झूलन गोस्वामी : ईडन गार्डन्सवरची बॉल गर्ल ते जगातील पहिल्या क्रमांकाची गोलंदाज बनण्याचा प्रवास..

झुलन गोस्वामी

फोटो स्रोत, Gopalshoonya

    • Author, वंदना,
    • Role, टीव्ही एडिटर, बीबीसी न्यूज इंडिया

'चकदा एक्सप्रेस' म्हणजेच भारताची दिग्गज क्रिकेट खेळाडू झूलन गोस्वामी. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर झूलन आज आपल्या कारकिर्दीचा शेवटचा क्रिकेट सामना खेळणार आहे.

या निमित्ताने दोन दशकांपासून सातत्याने वेगवान धावणारी ही एक्सप्रेस आता विश्रांती घेईल.

ईडन गार्डन्स. भारताची क्रिकेट पंढरी. 29 डिसेंबर 1997 रोजी या मैदानावर जोरदार उत्साह होता. महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांदरम्यान त्यादिवशी खेळवला जात होता.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाज बेलिंडा क्लार्क चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत होती. याच सामन्यात सपोर्ट स्टाफमध्ये एक 15 वर्षीय भारतीय मुलगीही होती. बंगालच्या एका छोट्याशा गावातून ती बॉल गर्लचं काम करण्यासाठी याठिकाणी आली होती.

विश्वचषक स्पर्धेच्या त्या झगमगाटाने त्या मुलीच्या डोळ्यांतही एक स्वप्न जागवलं. एके दिवशी विश्वचषक स्पर्धा खेळण्याचं स्वप्न.

याच स्वप्नांच्या बळावर झुलन गोस्वामी नामक त्या मुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली.

आज 20 वर्षांच्या आपल्या लांबलचक कारकिर्दीतून झुलन निवृत्त होत आहे. महिला क्रिकेट विश्वातील सर्वश्रेष्ट क्रिकेटपटूंमध्ये झूलनचं नाव घेतलं जातं.

आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणी सांगताना झूलन म्हणते, "चकदा या बंगालच्या एका लहान गावात मी लहानाची मोठी झाले. घरच्या अंगणात सगळी मुले क्रिकेट खेळत असत. तिथे मी त्यांची बॉल गर्ल होते. अंगणाबाहेर चेंडू गेला की ते आणून द्यायचं माझं काम होतं. पण दुपारी सगळे झोपल्यानंतर मी एकटीच खेळत सराव करायचे."

"मी दहा वर्षांची होते. मला अजूनही आठवतं, 1992 सालची पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू होती. सचिन तेंडुलकरला टीव्हीवर खेळताना पाहणं अजूनपर्यंत आठवतं. सचिन-सचिनचा तो जयघोष जादुई होता. त्यावेळी विश्वचषकाच्या प्रसिद्धीसाठी ईट क्रिकेट, स्लीप क्रिकेट आणि ड्रीम क्रिकेट अशी एक जाहिरात यायची. आमच्या आयुष्यात तसंच काही झालं होतं."

झुलन गोस्वामी

फोटो स्रोत, Gopalshoonya

पण गावातील मुलांनी झूलनला आपल्यासोबत क्रिकेट खेळण्यास देणं सोपं नव्हतं.

याबाबत बोलताना ती म्हणते, "मुलं म्हणायची की मी अतिशय संथगतीने चेंडू टाकते. त्यामुळे एक तर अष्टपैलू खेळाडू बनणं किंवा चेंडू वेगाने टाकणं हे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी वेगवान गोलंदाजी करण्याचं आव्हान स्वीकारलं."

पण गावात कोणत्याच सोयीसुविधा नसल्याने झूलनने सरावासाठी कोलकात्याला जाणं सुरू केलं.

ती सांगते, "मी सकाळी लवकर उठून रेल्वे पकडून कोलकात्याला जायचे. प्रशिक्षणानंतर पुन्हा रेल्वेने घरी आणी मग शाळा. माझी गोलंदाजी आणि उंची पाहून तेथील प्रशिक्षकांनी मला गोलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

झूलनचे प्रशिक्षक स्वप्न साधू यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली. ते सांगतात, "गावकरी आणि झूलनचे कुटुंबीय तिच्या क्रिकेट खेळण्यावरून नाराज होते. हळूहळू झूलनने अकेडमीमध्ये येणंही बंद झालं. पण तिच्यातील क्षमता पाहून मी तिच्या गावी गेलो. झूलनला खेळू द्यावं, यासाठी सर्वांना राजी केलं."

आज झूलन जगातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. 2002 मध्ये आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी झूलन पुढे भारतीय संघाची कर्णधारही बनली होती.

ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार अयाज मेमन सांगतात, "झूलनला मिळालेलं यश पाहिलं. तर एक लक्षात येतं की लक्ष विचलित न करता फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केल्यास तुम्ही नक्की यशस्वी होता."

ते पुढे म्हणतात, "झूलन गोस्वामीची क्रिकेट कारकिर्द शानदार राहिली. तिच्या कारकिर्दीतील सातत्य पाहून तिच्यातील क्षमता आपण समजू शकतो. त्यावेळी महिला क्रिकेट खेळाडूंना कुणीच विचारत नव्हतं. पण झूलनने पराभव पत्करला नाही. आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर तिने हे यश संपादन केलं. आता तिला पाहून असं वाटतं की तिचा जन्म जणू काही क्रिकेट खेळण्यासाठीच झाला आहे."

झुलन गोस्वामी

फोटो स्रोत, Gopalshoonya

झूलनच्या क्रिकेट कारकिर्दीतील आकडेवारी पाहिली तर तिला नव-नवे विक्रम प्रस्थापित करण्याची सवय जडल्याचंही दिसून येईल.

महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी झूलन गोस्वामीच्या नावे आहे. आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तिने अनेकवेळा पहिलं स्थान पटकावलं. तर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही ती जगात पाचव्या क्रमांकावर आहे.

2007 साली वूमन्स प्लेअर ऑफ द ईअरचा पुरस्कार मिळवून झूलनने इतिहास रचला होता. हा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

पूर्वीच्या काळी मुलींचा क्रिकेटकडे ओढा नव्हता. पण गेल्या काही वर्षांत अनेक मुलींनी लहान-मोठ्या गावातून पुढे येऊन क्रिकेटमध्ये यश प्राप्त केलं आहे. हा बदल पाहून झुलनला समाधान वाटतं.

ती म्हणते, "मी अजूनही कोलकात्याच्या विवेकानंद पार्कमध्ये जात असते. तिथे अनेक मुली क्रिकेट खेळताना दिसून येतात. काही मुली तर इतक्या लहान आहेत, की त्यांना आपली किटबॅगसुद्धा उचलता येत नसेल."

1990 आणि 2000 च्या दशकात भारतात 'वूमन क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया' ही संस्था बीसीसीआयच्या अखत्यारित अद्याप नव्हती.

मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांसारख्या महिला खेळाडूंकडे या कालावधीत कशा प्रकारे अडचणींना तोंड द्यावं लागलं, याचे अनेक किस्से आहेत.

महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही.रमण यांच्यासोबत एका मुलाखतीत झूलन म्हणते, "महिला क्रिकेट असोसिएशनकडे अत्यंत कमी पैसा होता. महिला क्रिकेटपटू सामने खेळण्यासाठी लांबलचक रेल्वे प्रवास करायच्या. अनेकदा तर तिकिट आरक्षितही केलेलं नसायचं. विमान प्रवास करायचा झाल्यास किटबॅगचे पैसे स्वतःला द्यावे लागायचे.

"शिवाय मैदाने चांगली नसायची. चांगले शूज नसायचे. पण काहीतरी करून आम्ही काम भागवायचो. दिल्लीत तारक सिन्हा अनेक क्रिकेटपटूंना मदत करायचे. त्यावेळी त्यांनी आशिष नेहराचे बूट घेऊन दुसऱ्या एका व्यक्तीला दिली. त्या व्यक्तीचे शूज त्यांनी मला वापरण्यासाठी दिली होती."

तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती प्रचंड बदलली आहे. या प्रक्रियेदरम्यान झूलन यांच्यासारख्या खेळाडूंचं योगदान मोठं राहिलं आहे.

झूलनच्या सोबती खेळाडूच नव्हे तर विरोधी संघाच्या खेळाडूंनीही झूलनचं अनेकवेळा कौतुक केलेलं आहे.

पाकिस्तानची माजी कर्णधार राहिलेल्या सना मीरने भारताविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत. तसंच तिने अनेकवेळा झूलनसमोर फलंदाजी केली.

झूलनविषयी ती सांगते, "एक वेगवान गोलंदाज म्हणून ती एखाद्या फलंदाजाविरुद्ध आक्रमकपणे वाद करताना कधीच दिसून आली नाही. तिचं मैदानावरचं वागणं अतिशय मृदू होतं. 5 फूट 11 इंच उंचीची झूलन गोस्वामी गोलंदाजीला आल्यानंतर आमचे धाबे दणाणत असत. ती चेंडू फेकत असताना आम्हाला मान वर करून पाहावं लागत असे."

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

क्रीडा पत्रकार आदेश कुमार गुप्त यांच्या मते, "2002 साली झूलनने संघात स्थान मिळवलं, त्यावेळी खूपच कमी लोक महिला क्रिकेट पाहत असत. डायना एडुलजी आणि शांता रंगास्वामी यांच्यासारख्या बोटांवर मोजण्याइतपत खेळाडू त्यावेळी लोकांना माहीत होते. पुरुष संघाची आपल्या कित्येक नावे आठवतील. पण महिला खेळाडूंची नावे आपल्याला माहीत नसतात. त्यामुळे झूलनसारख्या खेळाडू महिला क्रिकेटचा खरा वारसा आहेत."

अयाज मेमन सांगतात, "झूलनने भारतीय क्रिकेट संघाला जागतिक नकाशावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युवा खेळाडूंसाठी ती एक रोल मॉडेल आहे."

काही महिन्यांपूर्वी झूलन गोस्वामीला ईडन गार्डन्स मैदानावर आमंत्रित करण्यात आलं होतं. ज्या मैदानावर तिने बॉल गर्लचं काम केलं तिथे तिला सामन्यापूर्वी परंपरेचा भाग असलेल्या प्रतिष्ठेचा असा घंटानाद करण्याचा मान देण्यात आला होता.

झुलन गोस्वामी

फोटो स्रोत, Gopalshoonya

2002 साली इंग्लंडविरुद्ध आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारी झूलन याच संघाविरुद्ध अखेरचा सामना खेळणार आहे.

मला अजूनही दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवरचा तो सामना आठवतो. पाकिस्तानविरुद्ध पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या भारतीय संघाला झूलनने जवळपास विजय मिळवूनच दिला होता. पण पावसामुळे हा सामना थांबवावा लागला. नंतर या सामन्यात पाकिस्तान संघाला विजयी घोषित करण्यात आलं.

मैदानावर आलेल्या एका पाकिस्तानी चाहत्याने त्यावेळी म्हटलं होतं, आम्ही जिंकलो असलो तरी झूलनने तिच्या कामगिरीने आज सर्वांचं मन जिंकलं आहे."

झुलन गोस्वामीची क्रिकेट कारकिर्द

  • पहिला सामना - 6 जानेवारी 2002
  • कसोटी सामन्यात 10 विकेट घेणारी सर्वात तरूण खेळाडू - 2006
  • ICC वूमन क्रिकेट प्लेअर ऑफ द ईयर - 2007
  • भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार - 2008
  • ICC एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकाची गोलंदाज - 2017 आणि 2019
  • कसोटी सामने - 12 विकेट - 44
  • एकदिवसीय सामने - 203, विकेट 253
  • टी-ट्वेंटी सामने - 68, विकेट - 56

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)