फुटबॉल आणि बिस्किटात दडलाय डोनाल्ड ट्रंपच्या हातातलं अणू बॉम्बचं बटण!
सातत्याने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करणाऱ्या उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा यांनी माझ्याकडे अणू बॉम्बचं बटण असल्याचं जाहीर केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी माझ्याकडे तुमच्यापेक्षा मोठं आणि प्रभावी अणू बॉम्बचं बटण आहे, असं म्हटलं. पण खरंच ट्रंप यांच्याकडे अणू बॉम्बचं बटण आहे?
एखादा अणू बॉम्ब दागणं म्हणजे टीव्हीवर चॅनेल बदलण्याइतकी सोपं काम नाही. ती प्रक्रिया गुंतागुंतीची आहे, आणि गंमत म्हणजे यात बिस्किटं आणि फुटबॉलचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Reuters
'न्युक्लिअर बटण' तशी एक प्रसिद्ध संकल्पना आहे. पण ट्रंप यांच्याकडे खरंच असं बटण आहे का? उत्तर स्पष्ट आहे : ट्रंप यांच्याकडे असं कुठलंही खरंखुरं बटण नाही.
मग ट्रंप यांच्याकडे आहे तरी काय?
गेल्या वर्षी 20 जानेवारीला ट्रंप यांच्या शपथग्रहण सोहळ्याला बराक ओबामा यांच्याबरोबर लष्करातला एक माणूस लेदर बॅग घेऊन उपस्थित होता. ट्रंप यांनी शपथ घेतली आणि तो माणूस त्या बॅगसह ट्रंप यांच्या ताफ्यात दाखल झाला.
या बॅगला 'न्युक्लिअर फुटबॉल' असं म्हटलं जातं. अमेरिकेला अणू बॉम्ब सोडायचा असेल तर हा फुटबॉल अत्यावश्यक आहे. म्हणूनच हा फुटबॉल नेहमी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरच असतो.

फोटो स्रोत, Getty Images
ऑगस्टमध्ये तज्ज्ञांनी CNNशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. ट्रंप जेव्हा गोल्फ खेळतात तेव्हाही या बॅगेतला फुटबॉल त्यांची सोबत करतो.
या फुटबॉलमध्ये दडलंय तरी काय?
सामान्य माणसाला या फुटबॉलला आतून पाहण्याची संधी मिळाली तर त्यांच्या पदरी निराशा पडू शकते.
उत्सुकतेचा विषय झालेलं असं कुठलंही बटण या फुटबॉलमध्ये नसतं. आणि अणू बॉम्ब कधी फुटेल, असं दाखवणारं कुठलं काऊंटडाऊन घड्याळही यात नसतं.
याऐवजी तिथे विविध प्रकारची संपर्क साधनं असतात. याच्या जोडीला युद्ध कसं लढायचं, याचा आराखडा असतो. झटपट निर्णय घेता येतील, अशी या आराखड्यांची रचना असते.
1980 मध्ये व्हाईट हाऊस मिलिटरी ऑफिसचे माजी संचालक बिल ग्युइली यांनी सांगितलं होतं की प्रत्युत्तराचे पर्याय ठरलेले आहेत - दुर्मीळ, मध्यम आणि उत्तम.
मग बिस्कीट कसलं?
बिस्कीट म्हणजे विविध कोड असलेलं कार्ड असतं. हे बिस्कीटरुपी कार्ड राष्ट्राध्यक्षांनी स्वत:बरोबर कायम बाळगणं अपेक्षित असतं.ॉ
अर्थातच, फुटबॉल आणि बिस्कीट वेगवेगळे असतात.
अणू बॉम्ब टाका, असा आदेश राष्ट्राध्यक्षांना द्यायचा असेल तर त्यांना हे कोड वापरून लष्कराशी संपर्क प्रस्थापित करावा लागतो.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ट्रंप यांना अणूबॉम्बचं नियंत्रण असलेलं बिस्कीट हाती आल्यावर कसं वाटतं, असं ABC Newsने विचारलं होतं. त्यांचं उत्तर : "हे बिस्कीट काय आहे, त्याचा वापर कसा करतात, त्याचं स्वरूप काय, हे लष्करी अधिकारी समजावून सांगतात."
"या बटणाचा वापर करून किती विध्वंस घडवता येऊ शकतो, याची कल्पना देण्यात येते. त्यावेळी त्याचं गांभीर्य जाणवत नाही. पण तटस्थतेने विचार केल्यानंतर खूप भीतीदायक वाटतं," असं ट्रंप म्हणाले होते.
माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळादरम्यान या बिस्किटाचा कोड हरवल्याची आठवण त्यांचे लष्करी सहाय्यक रॉबर्ट बझ पॅटरसन यांनी सांगितली.
"क्लिंटन आपल्या पँटच्या खिशात हे बिस्कीट ठेवायचे. याच्या जोडीला क्रेडिट कार्ड रबर बँडने जोडलेलं असायचं. मोनिका लुईन्स्की प्रकरण उघडकीस आलं, त्यादिवशी सकाळी हे कोड सापडत नसल्याचं क्लिंटन यांनी सांगितलं."
जनरल ह्यू शेल्टॉन यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. क्लिंटन यांच्याकडे असलेलं बिस्कीटरुपी कोड अनेक महिने हरवल्याचं शेल्टन यांनी सांगितलं.
राष्ट्राध्यक्ष क्षेपणास्त्र हल्ल्याचं आदेश कसा देतात?
केवळ राष्ट्राध्यक्ष क्षेपणास्त्र हल्ल्याचा आदेश देऊ शकतात.
बिस्किटात असलेल्या कोडद्वारे राष्ट्राध्यक्ष लष्कराशी संपर्क साधतात. ते आपला आदेश लष्कराच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफच्या चेअरमनला सूचित करतात. चेअरमन हे अमेरिकेच्या लष्करातलं सर्वोच्च अधिकारपद आहे.

फोटो स्रोत, Getty Images
चेअरमन यांच्याकडून हा आदेश अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडच्या मुख्यालयाकडे पाठवला जातो. हे ऑफिस नेब्रास्का येथील ओफ्फट एअरबेसमध्ये आहे.
त्यांच्यानंतर हा आदेश प्रत्यक्ष रणांगणावर असलेल्या चमूला प्रसारित केला जातो. (हा चमू समुद्रात किंवा पाण्याखाली असू शकतो.)
क्षेपणास्त्र सोडण्याची सूचना कोडच्या मार्फत दिली जाते. राष्ट्राध्यक्षांकडे असणाऱ्या बिस्किटातल्या कोड आणि रणांगणातून क्षेपणास्त्र दागणाऱ्या चमूकडे असणारा कोड अचूकतेनं जुळणं अत्यावश्यक असतं.
राष्ट्राध्यक्षांचा आदेश धुडकावला जाऊ शकतो का?
अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अमेरिकेच्या लष्कराचा कमांडर इन चीफ अर्थात प्रमुख असतो. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांचा आदेश अंतिम असतो. पण या सर्वेसर्वाच्या आदेशालाही एक पळवाट आहे.
नोव्हेंबर महिन्यात, गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेच्या संसदेनं राष्ट्राध्यक्षांच्या आण्विक अधिकारांच्या प्रयोगासंदर्भात चर्चा केली.
सी. रॉबर्ट केहलर 2011 ते 2013 या कालावधीत अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक कमांडचे प्रमुख होते. ते सांगतात, "प्रशिक्षणानुसार राष्ट्राध्यक्षांच्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. पण हा आदेश कायद्याच्या चौकटीतला असावा."
"अपवादात्मक परिस्थितीत या आदेशाचं पालन होऊ शकत नाही, असं मी सांगू शकतो," असं केहलर यांनी स्पष्ट केलं.
कमांडरने असं उत्तर दिल्यास पुढे काय होतं, असं संसद सदस्यांनी विचारलं. त्यावर "मला माहिती नाही," असं उत्तर केहलर यांनी दिलं.
केहलर यांच्या उत्तरावर सदस्य खळखळून हसले.
तुम्ही हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)











