दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांचा अखेर राजीनामा
भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी अखेर राजीनामा दिला.
दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसृत केलेल्या निवेदनात झुमा यांनी राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं स्पष्ट केलं. मात्र त्यांच्याच सत्ताधारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस (ANC) पक्षाच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचं सांगितलं.
ANC पक्षाने झुमा यांना पद सोडा किंवा संसदेत तुमच्याविरुद्ध अविश्वासदर्शक ठराव आणला जाईल, असं सांगितलं होतं. झुमा यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं उपराष्ट्रपती सायरिल रामाफोसा यांच्याकडे सुपूर्द करा, अशी सूचना पक्षाने 75 वर्षीय झुमा यांनी केली होती. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.
झुमा 2009 पासून राष्ट्राध्यक्षपदी होते. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली.
त्याचा अखेर बुधवारी झाला, जेव्हा सकाळी पोलिसांनी झुमा यांचे निकटवर्तीय असलेल्या धनाढ्य गुप्ता कुटुंबीयांच्या घरी धाड टाकली.
कसा दिला राजीनामा?
निवेदन सादर करण्यापूर्वी झुमा पत्रकारांशी बातचीत करताना हसत होते. "तुम्ही सगळे एवढे गंभीर का दिसत आहात?" असं झुमा यांनी विचारलं.
कार्यकाळात काम केलेल्या सगळ्यांप्रती आदर व्यक्त केल्यानंतर झुमा यांनी निवेदन सादर केलं. ANC पक्षात पडलेली फूट आणि उफाळलेली हिंसा, या कारणांमुळे राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं झुमा यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, AFP
"माझं नाव घेऊन हिंसा भडकावली जात असेल तर ते चालणार नाही. माझ्या नावावर ANC पक्षात फूट पडावी, असं मला वाटत नाही. म्हणूनच या क्षणापासून राष्ट्राध्यक्ष पद सोडत आहे," असं त्यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "माझ्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी मी सहमत नाही. मात्र पक्षाची शिस्त पाळणं हे माझं कर्तव्य आहे. राष्ट्राध्यक्ष पदावरून बाजूला होत असलो तरी दक्षिण आफ्रिकेसाठी आणि ANC पक्षासाठी माझं काम सुरूच राहील."
ANC पक्षाने झुमा यांच्या राजीनाम्याप्रकरणी आपली भूमिका मांडली. झुमा यांच्या राजीनाम्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना राजकीय स्थिरता मिळेल, असं पक्षाने म्हटलं आहे.
"राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार झाले असले तरी झुमा ANC पक्षाचे यापुढेही सदस्य असतील. देशासाठी आणि पक्षासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाला आमचा सलाम आहे," असं जेसी ड्युआर्ट यांनी सांगितलं.
वर्णभेदाच्या काळात झुमा ANC पक्षाच्या लष्करी विभागात कार्यरत होते. कार्यकर्ता म्हणून सुरुवात केलेल्या झुमा यांनी पक्षांतर्गत अनेक जबाबदाऱ्या निभावत राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत वाटचाल केली.
मात्र भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये नाव आल्यानं तसंच दक्षिण आफ्रिकेची अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यामुळे झुमा यांच्यावरील दडपण वाढलं.
पुढे काय होणार?
उपराष्ट्रपतीपदी असलेले सायरिल रामाफोसा देशाची सूत्रं हाती घेतील. मात्र पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट निवडून येण्यासाठी रामाफोसा प्रयत्नशील असतील, असा एक विचारप्रवाह आहे. अशा परिस्थितीत ANC पक्षातर्फे निवडणुकीपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदासाठी एका व्यक्तीची शिफारस करण्यात येईल. महिनाभरात संसदेत त्यांच्या नावाला मंजुरी मिळू शकते.

फोटो स्रोत, Reuters
पुढील वर्षी होणार असलेल्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत रामाफोसा विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. दोन वेळा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ भूषवल्यानं या निवडणुकीत झुमा यांना भाग घेता येणार नाही.
राष्ट्राध्यक्ष झुमा दबावाखाली का होते?
भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेले झुमा 2009 पासून सत्तेवर होते. त्यांच्यावर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.
माजी उपपंतप्रधान मॅकबिसी जोनास यांनी 2016 साली आरोप केले होते की, गुप्ता कुटुंबीयांनी असा प्रस्ताव काही दिला होता की सार्वजनिक लिलाव त्यांच्या फायद्यासाठी घडवून आणले तर अर्थमंत्री करण्याचा आणि 600 मिलियन रँड (3 अब्ज रुपये) देण्यात येतील.
या प्रकरणी 2017 साली या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रभावाचा कसा वापर केला, हे सांगणारे एक लाख इमेल समोर आल्याने तर लोकांचा रोषात आणखीत भर पडली आहे.
यातून शासकीय करार, मनी लाँडरिंग आणि दलाली, यांचं हे दुष्टचक्र असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे झुमा आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध निदर्शनं सुरू झाली आणि झुमा यांना 'झुप्ता' असं संबोधलं जाऊ लागलं.

फोटो स्रोत, Reuters
या वादामुळे झुमा यांच्यावर पक्षांतून दबाव पडत गेला. पण झुमांनी झुकण्यास नकार दिला.
डिसेंबरमध्ये सायरिल रामाफोसा यांनी पक्षाची सूत्रं झुमा यांच्याकडून स्वतःकडे घेतली आहेत. पण झुमा यांनी त्यावेळी राजीनामा द्यायला नकार दिला होता.
अखेर त्यांनी अट्टहास सोडून बुधवारी आपला राजीनामा दिला.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









