रोहित पाटलांना भाजपचा दणका, 4 नगरसेवक फोडून नगरपंचायत हिसकावली #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Rohit Patil
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1) रोहित पाटलांना भाजपचा दणका, 4 नगरसेवक फोडून नगरपंचायत हिसकावली
अगदी 10 महिन्यांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली होती. भाजपचे सांगलीचे खासदार संजय पाटील यांना रोहित पाटील यांनी दणका दिला होता. मात्र, अवघ्या 10 महिन्यात संजय पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला धोबीपछाड दिल्याने कवठेमहाकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिलीय.
संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान दोन्ही गटातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.
दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने एकादी सत्ता मिळवली होती.
मात्र, दहा महिन्याच्या आतच खासदार संजय पाटील यांनी कवठेमंकाळ नगरपंचायतमधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या आहेत.
संजय गटाच्या सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मत मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी चिठ्ठीवर मतदान घेतलं. यामध्ये संजय पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या.
2) '…नाहीतर स्वतंत्र लढू', बच्चू कडूंची उघड नाराजी
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रहार पक्ष एकटा लढणार असल्याची घोषणा कडू यांनी केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाने त्यांची मर्जी असेल सोबत घेतले तर ठीक, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू," असे सांगत बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नाराजीचा सूर आळवला आहे.
बच्चू कडू हे उस्मानाबाद जिल्ह्यात कोर्टातील एका प्रकरणातील सुनावणीसाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

फोटो स्रोत, BACCHU KADU
"दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल हे सांगणे कठीण आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागेल का हे पण सांगणे कठीण आहे. पण मंत्रिमंडळ विस्तार होईल असा मला विश्वास आहे. जर नाही झाले तर तरी बच्चू कडू बच्चू कडूच आहे," असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले आहे.
3) संजय राऊत यांच्या राजकीय वक्तव्याचा त्रास का? - विशेष न्यायालय
"पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले जाते, त्यावेळी न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी येत असतील, तसेच राऊत स्वत: प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत वक्तव्य करत असतील तर या सगळयाची चिंता तुम्हाला का? तुमची नेमकी अडचण काय?" असा प्रश्न विशेष न्यायालयाने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांना विचारला.
तसंच, या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास आणि आदेश देण्यास नकार दिला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केल्यानंतर राऊत यांनी नियमित जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. सध्या या अर्जावर सुनावणी सुरू असून सुनावणीच्या वेळी राऊत यांना न्यायालयात आणले जाते.

फोटो स्रोत, ANI
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावरही त्यांना न्यायालयात आणले जाते. न्यायालयीन कोठडीत असताना राऊत हे प्रसारमाध्यमांबरोबर बोलतात. याबाबत सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काळा घोडा येथील सत्र न्यायालयातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कुलाबा पोलिसांतर्फे शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला नेमकी अडचण काय? असा प्रश्न विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पोलिसांना केला.
4) मोदी आश्वासन बिहारमध्ये देतात आणि इंडस्ट्री गुजरातमध्ये सुरू करतात - प्रशांत किशोर
बिहारमध्ये आपले राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेले प्रशांत किशोर विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.
आता प्रशांत किशोर यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान मोदी बिहारमध्ये आश्वासने देतात, मात्र गुजरातमध्ये कारखाने सुरू करतात, असा टोला त्यांनी लगावला. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिलीय.
बिहारमधील नरकटियागंज येथील एका कार्यक्रमात प्रशांत किशोर यांनी हे वक्तव्य केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रशांत किशोर म्हणाले, "ते म्हणाले, मोदीजींना घराघरातून मते मिळाली, ते पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र प्रत्येक घरातील सिलेंडरची किंमतही 500 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत वाढली. 200 रुपयांचे 5 किलो धान्य देऊन मोदीजी तुमच्या खिशातून 500 ऐवजी 1300 रुपये सिलेंडरच्या नावावर काढतात. पुढच्या वेळी जिंकल्यास सिलिंडरची किंमत 2000 पेक्षा जास्त असेल."
प्रशांत किशोर यांनी गुजरातचा संदर्भ देत म्हटले की, मोदीजी बिहारमध्ये कारखाने सुरू करण्याचे आश्वासन देतात, पण नंतर ते कारखाने गुजरातमध्ये सुरू केले जातात.
5) मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी तब्बल तीन तास उद्धव ठाकरे यांच्या घरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दिग्गज नेते शिवाजी पार्कमधील मनसेच्या दीपोत्सवानिमित्त एकत्र आले असताना, दुसरीकडे, मातोश्रीवर मोठी घडामोड घडली.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी मातोश्रीवर आले होते. अनंत अंबानी तब्बल तीन तासानंतर मातोश्रीवरुन बाहेर पडले. या भेटीचा तपशील समोर आलेला नाही. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.
मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले होते. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यांच्यात काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.
रात्री 8 वाजून 20 मिनिटानी अनंत अंबानी यांना ताफा मातोश्री वर दाखल झाला. रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अंबानी मातोश्रीवरुन बाहेर पडले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








