माझं काम जगात सगळ्यांत त्रासदायक : अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी
- Author, जस्टिन रौलेट
- Role, दक्षिण आशिया प्रतिनिधी
अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी बीबीसीसोबत बोलताना त्यांच्या देशात असलेल्या आव्हानांची मोकळेपणाने चर्चा केली.
"हा देश चालवणं जगातलं सगळ्यांत त्रासदायक काम आहे," ते सांगतात.
अफगाणिस्तानसमोर आव्हानांची जंत्री आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. सुरक्षा हा त्यातला सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे.
इथं गेल्या 16 वर्षांपासून युद्ध सुरू आहे. मात्र नाटो (NATO) चा पाठिंबा कधीपर्यंत असेल, यावर त्यांनी ठाम उत्तर दिलं.
"कदाचित चार वर्षांत" नाटोच्या फौजा निघून जातील, असं ते म्हणाले.
सुरक्षातज्ज्ञांनी या वक्तव्याचे समर्थन केलं आहे कारण तीन वर्षांपूर्वीच नाटोचं मिशन संपलं असून तालिबानशी लढण्यासाठी अफगाण फौजांनी जेमतेम कंबर कसली आहे.

फोटो स्रोत, EPA
अफगाण फौजांना वेगवेगळं "प्रशिक्षण" देण्यासाठी नाटोच्या जवळजवळ 14,000 तुकड्या इथं आजही आहेत. तालिबानला टक्कर देणं, हा या मागचा उद्देश आहे.
घनी कबूल करतात की मागची तीन वर्षं कठीण होती. "एखाद्या 12 वर्षांच्या मुलावर 30 वर्षांच्या व्यक्तीची जबाबदारी पडल्यासारखी आमची अवस्था होती. पण हा काळ आम्हांला बरंच काही शिकवून गेला. व्यवस्थापन आणि नेतृत्वाच्या पातळीवर आता गोष्टी बऱ्याच बदलत आहेत."
ते पुढे सांगतात, "मला असं वाटतं की पुढच्या चार वर्षांत आमचं सैन्य घटनात्मक गोष्टी करण्यास सक्षम होईल, जे म्हणजे स्वायत्तता घोषित करणं."
काही विदेशी सैन्य आणखी काही काळ तिथे असतील. याचाच अर्थ आता अफगाण सैन्य तालिबानशी दोन हात करायला सज्ज आहे का? या प्रश्नाला त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं
ते सांगतात की, "सरकार उलथवून पाडणे आणि दोन राजकीय केंद्र तयार करणे, म्हणजेच जिथे जिथे प्रभाव टाकू शकतो तो भाग व्यापून टाकणे ही तालिबानची दोन उद्दिष्टं आहेत"
"ते दोन्ही बाबतीत अपयशी ठरले आहेत" असंही ते विश्वासाने सांगतात.

फोटो स्रोत, Reuters
हे खरं आहे की नाही हा वादाचा मुद्दा आहे. कारण अमेरिकन सैन्याच्या आकड्यानुसार अफगाण सरकारचा दोन तृतीयांशपेक्षा सुद्धा कमी भागावर नियंत्रण आहे. बाकीच्या भागावर एकतर तालिबानचं किंवा इतर दहशतवादी गटाचं नियंत्रण आहे.
मागच्या वर्षी अफगाणिस्ताने एकूण सैन्यापैकी 10% सैन्य गमावलं आहे. जवळजवळ 7000 अफगाण सैनिक मारले गेले आहेत तर 12000 जखमी झाले आहे आणि हजारो सैनिक बेपत्ता झाले आहेत.
पाश्चिमात्य देशांना या वादाचं मुख्य कारण माहित नसणं हे अफगाण राष्ट्राध्यक्षांना इतका विश्वास असण्याचं आणखी एक कारण आहे. त्यांचं सरकार नागरी युद्ध नाही तर ड्रग वॉर करतं आहे असं त्यांना वाटतं
घनी विचारतात,"तालिबान हा हेरॉईनची तस्करी करणारा जगातला सगळ्यांत मोठा देश आहे. त्यावर जगाचं लक्ष का नाही? हे तत्त्वांचं युद्ध आहे की ड्रग वॉर आहे?" अर्थव्यवस्थेचं गुन्हेगारीकरणावर कारवाई व्हायला हवी."
मग त्यांचा मुख्य उद्देश काय असं मी त्यांना विचारल्यावर त्यांनी एका दमात उत्तर दिलं, "तालिबानबरोबर शांतता करार प्रस्थापित करणं."
"राजकीय तोडगा काढणं हा या संपूर्ण धोरणाचा उद्देश आहे. राजकीय तोडगा म्हणजे खरं तर एक प्रकारच्या वाटाघाटी आहेत. लोकांना त्यांचं आयुष्य जगण्याचा हक्क देणं अतिशय गरजेचं आहे. गेल्या 40 वर्षांत आम्हाला श्वास घ्यायला जागा नाही. याचं संपूर्ण श्रेय आमच्या देशाच्या नागरिकांना जातं. बाकी देशातील नागरिक असते तर आतापर्यंत उद्धवस्त झाले असते."
भ्रष्टाचारावर घाला
घनी यांनी डोनाल्ड ट्रंप यांची तोंडभरून स्तुती केली. मागच्या महिन्यांत त्यांनी घोषणा केली की, त्यांचं सरकार अफगाणिस्तानात कायमचं रहायला तयार आहेत. एकूण परिस्थिती बघून आणि कोणत्याही वेऴापत्रकावर विसंबून न राहता सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल.
नाटोच्या मिशनला पाठिंबा देण्यासाठी अनेक तुकड्या पाठवण्यात येतील असंही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं. म्हणूनच अफगाणिस्तान सरकारातही मोठे बदल करण्याचा आमचा इरादा आहे. भ्रष्टाचाराचं निर्मूलन हा त्यातला सगळ्यांत मोठा उद्देश आहे.
"पहिलं प्राधान्य हे भ्रष्टाचार निर्मूलन आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार करणं नाही तर त्याचा सामना करणं आहे. जे भ्रष्टाचार करतात तेव्हा नातेसंबंध किंवा निष्ठा यांच्यापलीकडे सुद्धा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे."
"मी बढती दिलेला एक थ्री स्टार जनरल सध्या तुरुंगात आहे. कारण तो पेट्रोल चोरत होता. आमच्या देशातला एक असा श्रीमंत व्यक्ती ज्याला हात लावण्याची कोणाला हिंमत नव्हती तोसुद्धा तुरुंगात आहे. तुम्ही कोणालाही विचारा, अशा कृतींसाठी माझा कायमच पाठिंबा असतो."
अफगाण राष्ट्राध्यक्षांचं थेट म्हणणं आहे, "स्वावलंबन हे फक्त शब्द नाहीत तर ती एक कृती आहे."
निवडणुकीला अजून दोन वर्षं आहेत. पण ते म्हणतात की त्यांच्या सुधारणेमुळे त्यांना आपलं पद गमवावं लागलं तरी त्याची पर्वा नाही.
"जर निवडणूक हे तुमचं उद्दिष्ट असेल तर तुम्ही कधीही विकासाच्या वाटेवर जाऊ शकत नाही. निवडणूक फक्त एक मार्ग आहे. तुम्ही काहीतरी करण्यासाठी पद हवं असतं, तुम्हीच तिथं कायम असावं यासाठी नाही.
राजकारणी रुढीप्रिय असतात. पण आमच्या पिढीच्या राजकारण्यांना कल्पनाशक्ती आणि ठाम कृतीची गरज आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









