You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटल्या, म्हणाल्या, 'मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला' #5मोठ्या बातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. मातोश्रीवर माझा आवाज दाबला गेला, दिपाली सय्यद यांचा एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर आरोप
"मी अनेकदा उद्धव ठाकरेंना भेटायला प्रयत्न केला. मात्र माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. मातोश्रीतील त्यांच्या जवळच्या काही लोकांनी माझा आवाज दाबला, असा आरोप अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे.
दिपाली यांनी शनिवारी (22 ऑक्टोबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर टीका केली.
त्या म्हणाल्या, "काही वेळापूर्वी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांना भेटणं खूप सोपं होतं. मात्र उद्धव ठाकरे अद्यापही नॉटरिचेबल आहेत."
उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्याविषयी प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करावा, अशी विनंती मी यापूर्वीच केली होती. पण आता त्याला उशीर झाला आहे." ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
2. राणेंनी फक्त मंत्रिपदाचा 'फुलफॉर्म' सांगून दाखवा, आदित्य ठाकरेंची टीका
नारायण राणे यांनी गेल्या 16 वर्षांत मंत्री म्हणून केलेलं एक चांगलं काम दाखवावं. किमान त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा फुलफॉर्म तरी सांगावा, अशा शब्दांत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना 56 वरून 5-6 वर आली आहे. त्यातील काहीजण माझ्या संपर्कात आहेत, असा दावा नारायण राणे यांनी केला होता.
यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, राणे यांना मागील 16 वर्षांची सवयच आहे. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं एक तरी चांगलं काम दाखवावं. चार पक्षात जाऊन त्यांनी एकही काम केलं नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. ही बातमी ई-सकाळने दिली.
3. देशभरात 75 हजार तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्ती पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शनिवारी (22 ऑक्टोबर) 75 हजार तरुणांना सरकारी नोकरीच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलं आहे.
या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला. तसेच पुढच्या दीड वर्षात म्हणजे डिसेंबर 2023 पर्यंत केंद्र सरकार 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याची घोषणा देखील मोदींनी केली.
या उपक्रमाा पहिला टप्पा आजपासून सुरू होत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. याअंतर्गत 75 हजार तरुणांना केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरिक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, तसेच आयकर निरिक्षक अशा विविध पदांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. याची भरती प्रक्रिया नुकतीच राबवण्यात आली होती. ही बातमी झी-24 तासने दिली.
4. मनसेनं भविष्यात शिंदे-फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही - राजू पाटील
मनसेनं भविष्यात शिंदे आणि फडणवीसांसोबत युती करायला हरकत नाही, असं वक्तव्य मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही का? राज ठाकरे यांचे आदेश आले तर नक्कीच युती करू, असंही राजू पाटील यावेळी म्हणाले.
पूर्वीच्या सरकारमध्ये आमची कुणी दखल घेत नव्हतं. शिवाय एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिलं जायचं. पण शिंदे-फडणवीस सरकारकडून मात्र आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं पडताना दिसत आहेत.
आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असं राजू पाटील यांनी म्हटलं. ही बातमी एबीपी माझाने दिली.
5. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरें-अनंत अंबानी भेट
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यानंतर आता मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
शुक्रवारी (21 ऑक्टोबर) एकीकडे शिवाजी पार्क मैदानात दीपोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास अनंत अंबानी हे मातोश्रीवर दाखल झाले.
त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली. या प्रसंगी आदित्य ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास अनंत हे मातोश्रीमधून बाहेर पडले. या भेटीचं कारण अद्याप समोर आलं नाही. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)