करण गौतम अदानी महाराष्ट्र सरकारला देणार 'आर्थिक सल्ला' #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1.अदानी पुत्राची राज्य आर्थिक परिषदेवर वर्णी
हिंडनबर्ग अहवालावरून अदानी उद्योग समूह वादग्रस्त ठरला असतानाही एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्याकरिता सल्ला देण्यासाठी नेमलेल्या राज्य आर्थिक सल्लागार परिषदेवर उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र करण अदानी यांची नियुक्ती करण्याचा आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केला. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
'टाटा सन्स'चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात केली होती. या सल्लागार परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्तीचा सरकारी आदेश सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. अध्यक्षांसह तीन सचिव हे पूर्णवेळ सदस्य आहेत. याशिवाय 17 सदस्यांची अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सदस्यांमध्ये उद्योगपती गौतम अदानी यांचे पुत्र करण तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांचा समावेश करण्यात आला आहे.
हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी उद्योग समुहाचे सुमारे 10 लाख कोटींचे नुकसान झाले. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पानंतर दिल्ली व मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदांमध्ये खुलासे करावे लागले. वित्तीय संस्थांमध्ये घबराट पसरली आहे. गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेतले आहेत. असे असले तरी राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या नियुक्ती आदेशात अदानीपुत्राचा समावेश करण्यात आला आहे. अदानी उद्योग समुहावर गेले काही दिवस सातत्याने आरोप होत असताना शिंदे - फडणवीस सरकारने सोमवारी नियुक्ती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
2.मी ठाण्यातून लढायला तयार- आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या आव्हानावर बाळासाहेबांच्या शिवसेनेने टोले लगावले.
भाजपने आदित्य ठाकरे यांना थेट ठाण्यातून लढा, असं प्रती आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांनी हे आव्हान स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवीन चॅलेंज दिलं आहे. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना राजीनामा देऊन ठाण्यातून लढण्याचं चॅलेंज दिलं आहे. आता एकनाथ शिंदे हे आव्हान स्वीकारतात का यावरून आणखी काही राजकारण रंगतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
"गद्दार गटातल्या केंद्रीय नेत्यांपासून ते गल्लीतल्या लोकांपर्यंत मला शिव्या द्यायला लागले. मला इकडून उभे राहा, तिकडून उभे राहा, असं चॅलेंज द्यायला लागले, पण मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, याचा अर्थ ते माझ्या चॅलेंजला घाबरले आहेत.
'त्यांनी एवढं सगळं करण्यापेक्षा, आयटी सेल चालवण्यापेक्षा तुम्ही मला फोन करून सांगितलं असतं, आदित्य तू मला जे चॅलेंज दिलं आहे ते मला परवडणारं नाही. मला जमत नाही, मी वरळीतून लढू शकत नाही, तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज देतो. तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, आमदारकीचा राजीनामा द्या. ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो. तिकडे होऊन जाऊ दे एकदा", असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
3.विशिष्ट धर्मांबाबत मत नोंदवणाऱ्या वकिलांच्या नियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अॅड्. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
ही सुनावणी आज, मंगळवारी होईल. व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप आहे.
गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख केलेल्या या प्रकरणाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
मद्रास उच्च न्यायालयातील वकील लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची नियुक्ती मद्रास उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी करण्यात आली आहे.
मदुराई खंडपीठापुढे केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या गौरी यांची भाजपशी जवळीक असल्याचा आरोप करीत नियुक्तीला आव्हान देण्यात आले आहे.
इस्लामला हिरवा दहशतवाद व ख्रिश्चनला पांढरा दहशतवाद संबोधल्यामुळे व्हिक्टोरिया गौरी वादात अडकल्या होत्या. 'दिव्य मराठी'ने ही बातमी दिली आहे.
4. कोस्टल रोडला लता मंगेशकरांचं नाव द्या, मंगेशकर कुटुंबीयांची मागणी
मुंबईची नवी ओळख होऊ पाहणाऱ्या कोस्टल रोडला लता मंगेशकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
प्रसिद्ध गायिका आणि लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, PRODIP GUHA
मुंबईतील हाजी अली चौकात लतादीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजनाला उषा मंगेशकरही उपस्थित होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या, "महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतोय आणि तो आमच्या घराजवळच होत आहे. त्यामुळं याला दीदींचं नाव द्यावं अशी आमची इच्छा आहे. लोढाजी हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्या सोबत आहे. त्यामुळे यास लतीदीदींचं नावं देण्यात यावं ,असं आम्हाला वाटतयं आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.'
स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उषा मंगेशकर बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, "त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन एका वर्षात झाले याचा त्यांना खूप आनंद आहे, दरम्यानच्या काळात आम्ही राज्य सरकारला कोस्टल रोडला लता दीदींचे नाव देण्याची विनंती केली आहे.
5. पिता-पुत्राचा द्विशतकाचा विक्रम
वेस्ट इंडिजचा भरवशाचा माजी फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल यांचा मुलगा तेजनरेन चंद्रपॉलने कसोटीत पहिलंच शतक द्विशतकाच्या रुपात झळकावण्याचा विक्रम केला.
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी बापलेकाची ही दुसरीच जोडी आहे. याआधी हनीफ आणि शोएब मोहम्मद यांच्या नावावर द्विशतक होतं. 'एबीपी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, James Worsfold
शिवनारायण चंद्रपॉलने 164 कसोटी, 268 एकदिवसीय आणि 22 ट्वेन्टी20 सामन्यात वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं. प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी वेस्ट इंडिजचं नेतृत्वही केलं.
वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात बुलावायो इथे पहिली कसोटी सुरु आहे. या कसोटीत तेजनरेन आणि क्रेग ब्रेथवेट यांनी 336 धावांची विक्रमी सलामी भागीदारी रचली.
कर्णधार ब्रेथवेटने 18 चौकारांसह 182 धावांची खेळी साकारली तर तेजनरेनने 16 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 207 धावांची खेळी केली. या दोघांच्या विक्रमी खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने पहिला डाव 447 धावांवर घोषित केली.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा झिम्बाब्वेने 114/3 अशी मजल मारली आहे.
हे वाचलंत का?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









