मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:साठी दिल्लीत, राज्यासाठी नाही- आदित्य ठाकरे #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत गेले, महाराष्ट्रासाठी नाही- आदित्य ठाकरे

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दिल्लीचा दौरा करत आहेत. मात्र मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीत जात आहेत. ते महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत जात नाहीत",, असा हल्लाबोल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ते पुण्यातील तळेगावमधील जनआक्रोश आंदोलनात बोलत होते. फॉक्सकॉन हा प्रकल्प तळेगावात होणार होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये हलवण्यात आला. याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज तळेगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

"महाराष्ट्रातून तीन प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरूणांच्या हातातील रोजगार देखील बाहेर गेला. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनात रोष आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री स्वत:साठी दिल्लीला गेले. परंतु, राज्यासाठी ते दिल्लीला एकदाही गेले नाहीत".

"महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प वेगवेगळ्या राज्यात गेले मात्र त्यातील एकही प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही. त्यात फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील महाराष्ट्राबाहेर गेले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील तरुणांना मोठा उपलब्ध होणार होता. परंतु, या सरकारने तरुणांच्या तोंडातील घास हिरावून घेतला", अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

2. संजय पांडे सीबीआय कोठडीत

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज' (एनएसई) फोन टॅपिंगप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. पांडे हे याआधी 'ईडी'च्या कोठडीमध्ये होते. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची सीबीआय कोठडी ठोठावण्यात आली. पांडे यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

गेल्या 30 जूनला ते मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले होते. त्याआधी राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक होते. योग्य पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी सातत्याने त्यांची नाराजी बोलून दाखवली होती.

अवैध पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या सीईओ चित्रा रामकृष्णन यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या संगनमताने फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

NSE च्या 91 लोकांचे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चित्रा रामकृष्णन यांच्या सांगण्यावरून यांनी हे फोन टॅप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

पांडे यांच्याशी संबंधित iSec services private limited या कंपनीच्या माध्यमातून फोन टॅप करण्यात आले होते. ही कंपनी 2001 मध्ये स्थापन करण्यात आली होती.

त्यावेळी संजय पांडे पोलीस दलात नव्हते. त्यांनी पोलीस दलाचा राजीनामा दिला होता त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही आणि त्यांना पोलीस दलात परत बोलावण्यात आलं होतं. संजय पांडे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

3. वेदांता गुजरातला हे मविआचे पाप- बावनकुळे

"वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे", असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे म्हणाले.

आदित्य ठाकरे हे खोटारडे असून त्यांनी राज्य सरकारवर केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे. वेदांता प्रकल्प हा तळेगावातच होणार होता तर त्यासाठी घेतलेली जागा त्यांनी दाखवून द्यावी असे आव्हानच त्यांनी आदित्य ठाकरे यांना दिले आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

"वेदांता प्रकल्प हा मविआ च्या काळातच गुजरातला गेला. दरम्यानच्या काळात सत्तेसाठी पैसा आणि त्याच पैशातून सत्ता असे समीकरण होते. आता आंदोलने करुन जनतेची फसवणूक केली जात आहे. आंदोलन म्हणजे इव्हेन्ट मॅनेजमेंट झाले आहे. केवळ सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ही आंदोलने होते आहेत", असं ते म्हणाले.

4. समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्स्प्रेस वे

'नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा एक्सप्रेस वे बनविण्याचा राज्य सरकार विचार करीत आहे. या माध्यमातून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनॉमिकल कॉरिडॉर' विकसित करण्यात येणार आहे' अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.

नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ (नरेडको) या संस्थेतर्फे हॉटेल ली-मेरिडियन येथे पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

"नागपूर हे शहर लॉजिस्टिक हब म्हणून पुढे येणार आहे. नागपूर, वर्धा या ठिकाणी पुढील काळात मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होणार आहे. भारतातील प्रत्येक मोठ्या शहराला आठ ते दहा तासात नागपूर जोडले जाणार आहे. त्यामुळे या शहरात बांधकाम व्यावसायिक व विकासक यांना फार मोठी संधी आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा इकॉनोमिकल कॉरिडॉर म्हणून विकसित होत आहे. यापाठोपाठ विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र ते गोवा हा नवा इकॉनोमिकल कॉरिडॉर तयार होत आहे. याशिवाय नागपूर-दिल्ली आणि नागपूर-हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहे. त्यामुळे विदर्भात लवकरच नवे नागपूर, नवे वर्धा, नवे अमरावती अशी विस्तारित शहरे आकारास येतील".

5. भारतीय महिला संघाचा झूलनला विजयी निरोप

भारतीय महिला संघाने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या लढतीत विजय मिळवत मालिकेत निर्भेळ यश मिळवलं. या विजयासह भारतीय संघाने अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीला विजयी निरोप दिला. 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतर झूलन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली.

इंग्लंडच्या भेदक गोलंदीजापुढे भारतीय संघाचा डाव 169 धावांतच आटोपला. दीप्ती शर्माने 68 तर स्मृती मन्धानाने 50 धावांची खेळी केली. इंग्लंडतर्फे केट क्रॉसने 4 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. रेणुका सिंगने 4 तर झूलन आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा डाव 153 धावांतच संपुष्टात आला आणि भारतीय संघाने 16 धावांनी विजय मिळवला.

रेणुका सिंगला मॅन ऑफ द मॅच तर कर्णधार हरमनप्रीत कौरला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)