अखंड स्पेनच्या मागणीसाठी 3 लाख लोक रस्त्यावर
बार्सिलोनामध्ये तब्बल 3 लाख लोक रस्त्यावर उतरले होते. वेगळ्या कॅटलोनियासाठी नाही तर अखंड स्पेनसाठी.
'कॅटलोनिया नेते कार्ल्स पुजडिमाँ यांना तुरुंगात डांबण्यात यावं,' अशा घोषणा देत अखंड स्पेनच्या मागणीसाठी लोकांनी रॅली काढली होती.
स्पेनच्या केंद्र सरकारनं कॅटलोनियावर ताबा मिळवल्यानंतर कातालान नेते कार्ल्स पुजडिमाँ यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.
"पुजडिमाँ यांना बेल्जियममध्ये राजकीय आश्रय मिळू शकतो." असं रविवारी बेल्जियममधील एका मंत्र्यांनी सांगितलं आहे.
सार्वमतात भाग घेतलेल्या अंदाजे 43 टक्के मतदारांपैकी 90 टक्के मतदारांनी स्वातंत्र्याच्या बाजूनं मतदान केलं होतं. पण स्पेनच्या संविधान कोर्टानं हे मतदान अवैध ठरवलं आहे.

फोटो स्रोत, Jeff J Mitchell/Getty Images
'...ही माणसं स्पेनला तोडत आहेत'
"या रॅलीत जवळपास तीन लाख लोक सहभागी झाले होते," असं कॅटलन महापालिका पोलीस दलातील गार्डिया उर्बाना यांनी सांगितलं आहे.
मरीना फर्नांडीस ही 19 वर्षांची विद्यार्थिनी त्यापैकीच एक आहे. "कॅटलन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयावर आपण नाखूष आहोत," असं तिनं सांगितलं.
"माझ्या आजी-आजोबांनी कष्ट करुन उभारलेल्या देशाला ही माणसं तोडत आहेत. त्यामुळे मला त्यांचा संताप येतो," असं तिनं एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.
"आम्हाला काय हवं आहे? त्यांनी स्पेनला तोडू नये. त्यांची ही कृती लाजिरवाणी आहे. आम्ही कधीच याला संमती देणार नाही. पुजडिमाँ यांना तुरुंगात डांबायला हवं." असं मत मारिया लोपेझ यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Jack Taylor/Getty Images
सार्वमतानंतरचा गोंधळ
शुक्रवारी कॅटलोनियाच्या प्रादेशिक संसदेनं स्पेनपासून स्वतंत्र होण्याच्या बाजूनं मतदान केलं होतं. पण, माद्रिदनं याला विरोध केला होता.
त्यानंतर स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी कॅटलोनियाची संसद विसर्जित करून पुजडिमाँ यांना कॅटलोनियाच्या नेतेपदावरुन काढून टाकलं होतं. तसंच डिसेंबर महिन्यात पुन्हा निवडणुका घेण्याचं जाहीर केलं आहे.
"कार्यालयीन पदावरुन काढून टाकण्यात आलं असलं, तरी पुजडिमाँ यांना त्यांची राजकीय कारकीर्द सुरु ठेवण्याचा अधिकार आहे," असं सरकारी प्रवक्ते इनिगो मेंडेज दि विगो यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं.
डिसेंबरमधील निवडणुकांमध्ये पुजडिमाँ भाग घेऊ शकतात असंही विगो यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, स्पॅनिश पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांनी स्पेनच्या नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









