You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संभाजी भिडेंच्या 'कुंकू' वक्तव्यावर अमृता फडणवीस म्हणतात... : #पाचमोठ्याबातम्या
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा आढावा.
1. संभाजी भिडेंच्या 'कुंकू' वक्तव्यावर अमृता फडणवीस म्हणतात...
संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला कुंकू लाव त्याशिवाय बोलणार नाही, असं म्हटलं. त्यावरून मोठा वाद पेटला आहे. भिडे यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरांतून निषेध होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
"संभाजी भिडे गुरुजींचा आदर आहे. ते हिंदुत्वाचा स्तंभ आहेत. पण महिलांनी काय करावं, कसं जगावं, हे कोणी सांगू नये,"असं म्हणत अमृता फडणवीस यांनी संभाजी भिडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय.
अमृता फडणवीस या देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंढरपुरात विठुमाऊलीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अमृता यांनी संभाजी भिडे यांच्या विधानावर भूमिका मांडली.
टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.
2. राज्यात शालेय शिक्षणाची स्थिती सर्वोत्तम
कोरोनाच्या संसर्गामुळे 2020-21 या सत्रात शाळा बंदच होत्या. तरीही या वर्षात महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षणाच्या प्रतवारीत सर्वोत्तम ठरलं आहे. महाराष्ट्राप्रमाणेच केरळ आणि पंजाबही 1000 पैकी 928 गुण मिळवून प्रथम क्रमांकावर आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
केंद्रीय शिक्षण विभागाकडून दरवर्षी अध्ययन निष्पत्ती, पायाभूत सुविधा, प्रवेश , समन्याय आणि प्रशासकीय कार्यप्रणाली अशा पाच निकषांनुसार राज्याची शालेय शिक्षणाची प्रतवारी जाहीर करण्यात येते. यात सर्व मिळून 70 मापदंड निश्चित करण्यात आले आहेत.
त्यासाठी केंद्राच्या विविध योजनांच्या संकेतस्थळांवर शाळांनी नोंदवलेली माहिती विचारात घेतली जाते. 2019-20 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा होता. कोरोनाच्या साथीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. त्यात प्रशासकीय कार्यप्रणाली या निकषात महाराष्ट्रात चांगलीच आघाडी घेतली आहे.
3. जम्मू काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नाही तर निवडणूक लढवणार नाही- फारुख अब्दुल्ला
जर जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळाला नाही तर ओमर अब्दुल्ला विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत, असं फारुख अब्दुल्ला यांनी सांगितल्याची बातमी लोकमतने दिली आहे. बडगाम जिल्ह्यात ते बोलत होते.
ओमर अब्दुल्ला विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत, असा अंदाज बांधला जात होता. त्यावर फारुख यांनी स्पष्टीकरण दिलं.
नॅशनल कॉन्फरन्सने जाहीर केलेल्या विधानसभा मतदार संघांच्या प्रभारींना निवडणूक लढवण्याची परवानगी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकीला वेळ असल्याने असा निर्णय झालेला नाही, असंही त्यांनी स्प्ष्ट केलं.
4. सीएसडीएस- लोकनीतीच्या सर्वेक्षणात गुजरात निवडणुकीत भाजप प्रथम स्थानी
गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सीएसडीएस-लोकनीती या संस्थांनी निवडणूकपूर्व सर्वेक्षणात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरेल असा अंदाज व्यक्त केला आहे. द हिंदू ने ही बातमी दिली आहे.
आम आदमी पक्ष या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी आणि भाजपचा कट्टर स्पर्धक म्हणून उतरला आहे. काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
या सर्वेक्षणानुसार काँग्रेसचं मताधिक्य 50 टक्क्यांनी कमी झाल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. सुशिक्षित वर्गाने आपला पाठिंबा दिला आहे. तर उच्चवर्णीय आणि पाटीदार समाजाने भाजपलाच पाठिंबा दिला आहे.
5. मुंबई पोलिसांनी महिनाभरात 487 बेपत्ता मुलांचा घेतला शोध
मुंबईमधून बेपत्ता होणाऱ्या अल्पवयीन मुलांची संख्या अधिक आहे. बेपत्ता, अपहरण करण्यात आलेल्या, लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचं प्रमाण जास्त असल्याने मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी विशेष मोहीम हाती घेतली.
'ऑपरेशन री-युनाइट' या जवळपास दीड महिना चाललेल्या मोहिमेत 487 मुलांचा शोध लावण्यात मुंबई पोलिसांना यश आले. शोधलेल्या मुलांमध्ये 230 मुलं आणि 257 मुलींचा समावेश आहे.
'ऑपरेशन री-युनाइट'मध्ये सापडलेल्या या मुला-मुलींची कुठेच कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याची धक्कादायक माहिती या कारवाईतून समोर आलीय.
अल्पवयीन असतानाही कामाला जुंपलेल्या आठ बालकामगारांची सुटका करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)