You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिक्षकांच्या हाती बंदूक का देऊ पाहत आहेत डोनाल्ड ट्रंप?
अमेरिकेतल्या शाळांमध्ये सतत होणाऱ्या सशस्त्र हल्ल्यांवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक अनोखा मार्ग सुचवला आहे - शिक्षकांच्या हातात बंदुका दिल्या तर ते मुलांचं अशा हल्ल्यांपासून अधिक सक्षमतेने रक्षण करू शकतील.
14 फेब्रुवारीला फ्लोरिडामध्ये एका शाळेत झालेल्या हल्ल्यात 17 निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या हल्ल्यातील मृतांच्या नातलगांनी आणि बचावलेल्या लोकांनी अमेरिकेचा शस्त्र कायदाच बदलण्याची विनंती व्हाईट हाऊसला केली.
त्यावर उत्तर देताना ट्रंप यांनी शाळांना शस्त्रमुक्त क्षेत्रांमधून (Gunfree zone) वगळण्यात आलं तर शिक्षकांच्या हातात बंदुका देणं शक्य होईल, असा उपाय सुचवला आहे.
मार्जोरी स्टोनमन डग्लस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांशी बुधवारी बोलताना ट्रंप म्हणाले, "एखाद्या विकृत माणसाला शाळांसारख्या शस्त्रमुक्त क्षेत्रांमध्ये हल्ला करण्याची मोठी संधी दिसते. त्याला वाटतं, 'चला, आत जाऊन हल्ला करू.'"
"त्या दिवशी जर शिक्षकांच्या हातात बंदूक असती तर त्यांनी लगेच त्या हल्लेखोराला संपवून तो हल्ला आधीच रोखता आला असता," असंही ट्रंप विद्यार्थ्यांशी बोलताना म्हणाले.
'शिक्षकांनाही शस्त्रांचं प्रशिक्षण देऊ'
पण या वादग्रस्त योजनेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, "एक म्हणजे, शाळा यापुढे शस्त्रमुक्त क्षेत्र नसाव्यात. आणि या शिक्षकांनाही शस्त्र हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण देणं आवश्यक आहे."
"आतापर्यंत जे काही आम्ही बोललो, ते आता करूनही दाखवू. आपण बंदूक मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची पार्श्वभूमीचा अधिक दक्षतेने तपास करू, विशेषतः त्यांच्या मानसिक आरोग्याची दखल घेतली घेऊ," ट्रंप सांगत होते
हे ट्रंप यांच्याकडून या हल्ल्यांवर आलेलं पहिलं सबळ पाऊल असल्याचं मानलं जात आहे. देशभरात विविध ठिकाणांहून काढण्यात आलेले विद्यार्थ्यांचे मोर्चे हेसुद्धा यामागे एक विशेष कारण आहे.
फ्लोरिडा हल्ल्याला आठवडा उलटून गेल्यावर वॉशिंग्टन डीसीच्या उपनगरांमधून शेकडो तरुणांनी व्हाईट हाऊसवर मोर्चा काढत ट्रंप यांनी यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलावी, अशी मागणी केली होती.
शिकागो, इलिनॉय, पिट्सबर्ग, पेन्सिल्व्हेनिया, फिनिक्स आणि अॅरिझोनामधल्या विद्यार्थ्यांनीही वर्गांमधून बाहेर पडत रस्त्यांवरून मोर्चे काढले.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)