राजपथाचं नाव आता 'कर्तव्यपथ', वाचा या मार्गाचा इतिहास

राजपथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजपथ

राजपथ... भारताची राजधानी दिल्लीतला हा मार्ग कदाचित देशातलाही सर्वात खास रस्ता.

दरवर्षी याच रस्त्यावर 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं परेडचं आयोजन केलं जातं आणि स्वतंत्र भारतातल्या अनेक पिढ्या ही परेड प्रत्यक्ष किंवा टीव्हीवर पाहात मोठ्या झाल्या.

याच राजपथाचं नाव आता कर्तव्यपथ असं केलं जाणार आहे, अशी चर्चा आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पण असा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे?

राजपथ नेमका कुठे आहे?

राजपथ हा दिल्लीतला जवळपास साडेतीन किलोमीटर लांबीचा रस्ता आहे.

रायसिना हिलवर उभ्या राष्ट्रपती भवनपासून हा रस्ता सुरू होतो आणि इंडियागेटपर्यंत येतो. यादरम्यानच विजय चौक आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड राष्ट्रपतींना सलामी देत याच रस्त्यावरून जाते आणि पुढे नवी दिल्लीच्या रस्त्यांवरून लाल किल्ल्यापर्यंत जाऊन थांबते.

राजपथ जिथे सुरू होतो, त्याच्या दोन्ही बाजूंना हर्बर्ट बेकर यांनी डिझाईन केलेल्या साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक या इमारती आहेत जिथे अनेक महत्त्वाची कार्यालयं आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारनं हा रस्ता उभारला होता.

राजपथाचा इतिहास काय आहे?

ब्रिटिशांनी त्यांची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवली, तेव्हा 1920 च्या दशकात इथे नवं शहरच वसवलं जे नवी दिल्ली म्हणून ओळखलं जातं. त्याकाळातच हा रस्ता तयार करण्यात आला जो आधी किंग्सवे नावानं ओळखला जायचा.

1961 साली या रस्त्याचं नाव बदलून राजपथ असं करण्यात आलं होतं, अशी माहिती नवी दिल्ली महापालिकेचे माजी माहिती संचालक मदन थपलियाल देतात.

त्याआधी किंग्सवे हे नाव इतिहास संशोधक आणि लेखक पर्सिवल स्पियर यांच्या सल्ल्यावरून देण्यात आलं होतं.

पर्सिवल स्पियर हे केंब्रिज विद्यापीठातही इतिहास शिकवायचे. 1924-1940 दरम्यान ते दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमध्ये इतिहासाचे प्राध्यापक होते. नवी दिल्लीची उभारणी होत होती तेव्हा इंग्रज सरकारनं दिल्लीतल्या मोठ्या रस्त्यांची नावं स्पियर यांच्या सल्ल्यानुसारच दिली होती. यात अकबर रोड, पृथ्वीराज रोड, शाहजहान रोड या रस्त्यांचाही समावेश आहे.

प्रजासत्ताक दिन

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधलं एक दृश्य

स्पियर हे काहीसे तटस्थ म्हणूनच ओळखले जायचे. म्हणजे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा जवळून अभ्यास केला, पण त्याचं समर्थन किंवा विरोध केला नव्हता. स्टीफन्स कॉलेज सोडल्यावर काही काळ त्यांनी ब्रिटिश सरकारमध्ये भारतविषयक बाबींचे उप-सचिव म्हणूनही काम केलं होतं.

भारत सोडल्यावर पर्सिवल स्पियर यांनी 'इंडिया, पाकिस्तान अँड द वेस्ट', ट्वायलाईट ऑफ द मुघल्स, द हिस्ट्री ऑफ इंडिया अशी काही महत्त्वाची पुस्तकं लिहिली.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा रस्ता देशाच्या ताकदीचं प्रदर्शन करणाऱ्या परेडचं व्यासपीठ बनला.

देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केलं आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला. राजपथावर परेडचं आयोजन होऊ लागलं.

राजपथाची उभारणी कोणी केली?

ब्रिटिश नगररचनाकार एडविन ल्युटेन्स यांना नवी दिल्लीच्या आखणीचं श्रेय दिलं जातं. पण त्या इमारतींचं प्रत्यक्ष बांधकाम भारतीय ठेकेदारांनी केलं होतं. राजपथासह दिल्लीतल्या अनेक प्रशस्त रस्त्यांची निर्मिती सरदार नारायणसिंग या ठेकेदारांनी केली होती.

खाली जड दगड, वर खडी आणि अस्फाल्ट म्हणजे एक प्रकारचं डांबर अशा पद्धतीनं सरदार नारायणसिंगांनी हे टिकावू रस्ते बांधले. हे तंत्र अगदी अलीकडच्या काळापर्यंत वापरलं जात होतं.

हा रस्ता इतका मजबूत बनला की प्रजासत्ताक दिनाला घोडे, हत्ती, मोटार सायकली, सैन्याचे भक्कम ट्रक्स आणि वजनदार रणगाडे या रस्त्यावरून जातात, तरी कधी रस्त्याचं फारसं नुकसान होत नाही.

राजपथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सेंट्रल व्हिस्टा पुनर्निर्माण प्रकल्पाअंतर्गत राजपथाचंही नूतनीकरण

या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हिरवळीवर अनेक दिल्लीकर हिवाळ्यात उन्हाचा आनंद घेताना दिसायचे किंवा कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत जमून पिकनिकही करायचे. इथल्या फुलांची देखभाल करणारे माळी राजस्थानातून आले होते. त्यातल्या काहींचे वंशज अजूनही ही जबाबदारी सांभाळतात.

हा रस्ता बांधला तेव्हा त्याच्या दुतर्फा ल्युटेन आणि त्यांचे सहकारी डब्ल्यू आर मुस्टो यांनी झाडं लावून घेतली होती. पानगळ होतील अशी झाडं इथे लावली जाणार नाहीत, असं मूस्टोंनी ठरवलं होतं, जे अजूनही पाळलं जातं.

पण त्यातली डझनवारी झाडं आता तोडण्यात आली आहेत आणि या रस्त्याचं रूपही बदलत आहे.

सेंट्रल व्हिस्टा आणि राजपथाचं नूतनीकरण

केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा रीडेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या अंतर्गत संसदेसह नवी दिल्लीतल्या अनेक प्रशासकीय इमारतींचं नूतनीकरण आणि पुनर्बांधणी होते आहे. त्याअंतर्गत राजपथाचा चेहरामोहराही बदलतो आहे.

राजपथाच्या आसपासचा परिसर सेंट्रल व्हिस्टा नावानं ओळखला जातो. या परिसरात भारताची संसद, राष्ट्रपती भवन आणि इतर सर्व मंत्रालयांच्या इमारती, सचिवालय, राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल आर्काईव्हज, इंदिरा गांधी कला केंद्र, बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस, निर्माण भवन, जवाहरलाल भवन अशा इमारती आहेत.

अनेक दशकांपूर्वीचं हे बांधकाम असून इथल्या अनेक इमारतींमध्ये अपग्रेडची, सुधारणांची गरज जाणवू लागली. खासदारांची वाढलेली संख्या, नवं तंत्रज्ञा अशा गोष्टींना प्रशासकीय कार्यालयातली जागा पुरेनाशी झाल्यानं हा संपूर्ण परिसर नव्याने बांधण्याचा विचार पुढे आला.

गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू असली तरी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली.

राजपथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजपथाचं 'कर्तव्यपथ' असं नामांतर केलं जाणार असल्याची चर्चा

त्याअंतर्गत नव्या संसद भवनाची उभारणी केली जाते आहे. सध्या सर्व मंत्रालयं वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांना एका मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात खेटे मारावे लागतात. त्यात वेळ जाऊ नये यासाठी सर्व मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणून त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाने जोडण्यात येणार आहे.

सेंट्रल व्हिस्टा पुनर्निर्माण प्रकल्प तब्बल 20 हजार कोटी रुपयांचा असून त्याअंतर्गत राजपथाचंही नूतनीकरण करण्यात आलं आहे.

आता या रस्त्याला 'कर्तव्य पथ' हे नाव दिलं जाणार आहे. तसा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली महापालिकेचे उपाध्यक्ष आणि भाजप नेते सतीश उपाध्याय यांनी दिली आहे.

राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यावरून वाद

दिल्लीतल्या एखाद्या लँडमार्कचं नाव बदललं जाण्याची ही पहिली वेळ नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाचं केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून हे प्रमाण वाढल्याची टीका केली जाते आहे.

गेल्या काही वर्षांत सेव्हन रेसकोर्स रोडचं लोक कल्याण मार्ग, औरंगजेब रोडचं एपीजे अब्दुल कलाम मार्ग, डलहौसी रोडचं दारा शिकोह मार्ग असे नामबदल करण्यात आले आहेत.

राजपथ

फोटो स्रोत, Getty Images

हे फक्त दिल्लीपुरतं मर्यादित आहे, असंही नाही. उत्तर प्रदेशात अलाहाबादचं नाव प्रयागराज करण्यात आलं किंवा मुंबईच्या एलफिन्स्टन रोडचं नाव प्रभादेवी करण्यात आलं, तेव्हा त्याचीही बरीच चर्चा झाली होती. बरं आत्ताच नावं बदलली जातायत असंही नाही. साठ सत्तरच्या दशकापासूनच अशी नामांतरणं होत आली आहेत. त्यावरून कधी वादही झाले.

आताही राजपथाचं नाव बदलून कर्तव्यपथ करण्यावरून उलटसुलट चर्चा होते आहे.

कुणी याकडे ब्रिटिश वसाहतवादाचा वारसा झटकून भारतीय ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न म्हणून कौतुकानं पाहात आहेत, तर कुणाला हा मोदी आणि भाजपचा राजकीय स्टंट आणि इतिहास पुसण्याचा प्रयत्न वाटतो आहे.

कुणाच्या मते नावं बदलणं गरजेचं आहे तर कुणाला वाटतं, यापेक्षा खऱ्या समस्या सोडवण्यावर भर द्यायला हवा.

(वरिष्ठ पत्रकार विवेक शुक्ला यांच्या लेखावर आधारित)

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)