याकूब मेमन कोण होता? मुंबई बाँबस्फोटप्रकरणी त्याच्यावर काय आरोप होते?

याकूब मेमन

फोटो स्रोत, PTI

याकूब मेमनला 1993 च्या मुंबई बाँबस्फोटाप्रकरणी टाडा कोर्टाने 2007 मध्ये दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. याकूबला 2015 साली नागपुरच्या कारागृहात फाशी देण्यात आली. याकूबवर मुंबई बाँबस्फोटांचं षडयंत्र रचणे, दशतववादी कृत्यांना आर्थिक मदत करणे, शस्त्र आणि स्फोटकं बाळगण्याचे आरोप सिद्ध झाले होते. 

 ऑगस्ट 1994 मध्ये याकूब मेमनला सीबीआयने दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक केली होती.

मेमन कुटुंबीयांनी याकूबने नेपाळ पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचा दावा केला होता. याकूब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बड़ा कब्रस्तानमध्ये त्याच्या आई-वडिलांच्या बाजूलाच दफन करण्यात आलाय. या कबरीच्या सुशोभीकरण करून आता वाद सुरू झालाय.

कोण होता याकूब मेमन? 

याकूब मेमनचं पूर्ण नाव याकूब अब्दुल रझ्झाक मेमन. 

1993 मुंबई बॉम्बस्फोटाचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा उजवा हात टायगर मेमनचा याकूब लहान भाऊ.

याकूब मेमनचा जन्म 30 जुलै 1962 रोजी दक्षिण मुंबईतील भायखळ्यात झाला. इंग्रजी माध्यमामधून शिकलेल्या याकूबने वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली.

त्यानंतर 1990 मध्ये तो सीए (चार्टड अकाउंटंट) बनला. सीए झाल्यानंतर याकूबने मित्रासोबत फर्म सुरू केली. पण ही फर्म काही महिन्यात बंद झाली.

त्यानंतर याकूबने आपल्या वडीलांच्या नावाने 'ए आर एंड सन्स' नावाने एक नवी फर्म सुरू केली. 

याकूब मेमन

फोटो स्रोत, BBC World Service

याकूब, मेमन कुटुंबातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती होता. मेमन समाजातील सर्वात चांगला सीए म्हणून त्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.

काही वर्षांनी याकूबने तेजरथ इंटरनॅशनल नावाने एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी आखाती देशांमध्ये मांस पुरवण्याचं काम करायची.

याकूब मेमन आपल्या कुटुंबासह मुंबईतील माहिम परिसरातील अल-हुसैनी इमारतीत रहात होता.

मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील भूमिका काय? 

12 मार्च 1993 ला मुंबई बाँबस्फोटाने हादरली. या स्फोटाचा मास्टरमाईंड होता अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम.

दाऊदचा उजवा हात टायगर मेमनने बाँबस्फोट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याकूबवर भाऊ टायगर मेमनला बाँबस्फोटात मदत करण्याचा आरोप होता. 

याकूब मेमनवर आरोप

  • बाँबस्फोटाचं षड़यंत्र रचणे 
  • दहशतववादी कृत्यांना आर्थिक मदत करणे 
  • अवैधरित्या शस्त्र आणि स्फोटकं बाळगणे 
  • पाकिस्तानात दशवतवादाचं ट्रेनिंग घेण्यासाठी 15 लोकांना पाठवणे आणि पैशांची व्यवस्था 

मुंबई बाँबस्फोटाच्या दोन दिवस अगोदर टायगर आणि याकूब मेमन आपल्या कुटुंबासह दुबई, सौदी आणि त्यानंतर पाकिस्तानला पळून गेले. टायगर मेनन अजूनही पाकिस्तानातच असून राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर बक्षीस जाहीर केलंय. 

याकूबची अटक आणि खटला

याकूब मेमनला ऑगस्ट 1994 मध्ये CBI ने मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून अटक केली. पण, याकूबने नेपाळमध्ये पोलिसांसमोर जुलै 1994 मध्ये आत्मसमर्पण केल्याचा दावा त्याच्या वकिलांकडून करण्यात आला होता. 

मुंबईतून दुबईमार्गे पाकिस्तानात पळून गेलेला याकूब भारतात का परतला यावर कायम उलट सुलट सुरू होती. आपली पत्नी आणि भाऊ टायगरच्या पत्नीमध्ये होणाऱ्या सततच्या भांडणाला कंटाळून याकूब भारतात परतल्याचं बोललं गेलं. तर, CBI सोबत डील झाल्यामुळे तो परत आल्याची दबक्या आजावात चर्चा रंगली होती. 

याकूब मेमन

फोटो स्रोत, Getty Images

1993 मुंबई बाँबस्फोट प्रकरणाचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणतात, "याकूब मेमनला बॉम्बस्फोटाचं षड़यंत्र रचणे, दशतववादी कृत्यांना आर्थिक मदत आणि इतर आरोपांमध्ये कोर्टाने दोषी ठरवलं होतं." 

याकूबने मुंबई बाँबस्फोटात हात नसल्याचा दावा वारंवार कोर्टात केला. पण, विशेष टाडा न्यायालयाचे न्यायमुर्ती पी. डी. कोदे यांनी 27 जुलै 2007 टाडा अंतर्गत याकूबला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. 

याकूबने या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील केलं. पण बॉम्बे हायकोर्टाने 2013 मध्ये टाडा कोर्टाचा फाशीचा निर्णय अबाधित ठेवला.

याकूबसाठी पहाटे उघडलं सुप्रीम कोर्ट 

तारीख - 30 जुलै 2015

दिवस- गुरुवार

वेळ- पहाटे 3 वाजता

सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं जेव्हा सुनावणीसाठी कोर्ट सकाळी 3 वाजता उघडण्यात आलं. सुनावणी होती मुंबई बाँबस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनच्या याचिकेवर. याकूबला फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी याकूबची दया याचिका फेटाळली होती. त्यामुळे फाशी थांबवण्यासाठी याकूबच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

याकूबला सकाळी फाशी देण्यात येणार होती. त्यामुळे रात्रीत वकीलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. तीन न्यायामूर्तींच्या खंडपिठासमोर अर्जाची सुनावणी झाली.

90 मिनिटं चाललेल्या या सुनावणीसाठी वकील आणि पत्रकारांना तपासणीनंतर कोर्टात सोडण्यात आलं होतं.

दया याचिका फेटाळल्यानंतर 14 दिवसांच्या आत फाशी देण्यात येत नाही असा युक्तिवाद याकूबच्या वकीलांनी केला.

सकाळी 4.30 वाजता न्यायमुर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपिठाने याकूबला योग्य वेळ देण्यात आला होता असा निकाल देत फाशी थांबवण्याची याचिका फेटाळली. 

नागपूर जेलमध्ये देण्यात आली याकूबला फाशी

बॉम्बस्फोट खटल्यात विशेष टाडा न्यायालयाने याकूबला दोषी ठरवलं होतं. त्यानंतर याकूब मेमन नागपूरच्या जेलमध्ये बंद होता.

30 जुलै 2015 ला सकाळी सात वाजण्याच्या काही मिनिटं अगोदर याकूब मेमनला नागपूरच्या जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जेलची कारवाई पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.

याकूबचा मृतदेह मुंबईला आणल्यानंतर मोठ्या संख्येने लोक त्याच्या घराबाहेर उपस्थित होते.

याकूबचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बड़ा कब्रस्तानमध्ये मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्याच्या आई-वडीलांच्या बाजूलाच दफन करण्यात आला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)