You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निवडणूक आयोग हा 'चुना लगाव आयोग' आहे- उद्धव ठाकरे
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेच्या गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे सभा झाली. तेव्हा त्यांनी अपेक्षेप्रमाणे विरोधकांवर विशेषत: एकनाथ शिंदेंवर चांगलंच तोंडसुख घेतलं.
उद्धव यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे.
- तुम्ही सगळ्यांनी मोठं केलं तरीसुद्धा ते खोक्यामध्ये बंद झाले. मी काही देऊ शकत नाही, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत आलात, यासाठी पूर्वजांची पुण्याई असावी लागते. मला गद्दार, चोर, तोतयांना सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना नाव चोरू शकता, पण शिवसेना चोरू शकत नाही. तुम्ही धनुष्यबाण चोरला असेल, पण तो तुम्हाला पेलवणार नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला नसेल तर शिवसेना बघायला इथं या.हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहे. हे निवडणूक आयुक्त म्हणून राहायच्या लायकीचे नाहीत.
- गल्लीतलं कुत्रं भाजपला विचारत नव्हतं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे सोबत राहिले नसते, तर भाजपला आज हे दिवस दिसले नव्हते.
- निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. निवडणूक आयोग चिन्ह देऊ शकत असेल पण पक्ष देऊ शकत नाही. आम्ही तो देऊ देणार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
- ही ढेकणं आपल्याला पिऊन मोठी झाली आहेत. त्यांना चिरडण्यासाठी तुमच्या एका बोटाची गरज आहे. मतदानाच्या दिवशी त्यांना दिसेल.
- लाज वाटत नसेल तर तुमच्या आई-वडिलांचं नाव लावा आणि पक्ष बांधून दाखवा.
- कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले की हे शेपट्या घालून बसले. काळ्या टोपीवाला होता, तो आता गेला. त्यानं शिवरायांचा, फुलेंचा अपमान केला. तरी यांच्या शेपट्या आतच.
- मी घरात बसून जो महाराष्ट्र सांभाळला, तो तुम्ही गुवाहाटीमधून सांभाळू शकला नाही. तुमचा अर्धा वेळ दिल्लीत आणि फिरण्यात जातोय.
- एसटीच्या काचा फुटल्यात. त्याच्यावरती गतिमान महाराष्ट्राची जाहिरात. एसटीची हाल आम्हाला माहिती आहे. आत एसटीत सुविधा नाही. पण यांना बाहेर स्वत:चा हसरा चेहरा लावायला लाज नाही वाटत.
- तो तोतडा (किरीट सोमय्या) हातोडा घेऊन फिरतोय, अरे त्याला तो झेपणार आहे का? स्वत:च्या डोक्यावर पडेल तो हातोडा, असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला.
- आम्हाला देशद्रोही म्हणून बोलूच शकत नाही. आम्ही देशप्रेमी आहोत. बोललात तर जीभ हासडून टाका. मी हे मुख्यमंत्र्यांना नाही तर मिंध्यांना बोलत आहे असं ते म्हणाले.
- आम्ही मोदींना पत्र लिहिलंय. ईडी, सीबीआय या पोपटांना पिंजऱ्यात टाकण्याची वेळ आलीये. इतर पक्षातल्या लोकांना भीती दाखवायची. विरोधी पक्षात असलं की पापी, गुन्हेगार. त्यांच्या पक्षात आलं की स्वच्छ.
- पूर्वी भाजपच्या व्यासपीठावर साधु-संत दिसायचे. आता संधीसाधू दिसत आहे अशी बोचरी टीका त्यांनी भाजपवर केली.
- कसब्यात हे साफ झाले. चिंचवडमध्ये बंडखोरी झाली नसती तर तिकडेही साफ झाले असते.
- मुंबईत आशीर्वाद यात्रा ते काढत आहेत. पण, चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार आहात का?
- कपाळावर तुम्ही गद्दार लिहून घेतलंय, मेरा खानदान चोर है हे लिहून घेतलंय, ते कधीच पुसलं जाणार नाही.
- मी हवा आहे की नको ते तुम्ही ठरवायचं आहे. माझ्याकडे तुम्हाला द्यायला फक्त विश्वास आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)