बनी चाओ': ही भारतीय डिश भारतातच मिळत नाही!

व्हीडिओ कॅप्शन, बनी चाओ - ही भारतीय डिश भारतातच नाही मिळत
    • Author, ताउराय माडुना
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीवरच्या डरबन शहरात मोठ्या संख्येने भारतीय राहतात. आणि त्यांच्या संस्कृतीचा एक भाग बनलेली 'बनी चाओ' नावाची एक डिश इथं मिळते. पण कमाल म्हणजे ही डिश भारतातच मिळत नाही.

अनेक वर्षांआधी बरेच भारतीय आफ्रिकेत उसाच्या मळ्यात काम करायला स्थलांतरित झाले होते. त्यांच्यासोबतच 'बनी चाओ' तिथं गेला, पण भारतात याबद्दल कुणालाही कल्पना नाही.

शेफ शनल रामरूप सांगतात, "बनी चाओ म्हणजे करी भरलेला ब्रेडचा तुकडा. बनी चाओ तुम्हाला भारतात मिळणार नाही. कारण ती बनवण्याची पद्धतच तशी आहे आणि ती आमची पद्धत आहे."

"लोक याला 'बनी चाओ' म्हणत असले, तरी यात सशाचं मांस नसतं. हा पदार्थ मटनापासून बनवतात. या डिशमध्ये सगळ्यांत वर ठेवल्या जाणारा ब्रेडचा तुकडा मला खूप आवडतो," असं त्या पुढे सांगतात.

कसं पडलं नाव?

लेखिका जुलेखा मायत सांगतात, "मी 1947 साली डरबनला आले. तेव्हा 'बनी चाओ' अनेक ठिकाणी मिळायचं. भारतातील व्यापारी वर्गाला बनिया म्हणून संबोधलं जातं. पूर्ण खात्रीनं तर नाही, पण मला वाटतं, 'बनी चाओ' हा शब्द बनियापासून आलेला आहे."

"या शब्दाबद्दल लोकांची बरीच मतं आहेत. असंही असू शकतं की ते खरं असेल आणि मी म्हणत असलेलं चूक." त्या सांगतात.

बनी चाओ

शेफ शनल सांगतात, "सामान्यत: बनिया लोक शाकाहारी असतात. म्हणून बनी चाओ ही मूळत: शाकाहारी डिश आहे."

बनी चाओ

कसं खातातबनी चाओ?

ब्रेडच्या वाडग्यातच ही करी वाढली जाते. म्हणून 'बनी चाओ' खायला सुटसुटीत असतं. 'बनी चाओ'बरोबर गाजराचं सॅलड देतात.

यामुळंच डरबनमधील शेतमजुरांमध्ये आणि कामगारांमध्ये 'बनी चाओ' स्ट्रीट फूड म्हणून लोकप्रिय आहे.

'बनी चाओ' कसं खायचं, हे ज्याच्या-त्याच्या मर्जीवर अवलंबून असतं. याला चमचा वापरुन देखील खाता येतं, असंही काही लोक म्हणतात.

"मी हातानेच बनी चाओ खातो," असं प्रेगी नायडू सांगतात.

"बनी चाओ हातानं खाल्ल्यास ब्रेडमधली करी पूर्णपणे खाता येते. पण चमचा वापरून खायचा प्रयत्न केल्यास करी पूर्णपणे खाता येत नाही," असं शनल सांगतात.

'बनी चाओ' डरबनमधल्या भारतीयांचा पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. पण, भारतात मात्र तो मिळत नाही.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)