PFI च्या कट्टरवाद्यांनी 'इस्लामचा अपमान केला' म्हणत जेव्हा शिक्षकाचा हातच कापला..

- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या माध्यमातून इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपावरून कट्टरवाद्यांनी शिक्षकाचा हातच कापल्याची एक घटना 2010 साली केरळमध्ये घडली होती.
या हल्ल्यामागे मुस्लीम कट्टरवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या सदस्यांचा हात होता. मागच्याच महिन्यात केंद्र सरकारने PFI संघटनेवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर बीबीसीने PFI संघटनेचा इतिहास जाणून घेतला. संबंधित माहितीवर आधारित हा सविस्तर लेख.
सूचना : या लेखात काही वाचकांना विचलित करतील, असे तपशील आहेत, याची नोंद घ्यावी.
12 वर्षांपूर्वीचा तो घटनाक्रम प्राध्यापक टी. जे. जोसेफ यांना अजूनही चांगलाच स्मरणात आहे. जुलै महिन्यातली ती एक सकाळ होती. आभाळ भरून आलेलं होतं. 52 वर्षीय प्रा. जोसेफ हे त्यांची आई आणि बहिणीसोबत मुवाट्टुपुझा शहरात असणाऱ्या आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. जोसेफ तिथल्याच एका स्थानिक कॉलेजमध्ये मल्याळम भाषेचे प्राध्यापक म्हणून काम करायचे.
त्यांच्या घरापासून जेमतेम 100 मीटर अंतरावर असताना एक सुझुकी मिनीव्हॅन आडवी आली. या गाडीने अशाप्रकारे वळण घेतलं की जोसेफ यांची गाडी मधल्या मध्ये अडकली.
त्या मिनीव्हॅन मधून सहा जण उतरले. त्यातला एकजण जोसेफ यांच्या गाडीकडे धावला. त्याच्या हातात कुऱ्हाड होती.
त्या इसमाने ड्रायव्हर साईडचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मागच्या बाजूला असलेला एक इसम खंजीर घेऊन आला. तर त्यातले तिघेजण पॅसेंजर साईडचा दरवाजा उघडण्यासाठी गेले. त्या बाजूला जोसेफ यांची बहीण बसली होती.
अवघे चार वर्ष जुनी असलेल्या वॅगन आरला त्यांनी धडक देऊन गाडीचं इंजिन बंद पाडलं होतं. त्या लोकांनी ड्रायव्हर साईडच्या काचेवर कुऱ्हाडीचा घाव घातला आणि काच फोडली. हे सगळं घडत असताना जोसेफ यांच्या लक्षात आलं की ते सापळ्यात अडकले आहेत.
ज्या माणसाने कुऱ्हाडीचा घाव घातला त्याने फुटक्या खिडकीतून आत हात घालून गाडीचा दरवाजा उघडला आणि जोसेफ यांना बाहेर खेचलं. बाहेर पाऊस पडत होता, रस्त्यावर चिखल झाला होता. त्या चिखलात जोसेफ पडले असतानाच त्यांच्या हातापायावर कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले.
जोसेफ गयावया करत होते, म्हणत होते की, "मला मारू नका....प्लिज मला मारू नका..."

पण त्या कुऱ्हाडधारी इसमाला अजिबात वाईट वाटलं नाही. लाकडाचे ओंडके तोडावे तसे तो जोसेफ यांच्या हातापायावर घाव घालत होता.
कुऱ्हाडीच्या वाराने त्यांच्या डाव्या हाताचा तळावा बाजूला उडून पडला होता. उजवा हात धडाला लोंबकळत होता.
गाडीची काच फुटल्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकून जोसेफ यांची पत्नी आणि मुलगा घराबाहेर आले. जोसेफ यांच्यावर जीवघेणा हल्ला सुरू होता त्या ठिकाणी ते दोघेही आले. त्यांच्या मुलाने आपल्या वडिलांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने कोयता भिरकावला.
हल्लेखोरांनी तिथं क्रूड बॉम्बचा स्फोट केला आणि व्हॅनमधून पळून गेले.
हल्लेखोर पळून गेल्यावर शेजारी घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जोसेफ यांना दवाखान्यात नेलं. त्यांचा कापलेला तळहात शेजारच्या बागेत एखाद्या सागवानी पानासारखा गळून पडला होता. त्यांनी तो पिशवीत घालून दवाखान्यात नेला.
दवाखाना जवळपास 50 किलोमीटर लांब होता. जोसेफ मरणासन्न अवस्थेत बेशुद्ध पडून होते. दवाखान्यात गेल्यावर सहा डॉक्टर तब्बल 16 तास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत होते. या शस्त्रक्रियेदरम्यान रक्ताच्या 16 बाटल्या चढवाव्या लागल्या. डॉक्टरांनी त्यांचा कापलेला तळहात जोडला होता.

शस्त्रक्रियेनंतर 18 तासांनी जोसेफ शुद्धीवर आले. तोपर्यंत दवाखान्यात टीव्ही रिपोर्टर्स आले होते, संपूर्ण दवाखाना गजबजून गेला होता. शिक्षकावर हल्ला झाल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. 35 दिवसांनंतर ऑगस्ट महिन्यात जोसेफ यांना डिस्चार्ज मिळाला. त्यातले 11 दिवस तर अतिदक्षतेतच गेले.
प्राध्यापक असलेले जोसेफ सांगतात, "माझा गुन्हा फक्त एवढाच होता की, मी परीक्षेत एक प्रश्न टाकला होता. काही लोकांना वाटलं मी इस्लामचा अपमान केलाय. याचा परिणाम, माझं संपूर्ण आयुष्य उद्धवस्त झालं."
हल्ल्याच्या चार महिने आधी म्हणजे 26 मार्चला सकाळसकाळी जोसेफ यांचा फोन वाजला. रात्री ते शांत झोपले होते पण सकाळी त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं.
फोनवर न्यूमन कॉलेजचे प्राचार्य होते. हे कॉलेज स्थानिक रोमन कॅथलिक चर्चद्वारे चालवलं जातं. जोसेफ यांच्या 25 वर्षांच्या अध्यापनाच्या कारकिर्दीत न्यूमन कॉलेजमध्ये त्यांची तिसरी नोकरी होती. ही नोकरी मिळवून त्यांना दोनच वर्ष झाले होते.
जोसेफ सांगतात, प्राचार्यांनी त्यांना सांगितलं की कॉलेजच्या मैदानावर पोलिसांची गर्दी जमलीय, तुम्ही कॉलेजला येऊ नका.
"तुम्ही आलात तर काहीतरी अघटित घडेल," असा इशाराही प्राचार्यांनी दिला.
यावर जोसेफ यांनी प्राचार्यांना विचारलं की, "का? मी काही चुकीचं केलेलं नाही."

यावर प्राचार्य म्हणाले की, "तुमच्याकडून पैगंबरांचा अपमान झाल्याची चर्चा आहे आणि तशा आशयाचे पोस्टर्स पण कॉलेजच्या भिंतीवर चिटकवले आहेत."
यात आक्षेपार्ह काय होतं? तर जोसेफ यांनी फिल्ममेकर पीटी कुंजू मुहम्मद यांनी लिहिलेल्या पटकथेवरील पुस्तकातून 'गॉड अँड ए मॅड मॅन' हा काल्पनिक संवाद घेतला होता. या संवादात विरामचिन्हं द्यायची होती.
त्या संवादाला दिग्दर्शकाचं आडनाव मोहम्मद वरून 'मॅड मॅन' मोहम्मद असं नाव देण्यात आलं.
जोसेफ सांगतात, "मोहम्मद हे नाव मुस्लिमांमध्ये कॉमन असतं. त्यावरून कोणी प्रेषित मोहम्मद असल्याचा गैरसमज करून घेईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं."
बत्तीस विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात चार मुस्लिम मुलं होती. त्यातल्या कोणीही आक्षेप घेतला नव्हता. मात्र एका विद्यार्थिनीने यावर आक्षेप घेतला.
तणाव वाढू लागला तसा पोलीस कॉलेजमध्ये आले. त्यांनी आंदोलकांना गेटवरचं रोखलं. शहरात परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. काही जमावांनी शहरातली दुकानं बंद करायला लावली होती. कॉलेजने प्राध्यापक असलेल्या जोसेफ यांचं निलंबन केलं.
जोसेफ म्हणतात की, "कोणतीही पूर्वसूचना न देता या लोकांनी मला उघडं पाडलं होतं."
जोसेफने यांनी त्यांची पत्नी सलोमीला कपडे भरायला सांगून शहर सोडण्यासाठी बस पकडली.

पुढचे काही दिवस जोसेफ आणि त्यांची पत्नी सलोमी एका गावातून दुसऱ्या गावात भटकत राहिले. त्यांच्या शहरात काय सुरू आहे याचा अंदाज त्यांना टिव्हीवरून येतच होता.
जोसेफ यांना शोधण्यासाठी पोलिसांची चार पथक रवाना झाली होती. वडिलांच्या ठावठिकाणाविषयी माहिती मिळावी म्हणून त्यांच्या 22 वर्षांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
सहा दिवसांनंतर जोसेफ पोलिसांना शरण आले.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन एका कोठडीत डांबलं. त्या कोठडीत 15 जण होते ज्यांना खून आणि बेकायदेशीर दारू विकल्याचा आरोपाखाली जेरबंद करण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा पासपोर्ट, बँकेची कागदपत्र आणि इतर गोष्टी जप्त केल्या. त्यांच्यावर ईशनिंदेचा आरोप ठेवण्यात आला.
जोसेफ यांच्या कॉलेज प्रशासनाने या प्रकरणानंतर जाहीर माफी मागितली. कॉलेज प्रशासनाने त्यांच्यावरील आरोपांची यादी पाठवली होती. यात सर्व धर्मांच्या, विशेषतः मुस्लिम अनुयायांच्या भावना दुखवल्याचं म्हटलं होतं.
तुरुंगात जवळपास आठवडा काढल्यावर जोसेफ यांना जामीन मिळाला. त्यानंतर ते आपल्या सासरी राहू लागले. घराबाहेर पडताना सुद्धा ते सावधगिरी बाळगायचे.
जोसेफ सांगतात की, त्यांना आधीच अंदाज होता की काही धर्मांध त्यांना मारण्याचा प्रयत्न करतील.
जोसेफ यांचा माग काढणाऱ्या इसमांनी तीनदा वेगवेगळ्या वेशात येऊन जोसेफ यांना मारण्याचा कट रचला आणि एका कटात जोसेफ फसले.
एकदा सहा जण जोसेफ यांच्या घराच्या गेटवर आले. जोसेफ यांच्या घरातील सदस्यांनी त्यांच्याजवळ विचारपूस केली असता, ते म्हणाले आम्ही विद्यार्थी आहोत आणि आम्हाला कॉलेजच्या मासिकासाठी जोसेफ यांच्याकडून आठवण लिहून हवीय.

दुसऱ्यावेळी काही मुलं त्यांच्या दारात आले. त्यांच्यातला एकजण जोसेफ यांना म्हणाला की, मला माझ्या मुलीच्या किडनीच्या उपचारासाठी काही पैसे हवे आहेत. त्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ आणलाय असं म्हणत जोसेफ यांच्या हातात एक बंद लिफाफा ठेवला.
"मी तो लिफाफा हातात घेतला आणि दोन पावलं मागे गेलो. त्या लिफाफ्यावर माझं नाव लिहिलं होतं. मला वाटलं तो लेटर बॉम्ब असावा म्हणून मी तो त्यांना परत केला आणि घरात जाऊन दरवाजा बंद केला."
जोसेफ सांगतात, ते पुरुष गेटमधून बाहेर पडून त्यांच्या बाईकवर बसले. मला त्यांचे चेहरे निर्विकार दिसत होते.
"आता मला पक्की खात्री पटली होती की, या लोकांना मला जीवे मारायचं आहे. मी माझ्या शेजाऱ्याला फोन केला. त्यांनी मला घर सोडून जायला सांगितलं. पण मी माझं कुटुंब आणि माझ्या वृद्ध आईला सोडून जाऊ शकत नव्हतो. मला आता भीती वाटू लागली होती."
जोसेफ यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यावर आम्ही रात्री तुमच्या घराभोवती गस्त घालू तुम्ही निश्चित रहा असं म्हणून पोलीस सांगून निघून गेले.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील एका दुपारी ते इसम पुन्हा आले.
त्यांच्यापैकी एकाने दारावरची बेल वाजवली आणि बँकेतून आलोय असं सांगितलं. त्यातल्याच एकाने सांगितलं की, आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत. ते घरोघरी जाऊन जोसेफ कुठे राहतो, असं विचारत होते.
त्या दोघांनी घराभोवती एक चक्कर मारली आणि नंतर त्यांच्या बाईकवरून निघून गेले आणि जोसेफ यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
त्या दिवसापासून जोसेफ यांनी आपल्या तीन बेडरूमच्या घराचे दरवाजे घट्ट करून घेतले. गेटला लॉक लावून घेतलं. त्यांच्या घरातलं कोणीतरी नेहमीच रस्त्याकडे लक्ष ठेऊन असायचं.
जोसेफ यांनी एका लोहाराकडून चाकूच्या आकाराचे कोयते बनवून घेतले होते. ते त्यांनी आपल्या हॉलमध्ये पडद्याआड लपवले होते.
पण जुलैच्या त्या दुर्दैवी सकाळी काळाने त्यांच्यावर घाला घातलाच. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी 31 जणांना ताब्यात घेतलं.

फोटो स्रोत, Getty Images
हे सर्वजण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेशी संबंधित होते. 2006 साली स्थापन झालेल्या या मुस्लिम संघटनेचे दहशतवादी गटांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली या संघटनेवर गेल्या महिन्यात पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. पण संघटना हे आरोप नाकारते.
हल्ल्यात सामील असलेल्या 13 जणांना दोषी ठरवण्यात आलं. त्यातल्या 10 जणांना आठ वर्षांचा तुरुंगवास झाला. तर दोन जणांना सौम्य शिक्षा द्यावी म्हणून त्यांनी अपील केली होती. मात्र या अपिलावर सुनावणी अजूनही बाकी आहे.
तर उरलेल्या 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर अजून खटला सुरू आहे. यात 400 साक्षीदारांकडून पुरावे मिळणं अपेक्षित आहे. ही घटना होऊन एक दशकाचा काळ लोटला पण खटला अजूनही सुरूच आहे. प्राध्यापक जोसेफ यांना दोषींकडून 8 लाख रुपये मिळणं अजून बाकीचं आहे.
ही घटना घडली तेव्हा जेकब पुन्नूज केरळ पोलीस दलाचे प्रमुख होते. ते म्हटले की, हा हल्ला अतिशय सुनियोजित होता आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी असा कट पाहिला नव्हता.
ते सांगतात, "यासाठी सर्वकाही पद्धतशीरपणे प्लॅनिंग करण्यात आलं होतं. त्यांनी व्हिक्टीमची ओळख पटवली. त्यानंतर हल्ल्यासाठी ठिकाण नियोजित केलं. यासाठी सर्वप्रकारची खबरदारी घेण्यात आली. हल्ल्यासाठी तीन वाहनं वापरण्यात आली."
हल्ल्याचा कट रचण्यासाठी हे इसम किमान चार वेळा एकत्र आले होते. त्यांनी जोसेफ यांच्यावर घरीच असताना हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पण तो डाव फसला. त्यानंतर या हल्लेखोरांनी एक मिनीव्हॅन विकत घेतली, त्यासाठी खोट्या नंबर प्लेट बनवल्या. जोसेफ चर्चला कसे जातात तो रस्ता हेरला.
पुन्नूज सांगतात, "हे हल्लेखोर इतके हुशार होते की त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणी जे मोबाईल फोन आणि सिमकार्ड्स वापरले ते नवीन घेतले होते. पण यातल्या एकाने एक छोटी चूक केली होती. त्याने त्या नवीन सिमकार्डवरून एका रँडम नंबरवर कॉल केला होता आणि आम्हाला तो नंबर मिळाला."
"हा माफिया स्टाईल अटॅक होता. आमचं नशीब जोरावर होतं म्हणून आम्हाला या केसचा उलगडा लवकर झाला."
पण जोसेफ यांच्यासाठी आता खरी परीक्षा सुरू झाली होती. ऑगस्ट 2010 मध्ये जोसेफ यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. पण कॉलेजने त्यांना निलंबित केलं होतं.
केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू होता. त्यांच्या उपचारासाठी शिक्षकांनी पैसे उभे केले. लोकांनी त्यांना समर्थन देणारी सहानुभूतीची पत्रं पाठवली. मोठमोठ्या साहित्यिकांनी, उच्च पदस्थ लोकांनी या हल्ल्याचा निषेध केला. दोन मुलांनी तर त्यांच्या कॉलेजबाहेर उपोषण सुरू केलं.
एका स्थानिक वृत्तपत्रात संपादकीयमध्ये छापून आलं होतं की, "या प्राध्यापकावर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी आहे. मात्र असंवेदनशील लोकच त्यांच्या विदारक परिस्थितीकडे दुर्लक्ष करू शकतात, त्यांना कामावरून कमी करू शकतात."
त्यानंतर जोसेफ यांच्या आयुष्यातील गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या. 2010 आणि 2011 मध्ये त्यांच्या हातापायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या उजव्या हाताच्या संवेदना निघून गेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी डाव्या हाताने लिहिण्याचा, खाण्याचा सराव सुरू केला.
या सगळ्या परिस्थितीनंतर ही त्यांच्या कुटुंबाचा संघर्ष संपला नव्हता. मुलांच्या शिक्षणासाठी जे कर्ज घेतलं होतं, त्यासाठी जोसेफ यांच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते. त्यांची पत्नी एका दुकानात काम करायला जायची. सरकारमार्फत ज्या योजना सुरू होत्या त्याही योजनेत त्या काम करायच्या.
2013 मध्ये न्यायालयाने त्यांच्यावरील ईशनिंदेचे आरोप फेटाळून लावले. तेव्हा कुठे प्राध्यापक जोसेफ यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आशेचा किरण दिसला. न्यायालयाने निकाल देताना म्हटलं की, "इथं कुठंही ईशनिंदा झालेली नाही, प्रश्न न समजल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता."
हे सगळं घडत असतानाच चार वर्षे उलटून गेली होती, पण या काळात जोसेफ यांच्या हाताला नोकरी नव्हती. पण न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात काही क्षणांसाठी का होईना पण आनंद निर्माण झाला होता.
प्रोफेसर जोसेफ यांनी बीबीसीला सांगितलं की, "या सगळ्या काळात माझी पत्नी डिप्रेशनमध्ये गेली होती. तिला सतत आत्महत्येचे विचार यायचे."

यामुळे त्यांनी त्यांच्या घरातील सर्व कीटकनाशक फेकून दिली. घरातले चाकू सुरे लपवले. आणि घरात जी काही औषध होती ती कडीकुलूपात बंद करून ठेवली.
पण हे सगळं करूनही काहीच सध्या झालं नाही. 2014 च्या मार्च महिन्यात सलोमी यांनी दुपारच्या जेवणानंतर आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र सगळीकडेच संतापाची लाट उसळली. या सगळ्या घटनेला कॉलेजला जबाबदार धरण्यात आलं.
त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर तीन दिवसांतच त्यांना कॉलेजवर पुन्हा बोलावून घेतलं. त्यांच्या निवृत्तीला फक्त तीनच दिवस उरले होते.
मात्र केरळच्या स्थानिक कॅथॉलिक चर्चने एका धार्मिक सभेत म्हटल्याप्रमाणे, "जोसेफ यांचा प्रश्न ईशनिंदा आणि धर्माचा अपमान करणारा होता. यामुळे एका विशिष्ट धर्मातील विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या."
या धर्मसभेने जोसेफ यांना सार्वजनिक दबावाखाली नव्हे तर मानवतावादी दृष्टिकोनातून दया दाखवत कामावर परत ठेऊन घेतलंय.
निवृत्ती जवळ आल्यावर जोसेफ यांना कामावर रुजू करून घेण्यात आलं.
प्राध्यापक जोसेफ यांची निवृत्ती जवळ आली असतानाही ते कामावर रुजू झाल्यामुळे त्यांना पगाराची सर्व थकबाकी आणि सेवानिवृत्तीनंतरच्या सुविधा मिळतील. नंतर एका पाद्रीने जोसेफ यांच्या समर्थनार्थ बुलेटिन काढलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, या एका घटनेमुळे जोसेफ यांचं जीवन नरकासमान झालं आहे.
जोसेफ सांगतात, "मी एखाद्या योध्याप्रमाणे हल्ल्याचा सामना केला. पण सलोमीच्या मृत्यूनंतर मला खूप त्रास झाला आणि अजूनही होतोय."
आता प्राध्यापक जोसेफ यांचा नवा जन्म झालाय असं म्हणता येईल. ते सांगतात, "मी एक लेखक म्हणून पुनर्जन्म घेतलाय."

त्यांनी त्यांच्या डाव्या हाताने 700 पानांचं 'अ थाउजंड कट्स' नावाचं पुस्तक लिहिलंय. गेल्या वर्षी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असून आत्तापर्यंत या पुस्तकाच्या 30 हजार प्रतींची विक्री झालीय.
शिवाय त्यांनी 'स्लिमर, मोस्टली सॅटिरिकल' नावाचा सिक्वेलही आणलाय. आता ते लघुकथांवर एक पुस्तक लिहिण्याच्या विचारात आहेत.
आता त्यांचं कुटुंब वाढलंय आणि घरही. निवृत्तीनंतर त्यांना जे पैसे मिळाले त्यातून त्यांनी घरावर एक मजला चढवला. ते आता त्यांच्या 95 वर्षांच्या आई आणि 35 वर्षाच्या मुलासोबत राहतात. त्यांचा मुलगा स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये आर्थिक सल्लागार म्हणून काम करतो.
त्यांची सून इंजिनिअर आहे आणि त्यांना एक तीन वर्षांचा नातू देखील आहे.
त्यांची मुलगी आयर्लंडला असते. ती तिथं नर्स म्हणून काम करते आणि तिने तिथंच एका भारतीय नर्सशी लग्न केलंय. तिला दीड वर्षांचा मुलगा आहे. जोसेफ आयर्लंडलाही जाऊन आलेत.
जोसेफ यांची बहीण नन झालीय. जेव्हा कारमध्ये हल्ला झाला होता तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची बहीणदेखील होती. त्या अनेकदा आपल्या भावाला भेटायला जात असतात.
जोसेफ यांच्या आयुष्यात आता काय सुरू आहे?
आज डेनिम जीन्सवर शर्ट घालून, डोळ्यांवर चष्मा लावलेल्या जोसेफ यांच्याकडे पाहिलं तर वाटत नाहीत की ते 64 वर्षांचे आहेत. त्यांना मागच्या दहा वर्षात भयानक परिस्थितीला सामोरं जावं लागलंय असंही त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवतं नाही. जोसेफ यांचे वडील शेतकरी तर आई गृहिणी होती. ते खूप तल्लख होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा धीरगंभीरपणा जाणवतो.
जोसेफ बीबीसीशी बोलताना सांगतात की, "ज्यांनी माझ्यावर हल्ला केलाय त्यांना मी माफ केलंय. ते एका मोठ्या खेळातले प्यादे होते." तसेच त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या पीएफआय या संघटनेवर बंदी घातल्याबद्दल ते आनंदी आहेत.
पण संथ गतीने सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा ते अजूनही सामना करत आहेत.
ते म्हणतात, "जेव्हा केव्हा या प्रकरणातला एखादा व्यक्ती पकडला जातो तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठी मला जावं लागतं. सतत कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. हल्ल्याच्या त्या सगळ्या आठवणी परत आठवाव्या लागतात."
या हल्ल्यानंतर अशी कोणती आठवण आहे जी खास आहे असं जोसेफ यांना बीबीसीने विचारलं तेव्हा ते म्हटले, ते त्यांच्या कुटुंबासोबत केरळमध्येच एकेठिकाणी फिरायला गेले होते. तिथं त्यांना त्यांचा एक विद्यार्थी आणि त्याची आठ वर्षांची मुलगी भेटली.
त्या विद्यार्थ्यांने माझी ओळख करून देत मुलीला सांगितलं की, "हे जोसेफ सर आहेत आणि यांच्यासोबतच एक दुर्दैवी घटना घडली होती."
त्यावर ती मुलगी तिच्या वडिलांना म्हणते, "हे तेच सर आहेत का? ज्यांचा हात कापल्यावर तुम्ही खूप रडला होतात."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)




