महागाई कमी करणं हे सध्या आमचं प्राधान्य नाही- निर्मला सीतारामन #5मोठ्याबातम्या

निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, Getty Images

आज सकाळी विविध वेबसाईट्स आणि वर्तमानपत्रांवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.

1. महागाई कमी करणं हे सध्या आमचं प्राधान्य नाही- निर्मला सीतारामन

नोकऱ्यांची निर्मिती, संपत्तीचं समान वाटप, आणि आर्थिक विकास हे सध्याचे आमचे प्राधान्यक्रम आहेत, असं वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. महागाई गेल्या दोन महिन्यापासून कमी झाली आहे त्यामुळे सध्या तो आमचा प्राधान्यक्रम नाही, असं त्या म्हणाल्या.

द हिंदू ने ही बातमी दिली आहे.

"सध्या अनेक गोष्टी समोर आहेत त्यामुळे योग्य प्राधान्यक्रम ठरवणं सध्या तरी शक्य नाही. काही गोष्टी अर्थात ठरवल्या आहेत आणि काही मागे ठेवल्या आहेत," असं त्या पुढे म्हणाल्या.

India Ideas Summit या भारत-अमेरिका या देशांनी आयोजित केलेल्या परिषदेत त्या बोलत होत्या.

2. मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांना घरभाडं नाही

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता बंद करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी केली होती. आता प्रत्यक्षात कारवाईला सुरवात झाली असून, याची अंमलबजावणी सुध्दा खुद्द आमदार बंब यांच्या मतदारसंघातून सुरू झाली आहे.

खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना एक पत्र पाठवले असून, मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता या महिन्यापासून बंद करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला आहे. एबीपी माझा ने ही बातमी दिली आहे.

खुलताबाद गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना पाठवलेल्या पत्रात सप्टेंबर 2022 च्या पगार शालार्थ प्रणालीमध्ये पाठवितांना घरभाडे भत्ता समाविष्ट करू नयेत असे निर्देश दिले आहेत.

त्यांच्या या पत्राने मोठी खळबळ उडाली आहे, तर शिक्षक संघटनांनी या आदेशाला विरोध केला आहे. खुलताबाद तालुका आमदार प्रशांत भाऊ यांच्या मतदारसंघात येतो.

दरम्यान, गंगापूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेतील बहुतांश शिक्षक मुख्यालय उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा प्रशांत बंब यांनी उपस्थित केला होता.

3. कल्याण डोंबिवली जागेवर भाजपने दावा केल्याची माहिती नाही - एकनाथ शिंदे

कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्याची मला माहिती नाही. मात्र यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणून लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

एकनाथ शिंदे

फोटो स्रोत, Facebook

एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह काही प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळांना भेट दिली. अभिनेता नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन गणेश दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

भाजपच्या ताब्यात नसलेल्या पण पक्षाला अनुकूल असलेल्या आणि शिवसेनेचा पारंपारिक बालेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदार संघांत कमळ फुलविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजपने या जागेवर दावा केल्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी त्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

4.'...तर स्टुडिओमध्ये बसून फोटो काढावे लागले असते'- अतुल भातखळकर

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे.

अमित शाह यांच्यावर शिवसेनेनं केलेल्या टीकेला आता भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

लोकमतने ही बातमी दिली आहे.

'सत्ता गमावल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. बापाच्या जीवावर जगणाऱ्यांनी स्वयंभू नेते असलेल्या भारताच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याच्या आधी आपली लायकी तपासावी. बापाचे नाव नसते तर आपल्याला एखाद्या फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढत बसावे लागले असते,' अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

5. नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यात घेतल्या महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. भाजपविरुद्ध आता तिसरी नाही तर मुख्य आघाडी उघडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नितीश कुमार यांची भेट घेण्यासाठी शरद पवार एक दिवस आधी दिल्लीत आले.

इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

नितीश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

नितीश कुमार यांनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री व 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल, 'माकप'चे महासचिव सीताराम येचुरी, 'भाकप'चे महासचिव डी. राजा, ओमप्रकाश चौताला, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव तसेच मुलायम सिंह अशा अनेक विरोधी पक्षनेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)