You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस : 'बच्चू कडू माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले होते'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केलं, त्यावेळी बच्चू कडूही त्यांच्यासोबत आसाममधील गुवाहटीला पोहोचले होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे.
बच्चू कडू हे माझ्या एका फोनमुळे गुवाहटीला गेले होते, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "बच्चू कडू हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहटीला गेले होते. त्यांना मी स्वत: फोन केला आणि सांगितलं की, आम्हाला सरकार बनवायचंय आणि तुम्ही सोबत हवेत. आमची इच्छा आहे की, तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं आणि ते माझ्या एका कॉलवर गुवाहटीला गेले. बच्चू कडूंनी कुणाशी सौदा केला, काही उलट-सुलट केले, हे म्हणणेच चुकीचं आहे."
मात्र, देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीका केली जातेय.
ठाकरे सरकार पाडण्यात आपला हात नसल्याचं फडणवीस सातत्यानं सांगत असताना, त्यांनीच केलेल्या या वक्तव्यानं त्यांची विसंगती अनेकजण सोशल मीडियावर मांडत आहेत.
रवी राणांनी बच्चू कडूंवर काय आरोप केला होता?
'मला असं वाटतं की, बच्चू कडू सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो, ते फक्त तोडीसाठीच करतो. तोडीबाज म्हणून त्याची ओळख आहे,' अशी पोस्ट आमदार रवी राणा यांनी सोशल मीडियावर केली होती.
त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू झाले.
आधी मानहानीकारक पोस्ट केली म्हणून आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याविरोधात अमरावती पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला.
'बच्चू कडू यांना काही सिद्धांत नाही, विचार नाही. ते दुसऱ्यांना दम देतात, गलिच्छ बोलतात. ते ज्या स्तरावर जातील त्या स्तरावर मलाही जाता येते' अशी प्रतिक्रिया राणा यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर दिली.
त्यानंतर आज बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू म्हणाले, "लोकांमध्ये असं पसरवलं जातंय की आम्ही 50 कोटी घेतले. आम्हाला कोणी 5 हजार पण दिले नाही. पण आमच्यावर असलेला डाग कायमचा मिटला पाहिजे."
"विरोधक आरोप लावतात ते ठीक, पण आपलाच घरचा माणूस चुकीचे आरोप लावतोय. यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील बदनाम होत आहेत," असंही ते पुढे म्हणाले.
"मी राणा यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांनी माझ्याविरोधात 1 तारखेपर्यंत पुरावे द्यावे. हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. मी याबबात मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं. पण त्यानंतर पुन्हा राणांनी वक्तव्य केलं. आता कार्यकर्त्यांशी बोलून पुढे काय करायचं ते ठरवू. पक्षातला माणूस असा बोलतो तेव्हा हा आपला गेम तर होऊन राहिला नाही ना? असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं," ते म्हणाले.
राणा दांपत्यांच्या हनुमान चालिसा प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "उद्धव साहेबांच्या घराबाहेर जाऊन हनुमान चालीसा म्हणणं चुकीचं होतं."
राणा स्वतः हे बोलणार नाहीत, त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे असाही संशय कडू यांनी व्यक्त केला.
"माझा आमच्या नेत्यांना प्रश्न आहे. राणा हे बोलण्याचं धाडस का करतात? राणाची अशी आरोप करण्याची कुवत नाही. ते कोणाच्या इशाऱ्यावर बोलत आहेत हे तपासावे लागेल. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना नोटीस देणार आहे की तुम्ही पैसे दिले की नाही हे स्षष्ट करा."
आमच्या अस्तित्वाला धक्का लागला तर बच्चू कडू ते बोट छाटल्याशिवाय रहाणार नाही, असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद विकोपाला गेला असताना त्याबाबत दीपक केसरकर त्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बच्चू कडू हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या पक्षामध्ये दोन आमदार आहेत. त्यामुळे इतर आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर त्यामधील वस्तुस्थिती मला माहिती नाही.
"बच्चू कडू हे लवकरच मंत्रिपदी दिसतील, अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. मात्र जी व्यक्ती मंत्री बनणार आहे, तिने थोडा संयमही बाळगला पाहिजे, असं मला वाटतं."
दुसरीकडे रवी राणा यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, "उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून मुंबई महानगरपालिकेत 'खोक्याचं' राजकारण सुरू केलं. किशोरी पेडणेकर महापौर असताना त्यांनी किती खोके मातोश्रीवर पोहोचवले, हे संपूर्ण जनतेला माहिती आहे. खोक्यांशिवाय उद्धव ठाकरे यांचं पानही हलत नाही."
बच्चू कडू यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलताना ते म्हणाले, "कोण काय अल्टीमेंटम देते याकडे माझं लक्ष नसतं. माझ्या विरोधात कोणी आंदोलन केलं याची मी पर्वा करत नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)