रमजान ईद विशेष : भारत, पाकिस्तानच्या लोकांची अमेरिकेतील ईद

    • Author, इरम अब्बासी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, वॉशिंग्टनहून

जगभरात असलेल्या आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फेसबुकच्या माध्यमातून रमजान ईदच्या शुभेच्छा पाठवल्या जात आहेत.

आता तर ईदची नमाज आणि मशिदींमधली रोषणाई फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दाखवण्याचाही ट्रेंड आहे. रोषणाई केलेल्या मशिदींना पाहण्याचा एक वेगळाच अनुभव असतो.

यंदा जवळपास 30 लाख अमेरिकी मुस्लिमांनी ईद साजरी केली. यातल्या बहुसंख्य लोकांनी वॉशिंग्टनसहित अन्य मोठ्या शहरांतल्या ईदचं प्रसारण फेसबुकवर पाहिलं.

ईदच्या दिवशी रात्री फिरण्याचाही वेगळाच आनंद असतो. ईदच्या दरम्यान वॉशिंग्टनमध्ये राहणारे आशियाई लोक व्हर्जिनियाला भेट देतात.

ईदचा उत्साह साजरा करण्यासाठी अमेरिकेत व्हर्जिनियासारखं दुसरं ठिकाण नाही, असं लोकांचं म्हणणं आहे. कारने तासाभरात वॉशिंग्टनहून व्हर्जिनियाला पोहोचता येतं.

व्हर्जिनियातला मेळावा

व्हर्जिनियातल्या एका एक्स्पो सेंटरमध्ये 'चांद रात' नावानं मेळावा भरलेला होता. तिथे खाण्यापिण्याच्या सुविध आणि शॉपिंगचे अनेक पर्याय उपलब्ध होते.

पण या सर्वांत लोकांच्या पसंतीस उतरलं ते इथलं जेवण. आशियाई जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी इथे लोकांची गर्दी झाली होती.

55 वर्षीय हुमा पाकिस्तानच्या कराची शहरातल्या आहेत. 7 वर्षांपूर्वी त्या अमेरिकेत आल्या आहेत.

इथे येताना त्यांनी घरातून हलीम बनवून आणलं होतं. इथे त्यांचा एक छोटासा स्टॉल होता आणि 684 रुपयांना एक प्लेट हलीम विकत होत्या.

स्टॉलवर हुमा यांना मदतीसाठी त्यांची मुलगीही हातभार लावत होती. "मी कराचीत होते तेव्हा घराबाहेर असं काम कधीच केलं नव्हतं. पण इथे ते सोपं आहे. मागच्या वर्षी ईदच्या मेळ्यात आम्ही हलीम विकून 7 लाख रुपये कमावले होते," ती सांगते.

पण कराचीतल्या काम करण्याच्या माझ्या प्रश्नानं त्यांना थोड अवघडल्या सारखं वाटलं.

दरम्यान अमेरिकेत वसलेले बहुसंख्य दक्षिण आशियाई लोक आपल्या समाजातील बंधनांपासून मुक्त होऊ पाहत आहेत. ती बंधन कायम राहावी असं त्यांना वाटत नाही. याचं उदाहरण म्हणजे व्हर्जिनियाच्या मेळ्यात 90% स्टॉल महिलांचे होते.

सर्वधर्मसमभाव

20 वर्षांपूर्वी मुंबईहून अमेरिकेत आलेल्या श्रुती मलिक लग्नाचे कपडे बनवण्यात एक्सपर्ट आहेत. त्यांच्या स्टॉलच्या एकदम समोर आयेशा खान यांचा स्टॉल होता. आयेशा काश्मिरी कपडे विकत होत्या.

भारत आणि पाकिस्तानचे राजकीय संबंध कसेही असोत, श्रुती आणि आयेशा यांच्या मैत्रीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

दोघींची मैत्री आणि त्यांना एकत्र बघून सुखद धक्का बसतो.

कारण दोन्ही देशांच्या मीडियामध्ये एकमेकांसाठी खूपच आक्रमक शब्द वापरले जातात. त्यातून निर्माण होणारी प्रतिमा तिरस्कारयुक्त असते.

'...म्हणून मला मुलांसोबत काम करावं लागतं'

याच मेळ्यात आपल्या मुलांच्या मदतीनं तांदूळ आणि छोले विकणाऱ्या मुर्तजा शेख मात्र थोड्या नाराज होत्या.

"काम करण्यासाठी माझी मुलं खूपच लहान आहेत. पण अमेरिकेत सामान्यपणे उदरनिर्वाह करायचा असेल तर त्यासाठी बराच पैसा लागतो. म्हणून मला मुलांसोबत काम करावं लागतं," मुर्तजा सांगतात.

"आपला देश आणि आपल्या घरासारखी दुसरी कोणतीच जागा नसते. पण आम्ही ते सर्व सोडून इथे आहोत ते फक्त आमच्या मुलांसाठी," मुर्तजा सांगतात.

मुर्तजा यांनी 3 मुलं आहेत. त्यातला सर्वांत छोटा मुलगा 7 वर्षांचा आहे. तर मोठ्या मुलांचं वय 10 आणि 15 वर्षं इतकं आहे.

मुर्तजा यांचा छोटा मुलगा ईद कशी साजरी करणार यावर सांगतो, "आईनं बनवलेल्या शेवया खायला मिळाल्या तर ज्या दिवशी ती म्हणेल त्या दिवशीच आम्ही ईद साजरी करू."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)