उत्तर कोरियाबाबत आता फक्त 'एकच गोष्ट' काम करू शकते - ट्रंप

डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असतात.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांच्यात शाब्दिक चकमकी झडत असतात

उत्तर कोरियाशी वर्षानुवर्षे चर्चा करूनही त्यातून काहीच हाती न लागल्यानं "आता फक्त एकच गोष्ट काम करू शकते" असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.

"राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचं प्रशासन गेल्या पंचवीस वर्षांपासून उत्तर कोरियाशी चर्चा करीत आहेत. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही." असं ट्वीच ट्रंप यांनी केलं.

मात्र उत्तर कोरियाविरोधात ही कुठली एक गोष्ट काम करू शकेल याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही.

व्हीडिओ कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप यांनी क्षेपणास्त्र चाचणी करणाऱ्या उत्तर कोरियावर जोरदार टीका केली.

अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये शाब्दिक चकमकी उडत आहे. उत्तर कोरियानं त्यांचा आण्विक क्षेपणास्त्र कार्यक्रम ताबडतोब थांबवावा असं अमेरिकेला वाटतं.

लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर लावता येऊ शकणारी सक्षम लहान आकाराची आण्विक अस्त्र विकसित केल्याचा दावा उत्तर कोरियाकडून केला जातो.

अमेरिकेच्या राष्ट्रहितासाठी आणि सहकारी देशांच्या रक्षणासाठी गरज पडल्यास उत्तर कोरियाला आम्ही नेस्तनाबूत करू अशी धमकी ट्रंप यांनी याआधीच दिली आहे.

वॉशिंग्टनमधील बीबीसी प्रतिनिधी लॉरा बिकर याबाबत सांगतात, "शनिवारी करण्यात आलेलं हे ट्विट अमेरिकी नेत्यांच्या सांकेतिक घोषणांचा एक भाग आहे."

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्रंत्री रेक्स टिलरसन यांनी उत्तर कोरियाशी थेट चर्चा करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली होती.

सप्टेंबर महिन्यात अमेरिकेचे विमानं उत्तर कोरियाजवळून उडाले होते.

फोटो स्रोत, US PACIFIC COMMAND

फोटो कॅप्शन, सप्टेंबर महिन्यात अमेरिकेची विमानं उत्तर कोरियाजवळून उडाली होती.

यावर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी "आपली उर्जा वाचवून ठेवा रेक्स, आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण करू." असं ट्वीट केलं होतं. जागतिक पातळीवर त्याचीही बरीच चर्चा झाली.

परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांच्यासोबत आपले चांगले संबंध असल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी शनिवारी जोर देऊन सांगितलं. मात्र टिलरसन हे आणखी कठोर होऊ शकतात असंही त्यांनी म्हटलं होतं.

त्यापूर्वी टिलरसन यांनी, त्यांच्यात आणि राष्ट्राध्यक्षांमध्ये विसंवाद असल्याच्या बातम्यांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं म्हंटलं आहे.

डोनाल्ड ट्रंप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रंप

राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी उत्तर कोरियावर केलेली ताजी टीका ही धमकीवजा इशारा असू शकतो. मात्र बीबीसी प्रतिनीधीच्या म्हणण्यानुसार, "भीती ही आहे की उत्तर कोरिया हे गांभिर्यानं घेऊन धोका समजू शकते."

सप्टेंबरमध्ये उत्तर कोरियानं आंतरराष्ट्रीय दबावाला दुलर्क्षित करत सहावी आण्विक चाचणी घेतली होती. तसंच प्रशांत महासागरात आणखी एक आण्विक चाचणी घेण्याचं जाहीर केलं.

सप्टेंबर महिन्यातच संयुक्त राष्ट्रात भाषण करताना ट्रंप यांनी उत्तर कोरियाला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याची धमकी दिली होती. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन हे आत्मघातकी मिशनवर आहेत, असं ट्रंप म्हणाले होते.

यावर उत्तर देताना किम म्हटले होते की, "मानसिकरित्या विक्षिप्त, आगीशी खेळणाऱ्या अमेरिकी म्हाताऱ्याला मी नक्कीच काबूत ठेवेन."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)