्षा अधिक गरजेच्या बाबींवर खर्च झाला पाहिजे. यावर या मिशनने उत्तर दिलं, "असं सांगण फार सोपं आहे आणि मी ते खोडून ही काढणार नाही. पण या एकाच विषयावर खर्च सुरू आहे, असं कुणी म्हणणार नाही. अवकाश संशोधनाला सरकारने मदत केली पाहिजे, याचा समजाला लाभच होईल."
या मशिनला या विषयाची पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती. पण IBMकडे या मशिनला अर्थपूर्ण वादविवाद करणं शक्य होईल, अशा 100 विषयांची यादी होती.
IBMचे संशोधक संचालक अरविंद कृष्णा यांनी एका ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, "काळाच्या ओघात आणि आवश्यक त्या व्यावसायिक अॅप्लिकेशन बनवण्याची जेव्हा संधी येईल तेव्हा या सिस्टमचा आम्ही वापर करू."
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कृष्णा यांनी म्हटलं आहे की गुगलच्या गेम खेळणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी तुलना करता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने मोठी सीमा ओलांडली आहे कारण हा प्रकल्प भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ डंडीचे प्रा. ख्रिस रीड म्हणाले या प्रात्यक्षिकांचं वर्णन तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना म्हटले आहे. हे फार पुढंच पाऊल आहे, असं ते म्हणाले. प्रा. रीड IBMशी संबंधित नाही.
यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा खुबीने वापर करण्यात आलं आहे. वादविवाद सारखा विषय अशा प्रकारे हाताळणे, तितकं सोप नाही, ते म्हणाले.
इंजिनिअरिंग सोल्युशनची निर्मिती करत असताना वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवावे लागतात आणि ते एकत्र आणावे लागतात, असं ते म्हणाले.
IBMने यापूर्वीही सार्वजनिकपणे आर्टिफिशियल इंटलेजिन्सची प्रात्याक्षिक दाखवली आहेत. IBMच्या Watson सुपरकंप्युटरने 2011ला अमेरिकेतील जिओपार्डी हा गेमशो जिंकला होता. तर डीप ब्लूने जागतिक बुद्धिबळ विजेता गॅरी कास्परोव्हला हरवले होते.
पण सार्वजनिकरित्या जे दाखवलं जातं त्याचे प्रॅक्टिकल अॅप्लिकेशन बनवणं तितकंच कठीण आहे. Watsonच्या आरोग्यसेवेशी संबंधित एका अॅप्लिकेशनवर काम करणारे कर्मचारी कामावरून काढून टाकले होते.
हा पुढचा धोका
कृष्णा म्हणाले, "अगाऊ निर्णय घेता येणं याला नक्कीच व्यावसायिक मूल्य आहे. व्यवसायात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा आपल्याकडे आवश्यक ती कौशल्यं नसताना निर्णय घ्यावे लागतात, काही वेळा आपले पूर्वग्रह निर्णयांवर परिणाम करतात. प्रोजेक्ट डिबेटरला जर आपण एखाद्या विषयाच्या जमेच्या बाजू आणि उणिवा दाखवण्यास सांगितल्या तर तो दोन्ही बाजू समानपणे दाखवेल. म्हणजेच निर्णय प्रक्रियेत याचा फायदा होईल."
प्रा. रीड म्हणाले, "टीम बिल्डिंगमध्ये याचा वापर होईल. वादविवाद आणि चर्चेमध्ये माणसांच्या बरोबरीने कॉप्युंटरही भाग घेतील. प्रत्येकाची त्यांचीत्यांची सामर्थ्य आणि बलस्थान आहेत. निव्वळ माणसांनी एकट काम करण्यापेक्षा अशा प्रकारे टीम बांधणं अधिक चांगलं."
पण वादाचा पुढचा मुद्दा तंत्रज्ञानाचा नाही तर यात कशा प्रकारचा डेटा फीड केला जातो यातून निर्माण होणाऱ्या पूर्वग्रहांमुळे असेल.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)