विजय देवेरकोंडा : टॉलिवूड ते ईडी चौकशी व्हाया बॉलिवूड

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
अभिनेता विजय देवरकोंडा यांची ईडीनं चौकशी केल्याचं वृत्त आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सुत्रांच्या हवाल्याने ही खबर दिली आहे.
विजय देवरकोंडाच्या हिंदीमध्ये नुकत्याच येऊन गेलेल्या लायगर सिनेमाच्या फंडीगबाबत ही चौकशी झाल्याचं एएनआयनं म्हटलंय. या फंडीगमध्ये फेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून विजयची चौकशी झाल्याची चर्चा आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
कोण आहे विजय देवरकोंडा
"मी माझ्या संघर्षाच्या दिवसांबद्दल जेव्हा कधी विचार करतो, तेव्हा मला भीती वाटते. माझं आयुष्य एखाद्या सिनेमासारखं आहे. माझ्यासमोर अनेक आव्हानं होती. कधी कधी मी विचार करत असे की, माझे वडील मोठे अभिनेते किंवा निर्माते असते तर..."
काही वर्षांपूर्वी अभिनेता विजय देवरकोंडानं एका मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं. विजयचा 'लायगर' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या तो व्यग्र आहे.
मात्र, नुकताच विजय वादात अडकला तो 'बायकॉट ट्रेंड'वर केलेल्या वक्तव्यामुळे. या वक्तव्यानंतर 'बायकॉट लायगर' ट्रेंड होऊ लागलं.
नवी मुंबईतल्या एका मॉलमध्ये 31 जुलै एका सिनेमाच्या प्रमोशनचा कार्यक्रम होता. मॉल खचाखच भरला होता.
या सिनेमातली जोडी स्टेजवर आली, अभिनेत्याने माइक हातात घेऊन बोलायला सुरूवात केली आणि गर्दीनं प्रचंड जल्लोष करायला सुरूवात केली.
शांतता राखण्याचं आवाहन करूनही ही गर्दी आवरत नव्हती. शेवटी या कलाकारांना कार्यक्रम अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं. गर्दी इतकी प्रचंड होती की, या कार्यक्रमाच्यावेळेस एक तरुणी बेशुद्धही पडली. तिची प्रकृती गुदमरल्यामुळे बिघडली असल्याचं सांगण्यात आलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
ज्याची एक झलक पाहण्यासाठी एवढा गोंधळ झाला होतो, तो होता अभिनेता विजय देवेरकोंडा.
'लायगर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो मुंबईत आला होता.
याच चित्रपटाली आपली सहकलाकार विजय देवेरकोंडाने अभिनेत्री अनन्या पांडेसोबत करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. या एपिसोडवरून सोशल मीडियावर करण जोहरला ट्रोलही करण्यात आलं. याचं कारण म्हणजे त्यानं विजयला विचारलेले अत्यंत खाजगी स्वरुपाचे प्रश्न.
करण जोहरनं विजय देवेरकोंडाला त्याचं रिलेशनशिप स्टेटस काय आहे, त्याचं लव्ह लाईफ याबद्दल प्रश्न विचारलेच; पण त्याच्या सेक्स लाईफबद्दलही काही गोष्टी अगदी खोदून खोदून विचारला. त्यावरूनच करण जोहरवर हे प्रश्न खालच्या दर्जाचे असल्याची टीका झाली.
करणनं विचारलेले खाजगी प्रश्न योग्य की अयोग्य हा मुद्दा बाजूला ठेवला तरी सध्या विजय देवेरकोंडाबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
या तेलुगू सुपरस्टारची लोकप्रियता केवळ साउथ इंडियन प्रेक्षकांपुरती मर्यादित नाहीये, तर बॉलिवूडमध्येही त्याच्याबद्दल क्रेझ आहे. कदाचित म्हणूनच अगदी चेष्टा-मस्करीत सुरू असलेल्या संभाषणात अभिनेत्री जाह्नवी कपूर आणि सारा अली खान यांनीही विजय देवेरकोंडाबद्दलचं आकर्षण बोलून दाखवलं होतं. त्यावेळी त्या दोघींमध्ये तूतूमैंमैंसुद्धा रंगलं होतं.
पुरी जगन्नाथ दिग्दर्शित लायगर सिनेमातून विजय देवेरकोंडा बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विजय सध्या अनेक इव्हेंट्सला हजेरी लावत आहे.
त्यामुळे तो चर्चेत आहे. पण बॉलिवूड आणि उत्तर भारतीय प्रेक्षकांसाठी विजय देवेरकोंडा हे 'न्यू फाउंड लव्ह' नाहीये. 'लायगर'च्याही आधी अर्जुन रेड्डीमुळे त्याची पॅन इंडियन लोकप्रियता वाढली होती.
तेलुगू फिल्म इंडस्ट्री ही एखाद्या मोठ्या कुटुंबासारखी आहे. म्हणजे काही ठराविक घराण्यांचं या इंडस्ट्रीवर वर्चस्व आहे. ही कुटुंबं एकमेकांशी नातेसंबंधांनीही बांधली गेली आहेत.
अशावेळी फिल्मी पार्श्वभूमी नसलेल्या एखाद्या व्यक्तीसाठी या इंडस्ट्रीत प्रवेश करणं आव्हानात्मक असू शकतं. विजय देवेरेकोंडानं हे आव्हान पेलत या इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पण त्याचा हा सगळा प्रवास कसा होता?
इंडस्ट्रीमध्ये पाय रोवण्याचा स्ट्रगल ते अर्जुन रेड्डीचं यश
मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या विजय देवेरकोंडाला पहिल्यापासून अभिनेताच बनायचं होतं.
अभिनय शिकण्यासाठी त्यानं थिएटर ग्रुपही जॉइन केला. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी नाटकं केल्यानंतर लगेचच त्याला चित्रपटांसाठीही विचारणा व्हायला लागली.
त्यांपैकी दोन ऑफर अतिशय दिग्गजांकडून आल्या होत्या- एक होते विजयेंद्र प्रसाद (बाहुबलीचे लेखक) आणि दुसरे होते दिग्दर्शक तेजा.

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
या सगळ्या प्रवासाबद्दल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना विजयने म्हटलं होतं की, दिग्दर्शक तेजा यांच्या ऑफिसबाहेर बसलो होतो तेव्हा हे सगळं किती सोपं आहे असंच मला वाटत होतं.
पण हे दोन्ही चित्रपट काही कारणानं बारगळले. त्याचवेळी माझं कॉलेज संपलं होतं आणि अचानक मला जाणवलं की, आता आपल्या हातात करायला काहीच नाहीये.
"त्याकाळात कुटुंबीयांनी आपल्याला अभिनय सोड असं कधीच सांगितलं नाही. पण इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मी किमान सहायक दिग्दर्शक किंवा लेखक म्हणून काम करावं असं वडिलांनी मला सुचवलं. माझी आई एखादा पार्ट टाइम जॉब बघ असं सांगत होती. माझी बहीण मला बँकेतल्या नोकऱ्यांचे अर्जही आणून द्यायची, विजय देवेरकोंडानं त्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या होत्या."
2011 साली त्यानं नुविल्ला चित्रपटातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर लाइफ इज ब्युटीफूल नावाच्या सिनेमात एक छोटासा रोल केला. यव्वडे सुब्रमण्यममध्ये तो अभिनेता नानीसोबत दिसला.
विजय देवेरकोंडाचा पहिला लीड रोल होता 'पेल्ली चूपुलू' हा रोमँटिक सिनेमा. त्यानंतर त्याने द्वारका सारखा मसालापटही केला. पण खऱ्या अर्थानं मोठं यश मिळालं ते अर्जुन रेड्डीमुळे. 2017 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केली. विजय देवेरकोंडाच्या अभिनयाचंही कौतुक झालं. हिंदीतही 'कबीर सिंग' नावानं 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक झाला.
अर्जुन रेड्डीवर झालेली टीका
अर्जुन रेड्डीमधल्या विजय देवेरकोंडाच्या अभिनयांचं कौतुक झालं असलं तरी, या चित्रपटावर तसंच त्यातल्या विखारी पौरुषत्वाच्या मांडणीवरही प्रचंड टीका करण्यात आली होती.
अर्जुन रेड्डीची व्यक्तिरेखा ही हिंसक, स्त्रीद्वेष्टी असून त्याच्या सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह, उद्धट वागण्याचं हा चित्रपट उदात्तीकरण करतो, असं म्हटलं गेलं.
दाक्षिणात्य अभिनेत्री पार्वती हिने एका चर्चेत विजय देवेरकोंडासमोरच या अर्जुन रेड्डीच्या व्यक्तिरेखेतल्या हिंसक पुरुषीपणावर बोट ठेवलं होतं.
त्यानंतर सोशल मीडियावरही यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यावेळी विजय देवेरकोंडाने सोशल मीडियारील या चर्चेवर नाराजी व्यक्त केली होती.
पार्वतीनं विचारलेल्या प्रश्नाचं मला काही वाटलं नाही, पण एकूण सोशल मीडियावर लोक ज्यापद्धतीने बोलत राहतात ते इरिटेटिंग असल्याचं त्यानं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
करण जोहरनेही विजय देवेरकोंडाला अर्जुन रेड्डीबद्दल विचारलं होतं. त्यावेळी बोलताना त्यानं सांगितलं, "अभिनेता म्हणून माझं काम त्या व्यक्तिरेखेसोबत समानुभूती बाळगणं हे आहे, त्या व्यक्तिरेखेबद्दल मत तयार करणं नाही. जर मी ती व्यक्तिरेखा चूक आहे की बरोबर हे ठरवायला लागलो तर मी त्याला न्याय देऊ शकणार नाही."
या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये अर्जुन त्याची प्रेयसी प्रीतीवर हात उगारतो. त्याबद्दलही करणनं विजय देवेरकोंडाला विचारलं होतं.
"त्या व्यक्तिरेखांच्या संदर्भात योग्य-अयोग्य ठरवणारा मी नाहीये. ती त्यांची गोष्ट होती. पण मी मुलीवर अशापद्धतीने हात उगारणार नाही. अगदी टोकाचा राग आला तर मी तिथून निघून जाईन, पण आपण हिंसक होऊ एवढ्या पराकोटीला नाही जाणार," असं त्यानं म्हटलं होतं.
'हुकूमशाही योग्य आहे, केवळ...'
विजय देवेरकोंडा हा केवळ अर्जुन रेड्डीच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आला होता असं नाही, तर एका मुलाखतीत लोकशाहीबद्दल केलेल्या विधानामुळे तसंच कोव्हिड काळातील मदतीमुळेही तो वादात अडकला होता.
अनुपमा चोपडा आणि बरद्वाज रंगराजन यांना दिलेल्या मुलाखतीत विजय देवेरकोंडाला भविष्यात तू राजकारणात जाणार का असा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं म्हटलं होतं की, "प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हवा असंही मला वाटत नाही. स्वस्त दारू आणि पैशांच्या जोरावर मतं मिळवली जातात, हे वाईट आहे. केवळ श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार हवा असंही मी म्हणत नाही. मला वाटतं की, मध्यमवर्गीयांना मतदानाचा अधिकार द्यायला हवा, ते लोक जे सुशिक्षित आहेत आणि थोडक्या पैशांसाठी आपली भूमिका बदलणार नाहीत."
"माझ्याबाबतीत बोलायचं तर मला हुकूमशहाच बनायला आवडेल. त्याच पद्धतीने बदल घडवून आणता येऊ शकतो. कुठेतरी मला वाटतं की, हुकूमशाही योग्य पद्धत आहे, फक्त त्या पदावर चांगली व्यक्ती हवी."
सोशल मीडियावर जेव्हा त्याच्या मुलाखतीचा हा भाग ऐकला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती.
'त्याला खरंच असं वाटतं की, एखादा चित्रपट प्रदर्शित होतोय ज्यासाठी निगेटिव्ह पब्लिसिटीची गरज आहे,' असंही काही जणांनी म्हटलं होतं.
मदतनिधीवरून आरोप
एका एंटरटेन्मेंट वेबसाइटवर विजय देवेरकोंडावर गरीबांचा अपमान केल्याचा आरोप केला होता. कोव्हिड-19च्या मदतनिधीसाठी फॅन्सकडून पैसे गोळा केल्याचा आरोपही या वेबसाइटने त्याच्यावर केला होता.
त्यानं 'देवेरकोंडा फाउंडेशन'च्या माध्यमातून गरजूंना अत्यावश्यक गोष्टी पुरविण्यसाठी निधी उभारणी केली होती. त्यानं स्वतः 25 लाख रूपये डोनेट केले होते.

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
जेव्हा हे आरोप झाले त्यानंतर विजय देवेरकोंडाने एक व्हीडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हीडिओमध्ये त्यानं स्वतःची बाजू मांडली होती.
"या वेबसाइटनं आम्ही 2200 लोकांना मदत पुरवल्याचं म्हटलं होतं, पण आम्ही 2,200 कुटुंबांना मदत केली आहे. देवेरकोंडा फाउंडेशनसोबत काही अनुभवी लोक काम करत आहेत. ते गरजू लोकांना मदत करण्यासाठी झटत आहेत. मदतनिधीसाठी पैसे देणारे माझे 'फॅन्स' नाहीयेत, तर ते सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना आपल्यासारख्यांच्या वेदना समजतात," असं विजय देवेरकोंडाने म्हटलं होतं.
त्याला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतल्या चिरंजीवी, महेश बाबू , काजल अगरवाल, राशी खन्ना यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला होता.
लायगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण
अर्जुन रेड्डी फेम विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या 'लायगर' सिनेमाचा ट्रेलर 21 जुलैला रिलीज झाला आहे.
या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरला सात तासांत जवळपास 1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले.
2 जुलैला विजय देवरकोंडाचा लायगरमधला फर्स्ट लुक रिलीज केला गेला आणि सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा ओघ सुरू झाला. हातात फुलांचा गुच्छ घेतलेल्या त्याच्या न्यूड लुकमुळे चर्चा सुरू झाल्या.

फोटो स्रोत, Twitter/Vijay Deverkonda
आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर हा फोटो पोस्ट करताना विजयनं लिहिलं होतं, "या चित्रपटाला मी सर्वस्व दिलंय...ही माझ्यासाठी मानसिक, शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक भूमिका आहे. मी तुला (भूमिकेला) सगळं दिलंय! कमिंग सून #LIGER"
'लायगर'मध्ये विजय देवरकोंडासोबत अनन्या पांडे, राम्या कृष्णन, रोनिक रॉय, विष्णू रेड्डी, मकरंद देशपांडे हे कलाकारही आहेत. हा चित्रपट हिंदीसोबतच तमीळ, तेलुगू, कन्नडा, मल्याळममध्ये रिलीज होत आहे.
या चित्रपटाची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रसिद्ध माजी बॉक्सिंगपटू माइक टायसन हाही विजयसोबत स्क्रीन शेअर करत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








