लंडन : हिस्ट्री म्युझिअमजवळ अपघात, 11 जखमी

लंडनमधील नॅच्युरल हिस्ट्री म्युझिअम जवल झालेल्या कार अपघातामध्ये 11 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शींनी समोर येण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

लंडनच्या साऊथ केन्सिंग्टनमधील म्युझिअम परिसरात स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजून 20 मिनिटांनी एक काळ्या रंगाची टोयोटा कार बेदरकारपणे गर्दीत घुसली.

त्यात 11 लोक जखमी झाले. सुरूवातीला हा जहालवाद्यांचा हल्ला असेल असा संशय व्यक्त करण्यात आला होता.

मात्र नंतर पोलिसांनी ही घटना जहालवादी हल्ला नसल्याचं स्पष्ट केलं. या घटनेचा तपास रस्ता अपघात म्हणूनच केला जात आहे.

या प्रकरणी चाळीस वर्षीय कार चालकाला धोकादायकरित्या वाहन चालवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. अपघातातील जखमींची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

कार चालकाला घटनास्थळावरूनच अटक करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर उत्तर त्याची चौकशी करण्यात आली.

या अपघतातील बहुतांश जखमींना डोक्याला आणि पायाला मार लागला आहे. कार चालकाच्या डोक्याला सुद्धा इजा झाली आहे. असं लंडन अॅम्बुलन्सकडून सांगण्यात आलं आहे.

वेस्टमिनीस्टर, लंडन ब्रिज आणि फिन्सबरी पार्क इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाहनाचा वापर करण्यात आला होता.

पंतप्रधान थेरीसा मे यांनी ट्विट करीत या घटनेत तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल यंत्रणा आणि लोकांचे आभार मानत संवेदना व्यक्त केल्या आहेत.

न्यॅचुरल हिस्ट्री म्युझिअम परिसरात इतरही काही संग्रालयं आहेत. भागात पर्यटकांची नेहमी वर्दळ असते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)