You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांमुळे औरंगजेबाला शांत झोप घेणंही अवघड झालं होतं
- Author, रेहान फजल
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
औरंगजेबाचं मुघल साम्राज्य त्याच्या काळातलं सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची त्यांनी झोपही उडवली होती.
शिवाजी महाराजांमुळेच औरंगजेबाला आपल्या आयुष्यातील 25 वर्षे राजधानीत पुन्हा परतता आलं नव्हतं.
जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्यातील सहावा सम्राट असलेल्या औरंगजेबविरुद्ध आक्रमक मोहीम उघडली होती. त्यावेळी औरंगजेब आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होता.
शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात अशा चळवळीला सुरुवात केली, ज्या चळवळीने मुघल साम्राज्याच्या पतनाचीच नव्हे तर विनाशाचीही बीजे पेरली.
याच कालावधीत शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि स्वतःला छत्रपती घोषित केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला. त्यावेळी भारताच्या पश्चिम भागात अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ही तीन इस्लामिक संस्थानं होती.
हे तिघेही सतत एकमेकांशी लढत. उत्तरेकडून मुघलही या संस्थानिकांवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात असायचे. मुघलांना दक्षिणेत आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं.
कठीण मोहिमा
किशोरवयातच शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाहाच्या ताब्यातील चार किल्ले काबीज करून बंड सुरू केले. त्या काळात औरंगजेब हा आपल्या प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होता.
प्रसिद्ध इतिहासकार रॉबर्ट ऑर्मन यांनी लिहिलंय, "औरंगजेबाने शिवाजी महाराजांबाबत सार्वजनिकरित्या सर्व प्रकारे शिवीगाळ केला. त्यांना अगदी 'पहाडी उंदीर' म्हणूनही संबोधलं, त्यांना चिरडण्यासाठई औरंगजेबाने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती."
वैभव पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या 'शिवाजी : इंडियाज ग्रेट वॉरियर किंग' या चरित्रात लिहिलंय, "शिवाजी महाराजांचा लढवय्या नेता म्हणून सर्वात मोठा गुणधर्म म्हणजे धाडसी आणि अशक्यप्राय वाटणाऱ्या हल्ल्यांचं नियोजन होय. तसंच आवश्यकतेनुसार माघार घेण्यातही त्यांना काही गैर वाटत नसे."
शिवाजी महाराजांचे सोबती आणि अनुयायी यांची त्यांच्यावरील निष्ठा हीसुद्धा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्यचकीत करते.
1660 साली शिवाजी महाराजांचे जवळचे सहकारी बाजीप्रभू देशपांडे यांनी बिजापूरच्या बादशाहाने केलेल्या मोठ्या हल्ल्याचा सामना केवळ 300 सैनिकांना सोबत घेऊन केला होता. त्यांच्यामुळेच शिवाजी महाराज सुरक्षितस्थळी सुखरूप पोहोचू शकले.
या लढाईत बाजीप्रभू यांना आपले प्राण गमवावे लागले. पण त्यांचं नाव इतिहासात अजरामर झालं.
शिवाजी महाराज-अफझल खान भेट
शिवाजी महाराजांच्या सैन्यात 10 हजार घोडेस्वार होते. विजापूरच्या दरबारातील एक मोठा सेनापती असलेल्या अफझलखानाबाबत शिवाजी महाराजांच्या अनेक कटू आठवणी होत्या.
1648 साली शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांना त्याने साखळदंडाने बांधून विजापूरला नेलं होतं. शिवाय, 1654 साली शिवाजी महाराजांचा मोठा भाऊ संभाजी राजे यांच्या हत्येतही अफजलखानाचा सहभाग होता.
जदुनाथ सरकार त्यांच्या 'शिवाजी अँड हिज टाईम्स' या पुस्तकात लिहितात, "विजापूरच्या दरबारात अफझलखानाने बढाई मारली, शिवाजी कोण आहे? मी त्याला बेड्या घालून इथे आणेन. त्यासाठी मला माझ्या घोड्यावरूनदेखील उतरावं लागणार नाही."
त्या काळात शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात अनेक पत्रव्यवहार झाले. अखेरीस, 10 नोव्हेंबर 1659 रोजी दोघांची भेट होईल असे ठरलं.
अफझलखान त्याच्या दोन-तीन सैनिकांसह पालखीत येईल, त्याला शस्त्रे आणण्याची परवानगी असेल, असं ठरलं. शिवाजी महाराजांनाही तेवढेच सैनिक सोबत आणण्याची परवानगी होती.
भेटीच्या काही दिवस आधी महाराजांनी आपल्या सैनिकांना शेजारच्या जंगलात पाठवून तिथेच लपून राहण्याच्या सूचना दिल्या.
अफजल खानासोबत चर्चा अयशस्वी ठरली तर बिगुल वाजवला जाईल, त्यानंतर सैनिकांनी अफजलखानाच्या सैनिकांवर हल्ला करावा, असा तो संकेत असेल, असं त्यांनी सांगितलं होतं.
परमानंद त्यांच्या 'शिवबरात' या पुस्तकात लिहितात, "त्या दिवशी शिवाजींनी पांढरा झगा घातला होता. त्यांच्या मुकुटाखाली लोखंडी टोपी लपलेली होती. त्यांच्या उजव्या बाहीमध्ये 'बिच्छवा' असा धारदार खंजीर होता. डाव्या हातात त्यांनी 'वाघ-नख' हत्यार लपवलेलं होतं. जिवा महाला आणि संभाजी कावजी असे दोन विश्वासू साथीदार त्यावेळी महाराजांसोबत होते.
अफझलखान जेव्हा भेटीसाठी गेला, त्यावेळी त्याच्यासोबत 1 हजार सैनिक येत होते.
पण शिवाजी महाराजांचे दूत पंताजी बोकील यांनी म्हटलं, शिवाजी महाराजांना इतके सैनिक दिसले, तर ते किल्ल्यावर परत जातील आणि दोघांची भेटही घडू शकणार नाही."
त्यामुळे अफझलखानाने आपल्या सैनिकांना तिथेच थांबण्यास सांगितलं. पुढे, दहा सशस्त्र सैनिकांसह शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी तो निघाला.
अफझलखानाचा कोथळा काढला
या भेटीचा तपशील देताना जदुनाथ सरकार लिहितात, "शिवाजी महाराजांना पाहताच अफझलखानाने त्यांना मिठी मारण्यासाठी आपले हात पुढे केले. दोघांनी मिठी मारताच खानाने त्यांची मान कवेत घेतली. यामुळे शिवाजी महाराज अस्वस्थ झाले. दरम्यान अफझल खानाने आपल्याकडील खंजीरानेही महाराजांवर हल्ला केला.
हे सर्व अचानक घडत असतानाही शिवाजी महाराजांनी तत्परतेने प्रतिक्रिया दिली.
त्यांनी अफझलखानाची कंबर पकडली आणि 'वाघ-नखे' त्याच्या पोटात अडकवली. तर उजव्या हाताने त्यांनी अफझल खानावर बिच्छव्याने हल्ला चढवला.
माझ्यावर हल्ला केला, याला तत्काळ मारून टाका, असा आरडाओरडा अफझल खान करू लागला.
यानंतर अफझल खानाची मदत करण्यासाठी त्याचा दूत कुलकर्णी पुढे आला. तसंच खानासोबत आलेल्या दोन सैनिकांपैकी एक सय्यद बंडा यानेही शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात जिवा महालाने त्याला संपवले.
पुढील घटनाक्रमाबाबत काही जण म्हणतात की, त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीने त्यांचा शिरच्छेद केला. पण इतर काही जणांच्या मते, त्यानंतर जखमी अफझल खानाला त्याच्या अंगरक्षकांनी पालखीवर बसवलं आणि तिथून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवाजी महाराजांचे सैनिक त्यांच्या मागे गेले. तप्रथम त्यांनी पालखी वाहून नेणाऱ्यांचे पाय कापले आणि नंतर त्यात स्वार अफजलखानाला ठार केलं."
"या संपूर्ण घटनेने अफझल खानासोबत असलेले सैनिक चक्रावून गेले. या हल्ल्यात अफझलचा पुतण्या रहीम खानही मारला गेला. त्यानंतर शिवाजीच्या साथीदारांनी बिगुल वाजवला. जंगलात लपलेले शिवाजीचे सैनिक बाहेर आले. आदिलशाहाच्या सैनिकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. काही जण लढले, पण अखेरपर्यंत हल्ल्यात आदिलशाहीचे एकूण 3 हजार सैनिक मारले गेले.
शाहिस्ते खानाची बोटे छाटली
मुघल बादशाह औरंगजेबासमोरचा सर्वांत मोठा अडथळा शिवाजी महाराज हेच होते. 1657 मध्ये औरंगजेब हा शाहजहाँच्या दक्षिण मोहिमेचं नेतृत्व करत होता. त्यावेळीही शिवाजी महाराजांनी त्याला थेट आव्हान दिलं होतं.
दरम्यान, औरंगजेब ही मोहीम अर्ध्यावरच सोडून मध्य भारताकडे रवाना झाला. पुढे त्याला मुघल साम्राज्याची सत्ता हस्तगत करायची होती. शिवाजी महाराज हे गनिमी काव्याच्या लढाईत मुघलांपेक्षा जास्त पारंगत होते.
पुढे, 1663 मध्ये औरंगजेबाने दक्षिणेत आपला मामा शाहिस्तेखान याला सुभेदार नेमलं होतं. त्यानंतर तो पुण्यात लाल महाल येथे राहत होता. याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी आपलं बालपण घालवलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून शाहिस्ते खानावर हल्ला चढवला होता.
कृष्णाजी अनंत सभासद शिवाजी महाराजांच्या चरित्रात लिहितात, "रमजानचा सहावा दिवस होता. शाहिस्तेखानाचे स्वयंपाकी उपवास सोडून झोपण्यासाठी गेले होते. काही स्वयंपाकी हे सकाळच्या सहरीची तयारी करत होते. शिवाजी महाराज आणि त्यांचे साथीदार कोणताही आवाज न करता त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी सर्वप्रथम स्वयंपाक्यांना ठार केलं,
त्यानंतर ते शाहिस्तेखानाच्या शयनकक्षाजवळ पोहोचले. तिथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा सुरू केला.
शाहिस्तेखान आपलं शस्त्र हाती घेणार इतक्यात महाराजांनी तलवारीचा वार करून त्याची बोटे छाटली.
नाराज औरंगजेबाकडून शाहिस्तेखानाची बदली
या गोंधळानंतर महिलांनी खोलीत सुरू असलेले दिवे विझवून टाकले.
जदुनाथ सरकार लिहितात, "अंधारात दोन मराठा सैनिक पाण्याच्या टाकीवर आदळले आणि त्याच गोंधळात शाहिस्तेखानाच्या गुलाम स्त्रियांनी त्याला सुरक्षित स्थळी नेलं. शाहिस्तेखानाला मदत करणारा त्याचा मुलगा अबुल फतेह खान होता. त्याने दोन-तीन मराठा सैनिकांना मारलं. पण नंतर तो मराठा सैनिकांकडून ठार झाला.
शाहिस्तेखानाच्या सैनिकांना नेमकं काय चाललंय हे समजण्याआधीच शिवाजी महाराज लाल महाल सोडून बाहेर निघून गेले.
या संपूर्ण मोहिमेत फक्त 6 मराठा सैनिक मारले गेले. तर 40 सैनिक जखमी झाले. पण मराठ्यांनी शाहिस्तेखानाचा मुलगा, त्याचे 40 सहाय्यक, सहा बायका आणि गुलाम स्त्रिया यांना ठार मारलं. शिवाय, स्वत: शाहिस्तेखान जखमी झाला.
या घटनेनंतर शिवरायांची ख्याती सर्वत्र पसरली. याची खबर औरंगजेबाला मिळताच त्याने या संपूर्ण प्रकरणासाठी शाहिस्तेखानाच्या निष्काळजीपणाला जबाबदार ठरवलं. संतप्त औरंगजेबाने शाहिस्तेखानाची बदली बंगालमध्ये केली.
आग्र्यातून सुटका
जयसिंगच्या सततच्या विनंतीवरून शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्रा येथे जाण्यास तयार झाले. मात्र, औरंगजेबाच्या दरबारात शिवाजी महाराजांना चांगली वागणूक मिळाली नाही.
या विरोधात शिवाजी महाराजांनी आवाज उठवताच त्यांना अटक करण्यात आली. परंतु, काही दिवसांनी शिवाजी आपला मुलगा संभाजी यांना घेऊन तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
लेखिका ऑड्री ट्रुशके यांचं 'औरंगजेब द मॅन अँड द मिथ' नामक औरंगजेबाचं चरित्र आहे.
त्यामध्ये त्या लिहितात, "शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर निगराणीसाठी नेमलेल्या सैनिकांना लाच देऊन पळून गेले असण्याची शक्यता आहे. पण काही इतिहासकारांच्या मते, मोठ्या टोपल्यांमध्ये बसून ते निसटण्यात यशस्वी ठरले. या टोपल्यांमध्ये ब्राह्मणांसाठी दान म्हणून काही वस्तू पाठवल्या जात होत्या. पुढे साधूचा वेश धारण करून महाराज पायी आपल्या राज्यात पोहोचले होते."
नौदलाची उभारणी
स्वतःचं नौदल उभं करणं, हेसुद्धा शिवाजी महाराजांचं मोठं यश मानलं जातं. आपल्या समकालीन राज्यकर्त्यांमध्ये नौदलाचं महत्त्वा जाणणारा एकमेव राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखलं जातं.
समुद्री क्षेत्रात बलाढ्य असलेल्या पोर्तुगीज, डच, ब्रिटीश आणि फ्रेंच राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांना नौदलाविषयक ज्ञानाबाबत माहिती द्यायची नव्हती.
पण त्यांनी ती माहिती न देऊनही शिवाजी महाराजांनी आपलं नौदल स्थापन केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे.
वयाच्या 16 व्या वर्षी, शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांच्या जहागिरीचे प्रशासक म्हणून आदेश जारी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांनी निवडलेली भाषा संस्कृत होती. त्याचा शिक्काही संस्कृतमध्ये होता.
हा एक मोठा बदल होता. कारण वडील शहाजी, आई जिजाबाई, दादोजी कोंडदेव यांच्याशिवाय प्रताप रुद्र आणि कपाया नायक यांच्यासारखे मुस्लीम राज्यांचे हिंदू प्रमुख हे सगळे त्यावेळी फारसी भाषेचा वापर करायचे. फारसीतच ते शिक्के मारत आणि स्वतःला सुलतान म्हणवून घेत.
त्यामुळे यामध्ये बदल करणाऱ्या शिवरायांच्या राजकीय तत्त्वज्ञानातील हिंदुत्वाची पहिली झलक येथूनच दिसते.
सामान्य जनतेला त्रास न देण्याचे लष्कराला आदेश
शिवाजी महाराज आपल्या रयतेची खूप काळजी घ्यायचे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा मोबदला दिल्याशिवाय त्यांच्याकडून काहीही घेऊ नका, असा कडक आदेश त्यांनी सैन्याला दिला होता.
वैभव पुरंदरे लिहितात, "शिवाजींनी आपल्या सैन्याला शेतातल्या एका गवताला हात लावू नयेत आणि बळजबरीने एक दाणाही उचलू नयेत असे आदेश दिले होते. त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करून ज्या सैनिकांनी शेतकर्यांचा छळ केला. त्यांना त्याची शिक्षा मिळाली."
पुढे शिवाजी महाराजांनी आपल्या नावापुढे 'छत्रपती' जोडलं. 1911 मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी 'मॉडर्न रिव्ह्यू'मध्ये एक लेख लिहिला.
त्यामध्ये ते म्हणतात, की "शिवाजी महाराजांना हिंदू राज्य स्थापन करायचं होतं."
जवाहरलाल नेहरू यांनीही 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'मध्ये लिहिले आहे, "शिवाजी महाराज हे हिंदू राष्ट्रवादाच्या पुनरुत्थानाचे प्रतीक होते."
लष्करात मुस्लिमांनाही महत्त्वाची पदे
असं असलं तरी शिवाजी महाराजांचं हिंदू राज्य हे हिंदूंसह इतर धर्मीयांसाठीही होतं.
वैभव पुरंदरे लिहितात, "त्यांची विचारसरणी सर्वसमावेशक होती. ते हिंदू आणि मुस्लिमांना समान मानायचे. धर्माच्या आधारे होणारा भेदभाव त्यांनी घृणास्पद, अनैतिक आणि अस्वीकार्य मानला होता. त्यांच्या सैन्यात मराठा आणि इतर समाजबांधवांसह मुस्लीमही होते.
महाराजांच्या नौदलाचे दोन वरीष्ठ अधिकारी, दर्या सारंग वेंटजी आणि दौलत खान हे मुस्लीम होते. त्यांचा आणखी एक सर्वोच्च लष्करी अधिकारी नूर बेग हा मुस्लीम होता.
सुरेंद्रनाथ सेन यांनी त्यांच्या 'द अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम ऑफ मराठाज' या पुस्तकात लिहिले आहे की, "शिवाजीने आपल्या सल्लागारांच्या विरोधाला न जुमानता 700 पठाणांना आपल्या सैन्यात सामील करून घेतलं होतं. त्यांच्या या निर्णयाचं समर्थन फक्त गोमाजी नायक पानसंबळ यांनीच केलं होतं."
मुघल इतिहासकार खाफी खान हे शिवाजी महाराजांचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात.
त्यांनीही आपल्या लेखांमध्ये कबुल केलं आहे की "शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना मुस्लिमांचा धर्मग्रथं कुराणचा आदर करावा, असं सांगितलेलं होतं.
महिलांचा आदर
सेतू माधवराव पगडी त्यांच्या 'छत्रपती शिवाजी' या पुस्तकात लिहितात, "शिवाजी महाराजांनी आपल्या राजवटीचे हिंदू स्वरूप असूनही, नेहमीच धार्मिक सहिष्णुतेचे धोरण पाळले. त्यांनी आपल्या सैनिकांना आणि अनुयायांना मुस्लीम महिला आणि संतांचा आदर करण्याची सूचना केलेली होती.
पूर्वीच्या राज्यकर्त्यांकडून त्यांना मिळणारं अनुदान त्यांनी सुरूच ठेवलं होतं.
शिवाजी महाराजांबाबत एक कथा प्रचलित आहे. एकदा त्यांचे नेनापती आबाजी सोनदेव यांनी मुल्ला अहमदच्या सुंदर सुनेला पकडून शिवाजी महाराजांना भेट म्हणून पुण्याला पाठवलं होतं.
जदुनाथ सरकार लिहितात, "शिवाजींनी त्या स्त्रीची फक्त माफी मागितली नाही तर तिला तिच्या घरी सुखरूप परत पाठवून दिलं.
शिवाजी महाराज त्या स्त्रीला म्हणाले, 'माझी आई तुझ्यासारखी सुंदर असती, तर मीही तुमच्यासारखाच सुंदर दिसलो असतो."
शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील एका लढाईत विजापूरचा किल्लेदार केशरी सिंह मारला गेला. शिवाजी किल्ल्यात पोहोचले तेव्हा केशरीसिंहची वृद्ध आई आणि तिची दोन मुले भीतीने थरथरत असल्याचं त्यांनी पाहिलं.
शिवाजी महाराजांनी केशरीसिंहांच्या आईचे पदस्पर्श करून तिला आत पाठवलं.
त्यानंतर शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार, केशरी सिंह आणि लढाईत मारल्या गेलेल्या इतर सैनिकांचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
औरंगजेबाला दक्षिणेत राहावं लागलं
औरंगजेबाने शिवाजी महाराजांबाबत भलेही अनेक अपशब्द वापरले असतील. पण शाहिस्तेखानावर बोटे तोडून घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर तो इतका गंभीर झाला की त्याला आपला मोर्चा दक्षिणेकडेच वळवावा लागला. याबाबत त्याने जयसिंहकडेही बोलून दाखवलं होतं.
आग्र्याहून शिवाजी महाराज निसटल्यानंतर त्यांनी सुरतेवर दुसरा हल्ला केला. 23 किल्ले त्यांनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. त्यामुळे औरंगजेबाकडे दक्षिणेकडे कूच करण्याशिवाय इतर पर्याय उरलेला नव्हता.
1674 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःला स्वतंत्र राज्याचा राजा घोषित केलं. शिवाजी महाराजांचा मृत्यू वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी झाला.
पण, औरंगजेबाला दक्षिणेतील आपला कमी होत चाललेला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यास त्यांनी भाग पाडलं.
शिवाजी महाराजांमुळेच औरंगजेब त्याच्या राजधानीत 25 वर्षे परत जाऊ शकला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)