मोबाइलमग्न लोकांसाठी या शहरात आहे खास लेन

फोटो स्रोत, Getty Images
सतत मोबाइलच्या स्क्रीनमध्ये डोळे खुपसून चालणाऱ्या स्मार्टफोनधारकांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये याकरिता चीनमधल्या या शहरात एक नामी उपाय शोधण्यात आला आहे. इथे मोबाईलमग्न लोकांसाठी वेगळी स्मार्टफोन युजर्स लेन बनवण्यात आली आहे.
उत्तर चीनमधील शिआन शहरातील एका प्रमुख रस्त्यावर मोबाइलवेड्या लोकांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग तयार करण्यात आला आहे.
'शानशी ऑनलाईन न्यूज'च्या वृत्तानुसार, सतत मोबाइलमध्ये व्यस्त असलेल्या आणि सभोवतालच्या वातावरणाचं भान नसलेल्या लोकांसाठी शिआन शहरातील यांता रस्त्यावर एक स्वतंत्र पादचारी मार्गच तयार करण्यात आला आहे.
पाश्चात्य देशांमध्ये सतत स्मार्टफोनमध्ये डोकं घालून इतरत्र दुर्लक्ष करणाऱ्यांना 'फबर्स' (Phubbers) किंवा 'स्मार्टफोन झोंबी' असंही म्हटलं जातं. अशा मोबाइलमग्न समाजासाठी ही स्पेशल लेन करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, The Paper
लाल, हिरव्या आणि निळ्या रंगात रंगवलेला हा पादचारी मार्ग 100 मीटर लांब आणि 80 मीटर रुंद आहे. या मार्गावर स्मार्टफोनचं चिन्ह रंगवण्यात आलं असल्यानं इतर सर्वसाधारण पादचारी मार्गांपेक्षा तो चटकन लक्षात येतो.
'शानशी ऑनलाईन न्यूज'नुसार या मार्गावर असलेल्या एका मोठ्या शॉपिंग मॉलकडून अशी स्पेशल लेन किमान महिनाभरासाठी ठेवावी यासाठी दबाव टाकण्यात आला होता.
हा रस्ता कायम गजबजलेला असतो आणि मोबाईल बघत चालणाऱ्यांना कदाचित सभोवताली काय घडतंय याचं भान नसतं. अनेकदा वाहनंही या पादचारी मार्गावर येतात.

फोटो स्रोत, Getty Images
द पेपर या न्यूज वेबसाइटने यासंदर्भात स्थानिकांच्या मुलाखती घेतल्या. तेव्हा नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं.
"मी पहिल्यांदाच असं काही बघितलं असून ही कल्पना चांगली आहे," वेय झियावे यांनी सांगितलं.
"या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित वाटू शकतं. रस्त्याच्या कडेला वाहनं असतात आणि कधीकधी पादचारी मार्गांवरही वाहनं येतात.."

फोटो स्रोत, The Paper
आणखी एक स्थानिक हू शुया म्हणतात, "आजकालचे तरुण नेहमी घाईत असतात आणि सतत मोबाइलमध्ये व्यग्र असतात. सतत मोबाइलमध्ये गुंतलेल्या लोकांना या मार्गामुळे सुरक्षित वाटू शकेल."
सिना वेब्वो मायक्रोब्लॉगवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची अवस्था ही अंध व्यक्तींसारखी झाल्याचं एकानं म्हटलं. दुसऱ्या युजरला वाटतं की, या पादचारी मार्गावरवरही फबर्स एकमेकांना धडकण्याचा धोका आहे.
(बीबीसी मॉनिटरींगसाठी केरी अॅलेन यांचं वार्तांकन)
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








