फक्त एक तिखट मिरची खाल्ली आणि तो हॉस्पिटलमध्ये भरती झाला!

जगातली सर्वांत तिखट मिरची खाण्याचं चॅलेंज स्वीकारणाऱ्या एकाला थेट इमर्जंसी वार्डात भरती करावं लागलं.

ते झालं असं, की न्युयॉर्कमध्ये तिखट मिरची खाण्याची एक स्पर्धा भरली होती. तिथे जगातील सर्वांत तिखट मिरची 'कॅरोलिना रीपर'सुद्धा लोकांची तिखट खाण्याची क्षमता तपासण्यासाठी होती.

त्याने या मिरचीचं पावडर खाल्लं आणि त्याच्या डोक्यात झणझण होऊ लागली, कोरड्या उलट्या सुरू झाल्या. काही दिवसांनी त्यांची मान दुखू लागली आणि मध्येच काही सेकंद डोक्यात वीज चमकल्या सारखं व्हायचं.

डोकं इतकं दुखत होतं की, या व्यक्तीला ICUमध्ये भरती करावं लागलं. मेंदूच्या सर्व टेस्ट करूनही डॉक्टरांना त्याला डोकेदुखी दूर करता आली नाही. डॉक्टरांनी सांगितलं की तिखट मिरची खाल्ल्यामुळे त्याच्या मेंदूच्या रक्तवाहिन्या आखडल्या होत्या.

केवळ एक तिखट मिरची खाल्ल्याने हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची ही पहिलीच घटना असल्याने BMJ case reports मध्ये याची नोंद करण्यात आली आहे.

तिखट मिरची खाताना खबरदारी घ्यावी, असां सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मिरची खाल्ल्यावर डोकं दुखू लागलं तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जावं, असं त्यांनी सांगितलं आहे.

मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा आखडल्यावर खूप डोकेदुखी सुरू होते. या डोकेदुखीला reversible cerebral vasoconstriction syndrome (RCSV) असं म्हणतात.

या माणसाच्या मेंदूचा CT स्कॅन केल्यावर त्यात मेंदूच्या सर्व रक्त वाहिन्या दबलेल्या आढळून आल्या. चुकीचं औषध किंवा मुदत संपलेलं औषध घेतल्यानेही मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो, असं डॉक्टर सांगतात.

पण तिखट मिरची खाल्ल्यानंतर पहिल्यांदाच मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाला आहे. या आधी खूप लाल मिरची खाल्ल्याने डोकेदुखी आणि नंतर हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना घडल्या आहेत.

अशा समस्येचं निदान काही दिवसात किंवा आठवड्यात होतं. पण लवकर निदान झालं नाही तर ब्रेन स्ट्रोक होण्याची शक्यता असते.

अमेरिकेतल्या डिट्रॉइटमधल्या हेन्ड्री फोर्ड हॉस्पिटलचे डॉ. कुलोथुंगन गुनासेखरन सांगतात, "तिखट मिरची खाणाऱ्या लोकांनी खबरदारी घ्यावी. कॅरोलिना रीपर मिरची खाऊ नका, असं आम्ही नाही म्हणू. पण अशी मिरची खाल्ल्यानंतर लोकांनी खबरदारी घ्यावी. तिखट मिरची खाल्ल्यावर डोकं दुखू लागलं तर लगेच डॉक्टरांना दाखवावं,"

तुम्ही जर खूप तिखट खाणारे असाल तर नक्कीच ही काळजी घ्या, किंवा तुमच्या ओळखीतले कोणी तिखटप्रेमी असतील तर त्यांच्याशी नक्की शेअर करा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)