खासगी व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यास काय करावं?

17 सप्टेंबरच्या रात्री चंदीगडजवळील मोहालीमध्ये एका खासगी विश्वविद्यापीठाच्या मुलींचे खासगी व्हीडिओ व्हायरल झाल्यावरून वाद झाला आणि हा वाद आता वाढत चालला आहे.
शनिवारपर्यंत विद्यापिठाचं कॅम्पस विद्यार्थ्यांसाठी बंद करण्यात आलं आहे. विद्यापीठ प्रशासनाने गर्ल्स हॉस्टेलच्या वॉर्डनला निलंबित केलंय.
पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आलंय. यात आरोपी मुलगी आणि शिमल्यात राहणाऱ्या तिच्या मित्राचा समावेश आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हीडिओमध्ये विद्यापीठातील एक मुलगी हे स्वीकारताना दिसतेय की, तिने हॉस्टेलमधील मुलींचे आंघोळ करतानाचे व्हीडिओ शूट केले होते.
हे प्रकरण समोर आल्यानंतर यावर मोठी चर्चा सुरू झालीय की, महिलांनी ऑनलाईन क्राईमपासून कसा बचाव करावा आणि खासगीपणा कसा जपावा. स्वत: काही गोष्टींची खबरदारी घेतल्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुद्धा खासगीपणा जपता येऊ शकतो.
याबाबत सायबर सुरक्षाविषयक तज्ज्ञ जितेन जैन यांनी सोशल मीडियावर सक्रीय असताना काय काळजी घ्यावी, याबाबत सांगितलं.
काय करावं, काय करू नये?
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर खासगी फोटो/व्हीडिओ शेअर करणं टाळावं. कारण या फोटो/व्हीडिओंचा कुणीही कसाही वापर करू शकतो.
तुम्ही तुमच्या खासगी वेळात कुणालाही शूटिंग करण्याची, फोटो काढण्याची परवानगी देऊ नये.
सोशल मीडियावर तरीही तुम्ही फोटो शेअर करू इच्छित असाल, तर सोशल मीडिया अकाऊंटची प्रायव्हसी सेटिंग पब्लिक करू नका.

फोटो स्रोत, iStock
सेटिंग्ज अशी ठेवा की, तुमचा फोटो तुमचे मित्र किंवा त्यांच्याशी संबंधितच लोक पाहू शकतील. अनोळखी लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत.
ट्विटरवर अशा पद्धतीची सेटिंग केली जाऊ शकते की, तुमच्या परवानगीशिवाय कुणी तुम्हाला फॉलो करू शकत नाही. मात्र, अनेकजण असं करत नाही. सेटिंग्जला अधिकाधिक खासगी केल्यास तुमचं अकाऊंट अधिक सुरक्षित राहू शकतं.
खासगी व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यास काय करावं?
सुप्रीम कोर्टाचे वकील विराग गुप्ता सांगतात की, आयपीसी कलम 354-सी आणि आयटी अॅक्ट 66-ई अन्वये गुन्हा दाखल करता येतो.
- आयटी अॅक्ट 66-ई नुसार, जर कुणी व्यक्ती जाणीवपूर्वक खासगी फोटो काढत असेल आणि ते पब्लिश किंवा ट्रान्समिट करत असेल, तर त्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोन लाखांचा दंड भरावा लागू शकतो.
- जर कुणाही व्यक्तीचा खासगी व्हीडिओ समोर येत असेल, तर त्याबाबत सर्वांत आधी गुन्हा दाखल करा.
- ज्या प्लॅटफॉर्मवर हा व्हीडिओ पसरवला जात आहे, अशा प्लॅटफॉर्मकडेही व्हीडिओ हटवण्याची मागणी केली जाऊ शकते. या कंपन्यांच्या ग्रेव्हियन्स रिड्रेसल सिस्टम असतात, त्यांच्याकडे व्हीडिओ हटवण्याची मागणी केली जाऊ शकते. मात्र, त्यावर किती काळात कारवाई केली जाऊ शकते, याबाबत फ्रेमवर्क नाहीय. काही प्रकरणात केंद्र सरकार चार तासाच्या आत व्हीडिओ हटवू शकते, काही प्रकरणात 48 तास लागतात, तर काही प्रकरणात महिनाही लागतो.
2020 साली 'बॉईज लॉकर रूम'च्या वादावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत के.एन. गोविंदाचार्य यांनी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करत म्हटलं होतं की, "फेक न्यूज आणि गुन्हेगारी मजकुराचा सामना करण्यात फेसबुकसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अयशस्वी ठरतात. या कंपन्यानी आपल्या स्थानिक तक्रारदार अधिकाऱ्यांची माहिती दिली पाहिजे, जेणेकरून त्याच्याशी थेट संपर्क साधता येईल."
मात्र, या याचिकेला दिलेल्या उत्तरात फेसबुकने म्हटलं होतं की, "बॉईज लॉकर रूमसारखे ग्रुप फेसबुक हटवू शकत नाही. कारण हे आयटी अॅक्टअंतर्गत केंद्र सरकारच्या विवेकाधीन शक्तीच्या अधीन आहे."
अशावेळी या कंपन्या कंटेट किंवा अकाऊंट तेव्हाच हटवतात, जेव्हा यासाठी केंद्र सरकारकडून सांगितलं जाईल किंवा कोर्टाकडून आदेश दिला जाईल.
फेक अकाऊंट कसं ओळखावं?
अनेकदा असंही होतं की, एखाद्या फेसबुक अकाऊंटला मुलीचा फोटो लावलेला असतो, मात्र ते अकाऊंट एखाद्या मुलाचं असतं. त्याचप्रमाणे, खोटं नाव आणि खोट्या फोटोनी अकाऊंट बनवले जातात.
जितेन जैन म्हणतात की, "अशा अकाऊंटचा शोध घेण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कुणाही मित्राची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याआधी अकाऊंट नीट पाहून घ्यावं."
"खोट्या अकाऊंटमध्ये बऱ्याचदा फोटो त्याच दिवशी टाकला जातो. अकाऊंट तीन-चार ग्रुपशी जोडलेलं असतं आणि 10-15 मित्रच असतात. अनेकदा अशा अकाऊंटमध्ये वेगवेगळ्या मुलींचे फोटो असतात. फोटो आक्षेपार्ह सुद्धा असू शकतात," असंही जितेन जैन यांनी सांगितलं.
जितेन जैन म्हणतात की, असंही होतं की, प्रोफाईल फोटो कुणा मुलीचा असतो, मात्र गॅलरीत तिचा एकही फोटो नसतो आणि कुठली पोस्टही नसते. अशा प्रकारच्या अकाऊंटपासून दूर राहिलं पाहिजे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








