You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कर्नाटकः उसने पैसे न फेडल्याने 16 दलित मजूरांना खोलीत कोंडले, मारहाणीत महिलेचा गर्भपात
उसने घेतलेले पैसे न फेडल्याने 16 दलित मजूरांना कोंडून ठेवल्याचा प्रकार कर्नाटकच्या चिकमंगळूरू येथे समोर आला आहे.
एका खोलीत कोंडून संबंधित मजूरांचा अनन्वित छळ करण्यात आला.
यादरम्यान केलेल्या मारहाणीत एका महिलेचा गर्भपात झाल्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे.
या प्रकरणी कोंडलेल्या मजूरांनी यांनी येथील भाजप समर्थक जगदीशा गौडा आणि त्यांचा मुलगा तिलक गौडा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
सर्व संबंधित पीडित मजूर हे रोजंदारीवर काम करायचे. ते अनुसूचित समाजाशी संबंधित होते. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी दलित अत्याचार संदर्भातील (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं कळताच कारवाईच्या भीतीने गौडा पिता-पुत्र फरार झाले. सदर प्रकरणात त्यांचा शोध घेण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे.
भाजपने हात झटकले..
चिकमंगळुरू येथील दलित मजूरांवरील अत्याचाराचं प्रकरण समोर येताच त्याचा संबंध सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी जोडण्यात येत असल्याने कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं दिसून आलं.
मात्र, भाजपने या प्रकरणाशी आपला कोणताच संबंध नसल्याचं सांगत हात झटकले आहेत.
"जगदीशा गौडा हा भाजपचा कार्यकर्ता किंवा साधा सदस्यही नव्हता. तो फक्त भाजपचा समर्थक होता. इतर कोणत्याही मतदाराप्रमाणेच तो भाजपचा मतदार होता," असं स्पष्टीकरण भाजप प्रवक्ते वरसिद्ध वेणूगोपाल यांनी दिलं.
नेमकं काय घडलं?
चिकमंगळुरू येथील जेनुगड्डे गावातील कॉफी मळ्यात वरील सर्व मजूर कामास होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मजूरांनी गौडा यांच्याकडून 9 लाख रुपये उसने घेतले होते. पण त्याची परतफेड करणं न जमल्याने त्यांना गौडा यांनी डांबून ठेवलं. याशिवाय मालकाकडून मजूरांवर अनेक अत्याचार करण्यात येत होते."
एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "8 ऑक्टोबर रोजी या मजूरांचे काही नातेवाईक येथील बेलहोन्नूर पोलीस ठाण्यात गेले. आपल्या नातेवाईकांवर जगदीशा गौडाकडून अत्यावर होत असल्याची तक्रार या लोकांनी त्यावेळी केली. पण त्याचदिवशी काही वेळाने ही तक्रार मागे घेण्यात आली."
"या घटनेच्या दुसऱ्या दिवशी वरील या गरोदर महिलेला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर चिकमंगळुरूच्या पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. अधीक्षकांच्या सूचनेनुसार आम्ही गुन्हा नोंद केला आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्याठिकाणी एका खोलीत 8 ते 10 जणांना कोंडून ठेवलेलं असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी याबाबत विचारणा करून त्या मजूरांची मुक्तता केली.
संबंधित सर्व जणांना 15 दिवसांपासून त्या खोलीत डांबून ठेवण्यात आलेलं होतं.
यामध्ये चार कुटुंबं असून एकूण 16 जणांना एका खोलीत कोंडून ठेवण्यात आलं होतं.
गर्भपात झालेल्या महिलेचं नाव अर्पिता असं आहे. NDTV शी बोलताना त्या म्हणाल्या, "मला एक संपूर्ण दिवस डांबून ठेवण्यात आलं. मला आणि माझ्या पतीला मारहाण-शिवीगाळही करण्यात आली. माझा फोनदेखील जप्त करण्यात आला."
अर्पिता ही दोन महिन्यांची गरोदर होती. तिला केलेल्या जबर मारहाणीमुळेच तिचा गर्भपात झाला, असा आरोप तिच्या आईने माध्यमांशी बोलताना केला आहे.
चिकमंगळुरूच्या पोलिस अधीक्षक उमा प्रकाश म्हणाल्या, "मजूरांनी जगदीशा गौडा यांच्याकडून पैसे उसने घेतलेले होते. पैसे घेतलेल्यांपैकी काही जण पळून गेले. त्यामुळेच गौडा यांनी इतर सर्वांना एका खोलीत कोंडून मारहाण सुरू केली होती, अशी तक्रार पीडित कुटुंबीयांकडून देण्यात आलेली आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)