उमेश कोल्हे हत्या प्रकरणात 11 आरोपींविरोधात चार्जशीट दाखल

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून
अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे प्रकरणात आज ( 20 डिसेंबर रोजी ) चार्जशीट दाखल केले आहे. या हत्या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. 11 जणांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
मुदस्सीर अहमद, शाहरूख खान, अब्दुल तौफिक शेख, मोहम्मद शोएब, अतीब रशीद, युसुफ खान, इरफान, अब्दुल अरबाज, मुशफीक अहमद, शेख शकील, शहीम अहमद यांच्याविरोधात हे आरोपपत्र ठेवण्यात आले आहे. उमेश कोल्हेंनी नुपूर शर्मा प्रकरणानंतर कथितरित्या व्हिडिओ टाकला होता. त्याच्या निषेधार्थ आरोपींनी कट रचून कोल्हेंची निर्घृणपणे हत्या केल्याचे तपासात आढळले असल्याचे NIA ने म्हटले आहे.
याआधी कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. शेख इरफान शेख रहीम असं या आरोपीचं नाव आहे. 35 वर्षीय इरफान हा अमरावतीच्या पठाण चौक येथील रहिवासी आहे. इरफानला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
NIA करणार तपास
उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
11 दिवसांपूर्वी अमरावतीत उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. काही भाजप नेत्यांनी आरोप केला होता की या हत्येचे धागेदोरे नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहेत. काही दिवसांपूर्वी उदयपूरमध्ये झालेली एका टेलरची हत्यासुद्धा याच प्रकरणाशी निगडित असल्याचं पोलिसांचं म्हणणं होतं.
त्यामुळे आता अमरावतीच्या आणि जोधपूरच्या प्रकरणाचा थेट काही संबंध आहे का, याचा तपास NIA करणार आहे.
उमेश कोल्हे यांचं अमरावतीच्या तहसील कार्यालयाजवळ रचना श्री मॉलमध्ये अमित व्हेटर्नरी नावाचं एक मेडिकल दुकान आहे. 21 जूनच्या रात्री ते मेडिकल दुकान बंद करून ते घरी निघाले होते. 51 वर्षीय उमेश कोल्हे एका गाडीवर होते तर त्यांचा मुलगा संकेत आणि पत्नी वैष्णवी दुसऱ्या गाडीवर सोबत होते.
तेव्हा रात्री 10.30च्या सुमारास चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांना गाठलं, उमेश यांचा चाकूने गळा कापला आणि पळून गेले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या उमेश याना मुलगा संकेत यांनी तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्ला झाले तेव्हा उमेश कोल्हे यांच्या खिशात 35 हजार रुपयाची रोकड होती. मात्र हल्लेखोरांनी त्याला हातही लावला नाही. त्यामुळे ही हत्या पैसे लुटण्यासाठी नव्हती, एवढं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं होतं.
आता अमरावती पोलिसांनी एक पत्रक काढून हे सांगितलंय, की उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर पोस्ट टाकली होती. त्या अनुषंगाने तपास केल्यानंतर ही घटना त्याच प्रकाराशी संबंधित असल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेले असून त्याच दिशेने आता तपास केला जातोय.
पोस्ट व्हायरल झाली
औषधी दुकानाचा व्यवसाय असलेले उमेश कोल्हे 'ब्लॅक फ्रिडम' नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय सदस्य होते. या ग्रुपमध्ये हिंदुत्ववादी स्वरूपाच्या पोस्ट जास्त शेयर व्हायच्या. काही दिवसांपूर्वी उमेश कोल्हेंनीसुद्धा नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारी एक पोस्ट इथे टाकली होती.
अमरावती पोलिसांना संशय आहे की हीच पोस्ट ग्रुपच्या बाहेर व्हायरल झाली असावी किंवा कोल्हे यांच्या हातून चुकून एका मुस्लिम ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यामुळे उमेश कोल्हे यांच्यावर हल्ला झाला.

फोटो स्रोत, PTI
उमेश कोल्हे यांची हत्या त्यांनी नुपूर शर्मा यांच्या पोस्टला समर्थन केल्याने झाली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्या दिशेने तपास करून खरं काय उघड करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्याकडे केली होती.
अमरावती पोलिसांनी थोड्या वेळापूर्वी सातव्या आरोपीला नागपूरहून अटक केली असं अमरावती सिटी कोतवालीचे पोलीस इन्स्पेक्टर नीलिमा अराज यांनी सांगितलं.
अमरावतीचे पोलीस उपायुक्त विक्रम साळी सांगतात, "उमेश कोल्हे खून प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आलीय. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर प्रथमदर्शनी दिसून येतं की, उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जी पोस्ट केली होती त्या संबंधांनेच हा गुन्हा घडल्याचं निष्पन्न होत आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








