स्पेन : बार्सिलोनाच्या रस्त्यांवर 50 हजार लोक का उतरले आहेत?

कॅटोलोनिया

फोटो स्रोत, Gonzalo Arroyo Moreno/Getty Images

कॅटलोनियाचे माजी अध्यक्ष कार्लस प्युजडिमाँट यांना जर्मनीत अटक केल्यानंतर बार्सिलोनामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत.

देशद्रोह आणि स्पेनविरोधात बंड केल्याच्या आरोपावरून स्पेन सरकार हे प्युजडिमाँट यांच्या शोधात होते. जर्मन पोलिसांनी युरोपियन अटक वॉरंटचा हवाला देत प्युजडिमाँट यांना रविवारी ताब्यात घेतलं.

सोमवारी (26 मार्च) प्युजडिमाँट यांना जर्मनीच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

कार्लस प्युजडिमाँट यांच्या अटकेनंतर कॅटलोनियामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या चकमकीत 89 लोक जखमी झाले. आतापर्यंत 4 व्यक्तींना अटक झाली आहे. डेन्मार्क मार्गे बेल्जियमला जात असताना प्युजडिमाँट यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

गेल्या ऑक्टोबरमध्ये स्पेनच्या विरोधात जाऊन कॅटलोनियाच्या संसदेनं स्वातंत्र्य घोषित केलं होतं. त्यानंतर प्युजडिमाँट देश सोडून ते बेल्जिअममध्ये राहात होते.

गेल्या शुक्रवारी (23 मार्च) त्यांच्या अटकेचं वॉरंट जारी करण्यात आलं होतं.

निदर्शनं कोण करत आहेत?

कॅटलोनियाच्या मध्य बार्सिलोना शहरात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांनी युरोपियन कमिशन आणि जर्मन दूतावासाकडे जात असताना 'राजकीय कैद्यांना मुक्त करा', 'धिस युरोप इज शेमफुल' अशा घोषणा दिल्या. काही भागात रास्ता रोकोही करण्यात आला.

कॅटोलोनिया

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, बार्सिलोनामधल्या जर्मन दुतावासावर 'आमच्या अध्यक्षाना मुक्त करा' अशी पत्रकं आंदोलकांनी लावली.

या निदर्शनात अंदाजे 55,000 लोक सामील झाल्याचं वृत्त स्पॅनिश वृत्तसंस्था Efeने दिलं आहे.

अटकेनंतर कॅटलोनियातील तणाव वाढल्याने फुटीरतावादी नेत्यांनी नवीन अध्यक्षांची घोषणा तूर्तास पुढे ढकलली आहे.

आंदोलक

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, बार्सिलोनाच्या मध्यवर्ती भागात पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली

स्पेनच्या सुप्रीम कोर्टानं कॅटलोनियाच्या 25 नेत्यांवर स्पेन विरोधात बंड केल्याचा ठपका ठेवला आहे. त्या सर्व नेत्यांनी आरोप फेटाळले आहेत.

कार्लस प्युजडिमाँट यांना कसं ताब्यात घेतलं?

डेन्मार्कलगतच्या उत्तर जर्मनीतील श्लेस्विग-होल्स्टि शहरात वाहतूक पोलिसांनी प्युजडिमाँट यांना ताब्यात घेतलं.

गेल्या आठवड्यात फिनलँडमधील वकिलांना भेटण्यासाठी आणि परिषदेत सहभागी होण्यासाठी प्युजडिमाँट तिथे गेले होते.

त्याचदरम्यान प्युजडिमाँट यांच्या अटकेची नोटीस दुसऱ्यांदा जारी करून धक्का दिला.

कॅटोलोनिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गेल्या ऑक्टोबरपासून कार्लस प्युजडिमाँट हे बेल्जियममध्ये राहत आहेत.

फिनलँडमधून ते पोलिसांच्या हातून निसटले पण जर्मनीत त्यांची गाडी अडवण्यात आली.

डिसेंबर 2017 मध्ये स्पेनच्या न्यायालयाने प्युजडिमाँट यांच्यासह इतर नेत्यांच्या अटकेची आंतरराष्ट्रीय नोटीस मागे घेतली होती. प्युजडिमाँट हे स्वत:हून मायदेशी परतत असल्याचं वकिलांनी सांगितलं होतं.

कॅटोलोनिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बार्सिलोनामधल्या जर्मनीच्या दुतावासाबाहेर पिवळ्या रंगाच्या रिबन बांधल्या गेल्या.

ओळख पटवण्यासाठी प्युजडिमाँट यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांना स्पेन सरकारकडे प्रत्यार्पित करण्याची प्रक्रिया चालू आहे.

प्युइगमाँइट यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर त्यांना 30 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

या अटकेनंतर कॅटोलोनियाच्या स्वातंत्र्य लढ्याला जोरदार धक्का पोहोचला आहे. बहुतांश नेत्यांवर कारवाईच्या नोटीसा काढण्यात आल्या आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)