फहाद अहमद : स्वरा भास्करचा जोडीदार कोण आहे? CAA आंदोलनात भेट ते लग्नापर्यंतचा प्रवास

स्वरा भास्कर, फहाद अहमद

फोटो स्रोत, Swara Bhaskar PR Team

    • Author, नामदेव काटकर आणि सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसी मराठी

मार्च 2020. फहाद अहमदने स्वरा भास्करला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता की, "माझ्या बहिणीचं लग्न आहे 8 एप्रिलला. तुला यावं लागेल."

या मेसेजला स्वरा भास्करचं उत्तर आलं होतं की, "यार... अशक्य दिसतंय. शूटिंगमधून बाहेर पडू शकत नाहीय. यावेळी मला माफ कर. पण शब्द देते की, तुझ्या लग्नाला नक्की येईन."

व्हॉट्सअपवरील या संवादाच्या तीन-साडेतीन महिने आधीच फहाद आणि स्वरा भास्कर यांची भेट झाली, तीही आंदोलनात. देशभरात तेव्हा CAA विरोधी आंदोलनाचं लोण पसरलं होतं. मुंबईतल्या आंदोलनात स्वरा सहभागी झाली होती. त्या व्यासपीठावर फहाद एका कोपऱ्यात उभा होता.

तिथूनच दोघांमधील संवाद सुरू झाला आणि या संवादाचं रुपांतर मैत्रीतही झालं.

याच मैत्रीच्या नात्यानं फहादनं बहिणीच्या लग्नाचं स्वराला व्हॉट्सअपवरून आमंत्रण दिलं. मात्र, बहिणीच्या नाही, पण फहादच्या लग्नाला येण्याचं आश्वासन स्वरानं दिलं.

तीन वर्षांनंतर म्हणजे 16 फेब्रुवारी 2023 ला स्वरा भास्कर फहादच्या लग्नात आली आणि तेही वधू बनून.

स्वरा भास्कर, फहाद अहमद

फोटो स्रोत, Twitter/@ReallySwara

स्वरा भास्कर हिंदी सिनेसृष्टीतली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सिनेमाची कथा तिच्यासाठी नवी नाही. मात्र, तिला जोडीदार सापडण्याचा प्रवासही एखाद्या सिनेमाचं कथानक शोभावं असाच झालाय.

'स्वरा वेड्स फहाद'

8 जानेवारी 2023 रोजी स्वरा भास्करनं पहिल्यांदा फहादसोबत प्रेमात असल्याचे जाहीर संकेत दिले होते. इन्स्टाग्रामवर तिने फरहादसोबतचा फोटो शेअर केला होता. मात्र, त्यात स्वरा आणि फहादचे चेहरे दिसत नव्हते. त्यामुळे स्वराचे चाहते कमेंटमधून केवळ अंदाज बांधत होते आणि सदिच्छाही देत होते.

'हे प्रेम असू शकते...' असं कॅप्शन स्वरा भास्करनं या फोटोला दिलं होतं. 8 जानेवारीच्या त्या फोटोचा आणि कॅप्शनचा अर्थ काल म्हणजे 16 फेब्रुवारीला उलगडला.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

16 फेब्रुवारीला स्वरा भास्करनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हीडिओ, फोटो शेअर करत, फहाद अहमदसोबत लग्न झाल्याचं जाहीर केलं. विशेष विवाह नोंदणी कायद्याअंतर्गत स्वरा आणि फहाद मुंबईत विवाहबद्ध झाले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

फहाद आणि स्वराचे आई-वडील, तसंच अभिनेत्री सोनम कपूर, फॅशन डिझायनर संदीप खोसला यांसह मोजक्याच लोकांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

मात्र, स्वरानं ट्विटरवरून जाहीर केलंय की, लवकरच 'शहनाईवाली शादी'ची लवकरच तयारी करणार आहे. म्हणजेच, स्वरा आणि फहादच्या लग्नाचं रिसेप्शन थाटामाटात होताना दिसेल.

अशी झाली स्वरा-फहादची पहिली भेट

अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या सिनेमांमुळे लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे, तर तिचा जोडीदार फहाद अहमद हा समाजवादी पक्षाच्या युवाजन सबा या युवकांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत.

आपल्या सडेतोड राजकीय-सामाजिक भूमिकांमुळे स्वरा भास्कर ओळखली जाते. स्वरा आणि फहादची ओळखही आंदोलनाच्या निमित्तानेच झाली.

2019-2020 मध्ये जेव्हा देशभरात CAA विरोधी आंदोलनं होत होती. त्यावेळी स्वरा भास्करनं स्पष्ट भूमिका घेत, CAA विरोधी आंदोलनांमध्ये सहभागही नोंदवला होता.

स्वरा भास्कर, फहाद अहमद

फोटो स्रोत, Twitter/Swara Bhaskar

मुंबईत जानेवारी 2020 मध्ये ज्यावेळी CAA विरोधी आंदोलन झालं होतं, त्यात स्वरा भास्कर सहभागी झाली होती आणि त्याच व्यासपीठावर एका कोपऱ्यात विद्यार्थी नेता म्हणून फहाद अहमद उपस्थित होता.

अशाच आंदोलनादरम्यान दोघांनी एक सेल्फीही घेतला होता. स्वराने नुकत्याच शेअर केलेल्या व्हीडिओत तिने पहिला सेल्फीही शेअर केलाय. या आंदोलनांमधील भेटीनंतर दोघांमधील मैत्री वाढत गेली आणि मैत्रीच रुपांतर प्रेमात झालं.

'बरेली का बेटा' ते मुंबईकर... फहादचा प्रवास

फहाद अहमद सध्या समाजवादी पार्टीच्या युवाजन सभा या युवकांच्या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. 2022 साली जुलै महिन्यात त्यांनी आमदार अबू आझमी आणि आमदार रईस शेख यांच्या उपस्थित समाजवादी पार्टीत प्रवेश केला.

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात सक्रीय असलेला फहाद मूळचा उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आहे.

फहाद अहमद

फोटो स्रोत, Twitter/@FahadZirarAhmad

फोटो कॅप्शन, फहाद अहमद

स्वरा भास्करपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या फहादचा जन्म 1992 सालच्या फेब्रुवारीत झाला. यूपीतील अलिगढ विद्यापीठातून (AMU) फहादनं आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी फहाद मुंबईत दाखल झाला.

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अर्थात TISS मधून फहादनं MPhil चं शिक्षण घेतलं.

TISS मध्ये असतानाच फहादनं विद्यार्थी आंदोलनात सहभाग घेण्यास सुरुवात केली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना फी माफीच्या मुद्द्यासाठी आंदोलन केलं होतं.

फहाद अहमद

फोटो स्रोत, Twitter/@FahadZirarAhmad

फोटो कॅप्शन, फहाद अहमद समाजवादी पार्टीत प्रवेश करताना....

फहादनं TISS च्या गव्हर्निंग बॉडीचे चेअरपर्सन एस. रामादोराई यांच्या हातून दीक्षांत समारंभात एमफीलची पदवी घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर TISS ने फहादला पीएचडीच्या नोंदणीपासून वंचित ठेवलं. फहादनं TISS चा अवमान केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणानंतर फहाद अहदम सर्वत्र चर्चेत आला होता.

शिक्षण क्षेत्रातील समस्या फहादच्या आंदोलनांचा सुरुवातीच्या काळात मुद्दा राहिला. हे साल होतं 2018 चं. त्याच दरम्यान देशभरात CAA विरोधी आंदोलनंही सुरू झाली आणि फहाद TISS च्या बाहेर पडत, या आंदोलनातही सहभागी होऊ लागला. याच दरम्यान फहादची स्वराशी भेट झाली.

पण फहादला संघर्ष आणि आंदोलनांचा वारसा त्याच्या घरातूनच मिळालाय.

फहादचे वडील जिरार अहमद हे अलिगडमधील समाजवादी पार्टीचे स्थानिक नेते आहेत.

स्वरा भास्कर, फहाद अहमद

फोटो स्रोत, Swara Bhaskar PR Team

फोटो कॅप्शन, स्वरा आणि फहाद कुटुंबीयांसोबत...

मिडडे वृत्तपत्राशी बोलताना फहाद अहमदनं म्हटलं होतं की, "माझे वडील अनेक सामाजिक आंदोलनाचे नेतृत्त्व करायचे. हज यात्रेसाठी जी कुटुंब आर्थिक अडचणींमुळे जाऊ शकत नव्हते, त्यांना माझे वडील मदत करायचे. त्यांच्या या संस्कारातूनच माझ्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली."

फहाद हा त्याच्या पाच भावंडांमध्ये सर्वात मोठा आहे.

शिक्षणासाठी मुंबईत येताना फहाद ठरवून आला होता की, मुंबईत फार काळ राहायचं नाही. मात्र, आता फहाद केवळ मुंबईत राहत नाहीय, तर तो समाजवादी पार्टीच्या युवक संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झालाय आणि मुंबईतल्या सिनेसृष्टीत नावाजलेल्या अभिनेत्रीशी अर्थात स्वरा भास्करशी विवाहबद्धही झालाय.

धाडसी 'स्वरां'ची अभिनेत्री

अभिनेत्री स्वरा भास्कर जितकी तिच्या सिनेमांमधील भूमिकांमुळे ओळखली जाते, तितकीच ती तिच्या सामाजिक, राजकीय भूमिकांमुळेही ओळखली जाते. देशभरातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड आणि स्पष्ट भूमिका घेणारी अभिनेत्री म्हणून स्वराची ओळख आहे.

तिच्या या धाडसीपणात तिच्या कौटुंबिक वारसाही दिसून येतो. स्वराचे वडील सी. उदय भास्कर हे नौदलातील माजी अधिकारी असून, सुरक्षा आणि रणनितीक विषयातील भारतातील नावाजलेला तज्ज्ञ आहेत. तर स्वराची आई ईरा भास्कर या दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सिनेमा विषय शिकवतात.

स्वरा भास्कर, फहाद अहमद

फोटो स्रोत, Twitter/Swara Bhaskar

स्वरा मूळची दिल्लीकर आहे. दिल्लीतल्या सरदार पटेल विद्यालयात शालेय शिक्षण घेतल्यानंतर स्वरानं इंग्रजी साहित्यात दिल्लीत विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून पदवी घेतली. तसंच, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून समाजशास्त्रातून स्वरानं मास्टर डिग्री मिळवली.

2008 साली स्वरा सिनेसृष्टीत काम करण्यासाठी मुंबईत पोहोचली. 2009 साली 'मधोला किप वॉकिंग' नावाच्या सिनेमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी संजय लीला भन्साळींच्या 'गुजारिश'मध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केलं.

पुढे तनू वेड्स मनू, रांझना, वीरे दी वेडिंग, प्रेम रतन धन पायो... यांसारख्या सिनेमांमधील स्वरा भास्करच्या भूमिका चाहत्यांच्या लक्षात राहिल्या.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)