You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्यांचे साइड इफेक्टस काय असतात?
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी
"हो, घ्याव्या लागतात ना गोळ्या. आता परवाच घेतली आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती म्हणून," घरकाम करणारी 27 वर्षांची कल्याणी सांगते.
कल्याणीला दोन मुलं आहेत. तिच्या सासूबाई देवाचं खूप करतात. घरात दुसरी कोणी सवाष्ण बाई नसल्याने घरात पूजाअर्चा असेल तर कल्याणीलाच सगळी कामं करावी लागतात. अशात तिची पाळी आली तर मग कठीणचं.
अशावेळी पाळी आली तर तिच्या घरच्यांची चिडचिड व्हायची आणि मग कल्याणीला खूप टोमणे ऐकावे लागायचे.
पण काही वर्षांपूर्वी, गुलबकावलीचं फुल सापडावं आणि सगळ्या समस्या दूर व्हाव्यात अशी गोष्ट सापडली. ती गोष्ट म्हणजे पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या.
"सणवार काय कमी असतात का या सिझनमध्ये. माझ्या घरच्यांचं सोवळं-ओवळं कडक आहे. बरं, ज्यांच्या घरी मी काम करते त्या बायकाही विचारतात, गौरी-गणपतीच्या काळात पाळी तर नाही ना?"
"त्यांचंही बरोबर आहे. खोटं कसं बोलणार देवाच्या कामाला? मग त्या म्हणतात येऊ नको. कधी कधी तर पैसेही बुडतात. मग या सगळ्यांपेक्षा गोळ्या घेतलेल्या काय वाईट?" कल्याणी विचारते.
ऑगस्ट महिन्यापासून सणांचा सिझन सुरू होतो. फुलं, पूजेचं साहित्य, सत्यनारायणाच्या पोथ्या, धूप-अगरबत्ती आणि मिठाई यांच्याबरोबरच आणखी एका गोष्टीची मागणी खूप वाढते, ती म्हणजे पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या.
"गणपती-महालक्ष्म्यांच्या काळात या गोळ्यांची मागणी प्रचंड वाढते. बायका खास करून याच काळात या गोळ्या घेतात. दिवसाला कमीत कमी 10-15 स्ट्रीप्स जातात," राजू झोरे सांगतात.
बुलडाण्यातल्या देऊळगाव राजात त्यांचं मेडिकल स्टोअर आहे. त्यांनी दिलेल्या माहितीवरून लक्षात येतं की फक्त शहरांतच नाही तर खेडोपाडीही या गोळ्यांचं प्रस्थ वाढलेलं आहे.
कारण एकच, सणावाराच्या काळात घरात 'विटाळ' नको. भारतासारख्या देशात अजूनही मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही.
मासिक पाळीच्या काळात महिलांवर अनेक बंधनं असतात. अनेक राज्यांमध्ये अजूनही पाळीच्या काळात महिलांना घराबाहेर वेगळं बसावं लागतं, थंडी-वाऱ्यात गोठ्यात झोपावं लागतं. अशात धार्मिक कार्यांमध्ये सहभागाची तर बातच नको.
पण धार्मिक कार्यांची, सणावारांची सगळी जबाबदारी तर घरातल्या बायकांवरच असते. अशात त्यांची पाळी आली तर मग ढीगभर कामांची उस्तवार कोण करणार? ती उस्तवार करण्यासाठी बाई 'मोकळी' राहावी म्हणून विज्ञान आहे ना मदतीला.
सणावारात, पूजेअर्चेत पाळीचं 'विघ्न' नको म्हणून महिला या गोळ्या सर्रास आणि सतत घेतात.
"आमच्याकडे या गोळ्या घेण्यासाठी येताना महिला कोणत्याही डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन आणत नाहीत. सहसा त्यांनी डॉक्टरला काही विचारलेलं नसतं. त्यांच्या घरी काही कार्य असलं की, त्या गोळ्या घेतात. सहसा तीन गोळ्या पुरतात, पण आजकाल बायका सहा-सात गोळ्याही घेऊन जातात एका वेळेस," राजू सांगतात.
या गोळ्यांचे काही साईड इफेक्ट?
नाशिकच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. गौरी पिंप्राळकर म्हणतात, "या गोळ्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रेकमेंड करत नाहीत."
त्या पुढे सांगतात, "इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टोरॉन असे दोन हार्मोन्स स्त्रियांच्या शरीरात असतात, त्यावर पाळीचं चक्र आधारित असतं. पाळी उशिरा यावी म्हणून या हार्मोन्सच्याच गोळ्या घ्याव्या लागतात. एका परीने या गोळ्या हार्मोन्सच्या चक्रावर परिणाम करतात.
नैसर्गिकरित्या चाललेलं पाळीचं चक्र पुढेमागे केल्याचे अनेक वाईट परिणामही होऊ शकतात.
या हार्मोन्सचं सातत्यानं अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा केसेस आम्हाला पाहायला मिळतात. पाळी लांबवण्यासाठी बायका दहा-पंधरा दिवस या गोळ्या घेत राहतात. त्याही हाय डोसमध्ये. त्याचे परिणाम फार घातक असतात."
या गोळ्या कोणी घेऊ नयेत?
डॉ. गौरी यांच्या मते या बायका कोणत्याही डॉक्टरला गोळ्या घेण्याआधी विचारत नाहीत. "या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतात. बायका त्यांच्या मनाने त्या गोळ्या घेतच राहतात."
कोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो.
महिला खेळांडूंना याचा त्रास होत नाही का?
स्पर्धांदरम्यान अनेक महिला खेळाडू पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. त्यांना याचा त्रास होत नाही का? याबद्दल बोलताना डॉ. गौरी सांगतात, "खेळाडूंची गोष्ट वेगळी असते. त्यांचं डाएट चांगलं असतं, त्यांचं शरीर सशक्त असतं, व्यायाम होत असतो, त्यामुळे त्यांच्यावर या गोळ्यांचे साईड इफेक्ट होण्याची शक्यता कमी असते.
या खेळाडू काही पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या वारंवार घेतातच असंही नाही. पण धार्मिक कारणांसाठी पाळी पुढे ढकलणाऱ्या महिलांचं प्रमाण प्रचंड आहे आणि त्या या गोळ्या सतत घेत असतात."
हो, मी पाळीतही गणपतीच्या आरतीला जाते!
पाळीत महिलांना घराबाहेर बसवण्याचे प्रकार किमान शहरी भागात कमी झाले असले तरी धार्मिक कार्यांमध्ये पाळी सुरू असताना महिलांनी सहभागी होणं अजूनही निषिद्धच आहे. त्यामुळेच अनेक महिला या गोळ्यांचा वापर करताना दिसतात.
"देव असं म्हणत नाही की पाळीत माझी पूजा करू नका किंवा धार्मिक कार्य करू नका. त्यामुळे चुकीच्या समजुतींमुळे आरोग्याशी खेळू नका," असं डॉ. गौरी सांगतात.
मंदिर प्रवेश आंदोलनामुळे प्रकाशझोतात आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई याच मताच्या आहेत.
"मासिक पाळी ही अपवित्र नाही. ते निसर्गाचं देणं आहे. ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. बायका पाळीत मंदिरात जात नाहीत, सणावाराच्या वेळेस गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलतात, हे पूर्णपणे चुकीचं आहे.
मला अनेक गणपतींच्या आरतीचं बोलवणं असतं. तेव्हा माझी पाळी असेल तरी मी जातेच. मला काही असं सांगता येत नाही की माझी पाळी सुरू आहे तर मी येणार नाही. शिवाशिवी किंवा विटाळासारख्या कुप्रथा बंद व्हायला हव्यात आता," त्या नमूद करतात.
...असं धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही
मासिक पाळीच्या काळात महिलांनी धार्मिक कार्य करू नयेत असं कुठल्याही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही, असं प्रतिपादन केलं आहे पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी.
"पूर्वीच्या काळी महिलांना आराम मिळावा आणि स्वच्छता पाळली जावी म्हणून महिलांना बाजूला बसायची पद्धत होती. पण आता त्याची गरज नाही. समजा घरात एकटीच बाई असेल आणि तिची पाळी आली तर तिने नैवेद्याचा स्वयंपाक करू नये का? जरूर करावा."
"तसंही आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्यावर तुळशीपत्र किंवा दुर्वा ठेवतो, म्हणजेच ते पवित्र करून देवाला अर्पण करतो. मग पाळीतही नैवेद्य केला तरी हरकत नाही. पूजा करायलाही हरकत नाही."
"महिला जर गोळ्या घेऊन पाळी लांबवत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. एक लक्षात घ्यायला हवं की, देव रागवत नाही, शासन करत नाही, तो क्षमाशील आहे. त्यामुळे देव कोपेल असं सांगत धर्ममार्तंड जी भीती लोकांना घालतात, त्या भीतीपोटी लोकांनी, विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याचं नुकसान करू नये," असंही ते पुढे सांगतात.
'मी गोळ्या घेते पण मला त्रास झालेला नाही'
एक खाजगी कंपनीत उच्चपदावर काम करणारी मेघा सांगते की तिने घरच्या अशा कार्यांच्या वेळेस या गोळ्या घेतल्या, पण तिला काही साईड इफेक्ट जाणवलेला नाही.
"पाळीत पूजा नको असल्या गोष्टी मी मानत नाही पण माझ्या सासूबाई फार मानतात. त्यांच्या समाधानासाठी मी गोळ्या घेते. मध्यंतरी आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळेस सासूबाईंच्या सांगण्यावरून मी गोळ्या घेतल्या. मला काही त्रास झालेला नाही."
या गोळ्यांचे साईड इफेक्ट होतात की नाही यावरून तज्ज्ञांमध्ये मतंमतांतरं असली तरी फक्त जुनाट, कुप्रथांसाठी महिला त्यांच्या आरोग्याला असणारा संभाव्य धोका पत्करणार आहेत का हा प्रश्न आहेच.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)