You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तुमच्या बाळाला जपा! विषारी वायूमुळे त्याच्या मेंदूला धोका आहे!
सावधान! विषारी वायूने तुमच्या बाळाच्या मेंदूला भयंकर इजा होऊ शकते!
UNICEFने दिलेल्या एका इशाऱ्यानुसार जगभरात एक वर्षापर्यंतच्या सतरा लाख बालकांचा मेंदू वायू प्रदूषणामुळे धोक्यात आला आहे. आणि या प्रदूषणाचा सर्वाधिक धोका दक्षिण आशियातील बालकांना आहे.
दक्षिण आशियात 12 लाखांहून अधिक बालकं या प्रदूषणाच्या रडारवर आहेत, ज्याची धोक्याची पातळी सहापटीनं अधिक आहे. तर पूर्व आशिया आणि पॅसिफिक भागातील चार लाख बालकांना हा धोका पोहोचण्याची भीती आहे.
मेंदूतील ऊतींना धोका
श्वसनावाटे ही प्रदूषित हवा घेतली गेल्यामुळे ब्रेन टिश्यू, म्हणजेच मेंदूतील ऊती तसंच एकूण संरचनात्मक वाढीस धोका निर्माण होतो, असं UNICEFनं म्हटलं आहे.
याचा संबंध बुध्यांक आणि स्मृती यांच्याशी आहे. त्यामुळे शाळकरी वयात परीक्षेत कमी गुण मिळणं, सरासरी कमी होणं, याशिवाय, मज्जासंस्थेसंबंधीच्या समस्याही उद्भवू शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे.
या प्रदूषणाचा फटका आयुष्यभरासाठी भोगावा लागू शकेल, असंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.
प्रदूषणावर नियंत्रण
जगात लोकसंख्या तेजीनं वाढत आहे. त्यामुळे वाढणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं, तर त्याचा फटका आणखी बालकांना बसेल, असंही UNICEFनं म्हटलं आहे.
हवा शुध्द करणाऱ्या यंत्रांचा आणि मास्कचा अधिकाधिक वापर हा त्यावरचा उपाय आहे. शिवाय, प्रदूषणाची पातळी वाढलेली असताना लहान मुलं घराबाहेर पडणार नाहीत, यावरही लक्ष द्यावं असं सुचवलं आहे.
गेल्या महिनाभरापासून दिल्लीलाही प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. त्याची तीव्रता इतकी की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याचा उल्लेख 'गॅस चेंबर' असा केला आहे.
प्रदूषणाची पातळी एवढी वाढली की शाळा बंद ठेवाव्या लागल्या. पण प्रदूषण धोकादायक पातळीत असतानाच पुन्हा शाळा सुरू केल्यामुळे पालकांनी टीकाही केली होती.
नुकत्याच दिल्लीत भारत आणि श्रीलंकेदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात काही खेळाडूंना उलट्याही झाल्या.
प्रदूषणामुळे उत्तर चीनमधल्या लोकांचा आयुर्मान किमान तीन वर्षांनी कमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळेच तिथल्या सरकारनं उत्सर्जन नियम कठोर केले आहेत. पण ते नियम सर्रास धुडकावले जात असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये येत असतात.
उपग्रहानं काढलेल्या छायाचित्रांच्या आधारे समोर आलेल्या माहितीनुसार आफ्रिकेतील शहरातही प्रदूषणाशी निगडित समस्या वाढत असल्याचं UNICEFनं म्हटलं आहे.
दरम्यान, लंडनमधल्या प्रदूषणामुळे कमी वजनाची बाळं जन्माला येत आहेत. त्यातून बालमृत्यूंचं प्रमाण वाढत आहे, असा अहवाल लंडनमधल्या हॉस्पिटलचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)