फॉक्सकॉन-वेदांता : नारायण राणे म्हणतात, 'शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का झाली नाही?'

फोटो स्रोत, Getty/facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का झाली नाही? नारायण राणेंचा सवाल..
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या काळात राज्यात औद्योगिक क्रांती का झाली नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले, "विरोधकांना कामधंदा काय आहे, त्यांनी अडीच वर्षे मातोश्रीवर राहूनच सरकार चालवलं, सगळ्या तडजोडी केल्या. त्यामुळेच हे उद्योग गेले आहेत."
"त्यांनी बढाया मारू नयेत. आम्ही राज्य सांभाळण्यास तसंच औद्योगिक प्रगती करण्यास समर्थ आहोत," असंही राणे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.
2. पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा - एकनाथ खडसे
"तुम्ही 200 कोटी काय 600 कोटी आणले असतील. पण तत्व आणि सत्व शिल्लक राहिले नाहीत. निष्ठा नसेल तर कितीही कोटी आणले तरी त्याला अर्थ नाही. पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.

फोटो स्रोत, facebook
एका कार्यक्रमात बोलताना खडसे म्हणाले, "पूर्वी निवडणुका विचारांनी लढल्या जायच्या. पण आता सरकार पाडायचं काम चालू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढं घाणेरडं राजकारण कधी झालं नव्हतं."
"धनुष्यबाणाच्या जोरावर आणि बाळासाहेबांच्या पुण्याईवर शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. पण आता त्यांना धोका देऊन तुम्ही शिंदे गटात गेला आहात, हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही," असंही खडसे यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
3. मोदींवर पूर्ण विश्वास, पुढील 6 महिन्यांत राज्यात उद्योग येतील - अब्दुल सत्तार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास असून पुढील 6 महिन्यात राज्यात नवे उद्योग येतील, याची मला खात्री आहे, असं मत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, ABDUL SATTAR/FACEBOOK
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याच्या मुद्द्यावर सत्तार बोलत होते.
"हे दोन महिन्यांचं किंवा दीड महिन्यांचं सरकार नाही. मागच्या सरकारने अडीच वर्षांत सरकारने काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले, कशामुळे प्रकल्प तिकडे गेला, हे दोन्ही सरकारचं काम पाहिल्यावर कळेल," असं सत्तार यावेळी म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली.
4. भारतात 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य
भारताने 2022 पर्यंत पेट्रोलमध्ये 10 टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य ठेवलं होतं. ते पाच महिन्यांपूर्वी पूर्ण झालं आहे. आता 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं आहे, अशी माहिती केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी दिली.

फोटो स्रोत, Ani
सुरत येथील हजीरा परिसरात कृभको बायोइथेनॉल प्लांटच्या पायाभरणी कार्यक्रमात अमित शाह बोलत होते.
वरील लक्ष्य गाठल्यास देशाच्या सुमारे 1 लाख कोटी परकीय चलनाची बचत होईल. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण आणणंही शक्य होणार आहे, असंही अमित शाह यांनी सांगितलं. ही बातमी अमर उजालाने दिली.
5. तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा - वरूण सरदेसाई
"मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांना एकटं पाडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. पण तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असं वक्तव्य युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केलं.
परभणी येथे आयोजित युवा पदाधिकारी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होतं. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला आहे."
"यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल," असंही सरदेसाई म्हणाले. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








