हे आहे 'पॉगवर्ट्स', हॅरी पॉटरचं जग आता कुत्र्यांसाठीही

- Author, थॉमस फ्रायमॉर्गन
- Role, बीबीसी थ्री
तुम्हाला हॅरी पॉटरच्या विश्वात रमायला आवडतं? ती हॉगवर्ट्स एक्सप्रेस, प्लॅटफॉ़र्म नंबर 9-3/4 आणि ते जादुई मंत्रोच्चार जर तुमचं रोजचं विश्व असतील, तर घ्या आणखी एक खुशखबर - तसंच विश्व आता चक्क कुत्र्यांसाठीही आलं आहे.
हो! फ्लोरिडामध्ये निराधार कुत्र्यांसाठी हॅरी पॉटरच्या धर्तीवर एक निवारा तयार करण्यात आला आहे. 'पेट अलायन्स ऑफ ग्रेटर ओरलॅन्डो' इथं आलेल्या कुत्र्यांना त्यांचं व्यक्तीमत्त्व, वागणूक आणि कौशल्य बघून हॉगवर्ट्सच्या चार हाऊसमध्ये विभागलं जातं.
हॉगवर्ट्स सॉर्टिंग हॅटची पद्धत वापरून या कुत्र्यांना ग्रॅफिंडॉग्स, हफलफ्लफ, रॅवनपॉ आणि स्लॉबरिन या चार पैकी एका घरात ठेवलं जातं.
आणि प्रत्येत घराशी साजेसा एक हॅरी पॉटर स्टाईलचा संदेशही या कुत्र्यांना दिला जातो.
प्रत्येक घर युनिक
प्रत्येक घराला त्यासाठी निवडलेल्या कुत्र्याशी संबंधित मूल्यं असतात. उदाहरणार्थ ग्रॅफिंडॉग (हॅरी, रॉन आणि हर्मायनीचं घर) मध्ये अशी कुत्री असतात, ज्यांमध्ये शौर्य, साहस, धैर्य अशी मूल्यं असतात.

फोटो स्रोत, Pet Alliance Orlando
तसंच हफलप्लफमध्ये कठोर मेहनत, संयम, निष्ठा, समर्पण आदी गुण असलेल्या कुत्र्यांचा समावेश होतो.
सहा महिन्यांपेक्षा लहान वयाची किंवा अद्याप कोणत्याही घरात वर्गीकृत न आलेली कुत्री जिथं ठेवली आहेत, त्या परिसराला पॉगवर्ट्स म्हणतात.
विशेषत: कुत्री एवढी सुंदर दिसणार असतील तर हॅरी पॉटरच्या कल्पनारम्य विश्वातील गोष्टी प्रत्यक्षात आणण्याकरता आमच्याकडं वेळच वेळ आहे.
पण या सॉर्टिंग हॅट, म्हणजे वर्गीकरण करणाऱ्या टोपीमागे चांगला उद्देशही आहे. कुत्र्यांना दत्तक घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना कुत्र्यांच्या प्रजातीऐवजी त्यांच्या गुणांविषयी इथं माहिती दिली जाते, जेणेकरून कुत्र्यांच्या प्रजातींविषयी असलेल्या समजांना आळा घालण्यास मदत होईल.
समज दूर करण्यासाठी मोहीम
जसं अलीकडच्या काही वर्षांत स्टॅफर्डशायर बुल टेरियर्स या प्रजातीबद्दलच्या समजांना आवाहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांत वाढ झालेली दिसून येते.

फोटो स्रोत, Pet Alliance Orlando
2011 साली लंडनच्या बॅटरसी डॉग आणि कॅट्स होम यांनी #Softerthanyouthink ही मोहीम सुरू केली होती. स्टाफ्स प्रजातीच्या कुत्र्यांच्या आक्रमकतेसंबंधी असलेल्या गैरसमजांना त्या मोहिमेत आवाहन देण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, TWITTER
"आम्हाला वाटतं लोकांनी कुत्र्यांना त्यांचं वर्तन, व्यक्तिमत्त्व आणि गुणांसाठी ओळखायला हवं," असं पेट अलायन्सचे कार्यकारी संचालक स्टीफन बार्डी यांनी एबीसी न्यूजला सांगितलं.
"लोकांना त्यांच्या जीवनशैलीमध्ये मदत करेल, असं कुत्र्यांमध्ये काय हवं आहे, हे समजायला हवं. नुसतंच त्यांनी आमच्याकडे येऊन 'मला एक ब्लॅक लॅब हवा आहे', असं म्हणता कामा नये," असं त्यांनी सांगितलं.
"लोकांनी फक्त कुत्र्याची जात पाहून त्याला विकत घेऊ नये. लोकांनी त्यांच्या स्वत:च्या जीवनशैलीबद्दल बोलायला हवं, जेणेकरून त्याच्याशी जुळणारा कुत्रा आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ," असं ते पुढे सांगतात.
दरवर्षी या निवाऱ्यात 1,800 पाळीव प्राणी येतात. त्यात बहुसंख्य कुत्री असतात. कारण लोक नवीन ठिकाणी राहायला जातात, जिथे त्यांचे नवीन घरमालक कुत्र्यांच्या विशिष्ट जातींच्या कुत्र्यांना स्वीकारत नाही.
पॉगवर्ट्स बदलणार समज
पॉगवर्ट्सच्या नवीन उपक्रमामुळे इथे भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे.
2014 साली झालेल्या अभ्यासानुसार असं लक्षात आलं होतं की, कुत्र्याच्या जातीचा त्याच्या आक्रमकतेवरील परिणाम खूपच कमी असतो.

फोटो स्रोत, Pet Alliance Orlando
लोकसंख्येच्या पातळीवर विचार केल्यास कुत्रे आणि मालकांची सामान्य वैशिष्ट्यं ही एक घटक असू शकतात. तरीही जातीचाच आधार घेऊन एखाद्या प्राण्याची आक्रमकता ठरवणे अयोग्य आहे.'
असं असलं तरी, गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या संशोधनात दिसून आलं की, जेव्हा पाळीव कुत्र्यांना पिट बुल्सचं लेबल लावलं जातं, तेव्हा त्यांना दत्तक घेणाऱ्या व्यक्तींवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
प्राण्यांच्या निवाऱ्यांमध्ये कुत्र्याच्या जातीची ओळख ही त्याच्या वर्तनावरून तिथले कर्मचारी जो अहवाल बनवतात, त्यावर आधारलेली असते.
बहुतेक वेळा पिटबुल प्रकारची कुत्री ओळखण्यासाठी त्यांनी वर्तवलेले अंदाज चुकीचे ठरतात. कुत्र्याच्या वर्तणुकीसंबंधीचं मूल्यमापन करणं हे त्यांना विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक चांगला मार्ग ठरु शकतो.
पेट अलायन्स आपल्या जनावरांचे मूल्यांकन करण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात, हे आम्ही ठामपणे सांगू शकत नाही. पण प्राण्यांसंबंधीचे समज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








