सवर्ण मुलगी आणि दलित मुलाच्या प्रेमकथेचा 'सैराट' शेवट

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
- Author, आसिफ अली
- Role, बीबीसी हिंदीसाठी अल्मोडाहून
उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यात एका दलित तरुणाची हत्या करण्यात आली आहे. सवर्ण मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून या तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेने उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली आहे.
हत्या झालेला तरुण जगदीश चंद्र हा उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील पनवाद्योखान गावचा रहिवासी होता. तेथील जवळच असलेल्या भिकियासैनच्या बिल्टी गावातील गीतावर त्याचं प्रेम जडलं. जगदीशला पाहताक्षणी गीताला तो तिच्या स्वप्नातला राजकुमारचं वाटला.
जगदीशच्या वागण्याबोलण्यातला रुबाब पाहून गीता भारावली. तिने त्याची जात, धर्म, पैसा आडका काही काही पाहिलं नाही. समाजाची पर्वा न करता तिने जगदीश बरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी 21 ऑगस्ट रोजी मंदिरात जाऊन लग्न केलं.
दलित मुलाशी बांधलेली ही लग्नगाठ गीताच्या घरच्यांच्या डोळ्यात खुपत होती.
जगदीशला आपल्या कुटुंबियांपासून धोका आहे म्हणूनच गीताने पोलीस संरक्षणाची मागणी केली होती.
लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच म्हणजे 1 सप्टेंबरला तर जगदीशचं निधन झालं.
1 सप्टेंबरच्या तारखेला जगदीश चंद्र एका व्हॅनमध्ये जखमी अवस्थेत आढळला. त्यावेळी व्हॅनमध्ये गीताचा सावत्र भाऊ आणि आई-वडीलही होते.
त्यानंतर जगदीशला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
जगदीशचे कुटुंबीय सांगतात की, दलित असलेल्या मुलाने सवर्ण जातीतल्या मुलीशी लग्न केल्याचं गीताच्या घरच्यांना बघवलं नाही. आणि त्यांनीच जगदीशची निर्घृण हत्या केली.
जगदीशच्या हत्येप्रकरणी गीताचे कुटुंबीय अटकेत आहेत तर गीताला सध्या नारी निकेतनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
जगदीश चंद्र सल्ट भागातील पनवाद्योखानचा रहिवासी होता. त्या गावात 50 दलित कुटुंब राहतात.
पनवाद्योखानपासून 40 किमी अंतरावर असलेल्या भिकियासैन भागात 'घर-घर नल, घर-घर जल' या शासकीय योजनेचं काम सुरू होतं. ही योजना त्या परिसरातील कविता मनरल यांच्या देखरेखीखाली सुरू होती. तिथंच जगदीश काम करायचा.
त्याच भागातील बिल्टी गावातील गीतावर जगदीशचं प्रेम जडलं. सवर्ण जातीत जन्मलेली गीता उर्फ गुड्डी तिची आई, सावत्र वडील जोगा सिंग आणि सावत्र भावासोबत राहत होती.
गीताने आणि जगदीशने 21 ऑगस्ट रोजी मंदिरात लग्न केलं. मात्र जगदीश दलित असल्याने गीताच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याचं जगदीशच्या घरचे सांगतात.
लग्न झाल्यावर जगदीशने गीताला कुठे ठेवलं होतं याबाबत पनवाद्योखान आणि बिल्टी या दोन्ही गावांतील लोकांमध्ये मतभेद आहेत. या दोघांचं प्रेमप्रकरण नक्की कसं सुरू झालं याबाबत गावकरी चकार शब्द काढायला तयार नाहीत. आम्हाला याबाबत काहीच माहिती नाही, असं गावकरी सांगतात.
भलेही गावकरी याविषयावर उघड उघड बोलत नसतील, मात्र दलित असल्यामुळेच जगदीशची हत्या झाल्याची चर्चा आसपासच्या परिसरात आहे.
मागच्या 40 वर्षांपासून दलित हितासाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते दर्शन लाल सांगतात की, "गीताने एका अनुसूचित जातीच्या मुलाशी तिच्या मर्जीने लग्न केलं. तिच्या कुटुंबीयांना ते पटलं नाही आणि ही दुर्दैवी घटना घडली."

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
दर्शनलाल पुढे सांगतात की, उत्तराखंडमध्ये आजही जातीपातींमध्ये भेदभाव केला जातो. दलित वर्गाला नेहमीच अपमानजनक परिस्थितीला आणि अत्याचाराला सामोरं जावं लागतं. पण बऱ्याच गुन्ह्यांची नोंद होत नसल्याने ती प्रकरण समोर येत नाहीत.
दर्शनलाल जो दावा करतात त्यासाठी त्यांनी कोणतीही आकडेवारी दिलेली नाही. मात्र उत्तराखंडमध्ये दलितांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
गीताने अल्मोडा एसएसपींना पत्र लिहिलं होतं...
गीताचे सावत्र वडिल आणि तिचा सावत्र भाऊ यांचं गीताशी पटायचं नाही. आपल्याच कुटुंबीयांपासून जगदीशच्या जीवाला धोका आहे म्हणून तिने 27 ऑगस्टला एसएसपी अल्मोडा यांना पत्र लिहलं होतं. या पत्रात तिने आपल्या पतीला सुरक्षा पुरवावी, असं म्हटलं होतं.
गीताच्या पत्रानुसार, "26 मे रोजी गीता जगदीश चंद्रसोबत अल्मोडयाला गेली होती. तेव्हाच त्या दोघांना लग्न करायचं होतं मात्र तिच्याकडे वयाचं प्रमाणपत्र नव्हतं. ती तिच्या प्रमाणपत्राची सोय करत होती. 17 जूनला अचानकचं तिचे सावत्र वडील तिच्या समोर आले. त्यांनी तिला बळजबरीने घरी नेलं, तिला बेदम मारहाण केली. वडिलांच्या जाचाला कंटाळून 7 ऑगस्टला तिने घर सोडलं आणि भिकियासैन गाठलं. तिथं जगदीश होता, त्या दोघांनी 21 ऑगस्टला मंदिरात जाऊन लग्न केलं.
या संपूर्ण प्रकरणावर अल्मोडाचे एसएसपी प्रदीप कुमार राय म्हणाले की, "रानीखेतचे सर्कल ऑफिसर प्रकरणाचा तपास करत आहेत."
गीताच्या पत्रावर पोलिसांनी कोणतीही सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही यावर ते म्हणाले की, "पीडितेने 27 ऑगस्टला पत्र दिल्यावर, पत्रात नमूद केल्यावर ठिकाणाचा पोलिसांनी शोध घेतला. मात्र त्या पत्त्यावर कोणीच सापडलं नाही. पत्रात जो फोन नंबर होता तो ही लागत नव्हता."
जगदीशच्या हत्येनंतर अल्मोडाचे एसएसपी म्हणतात की, हत्येत सामील असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल.
तेच दुसरीकडे राणीखेतचे सर्कल ऑफिसर टीआर वर्मा म्हणाले, "मुलगा शेड्यूल कास्टचा होता. त्यामुळे 302 एस.सी/एस.टी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. मुलगा दलित होता तर मुलगी राजपूत समाजातील होती. त्यामुळे मुलीच्या घरचे नाराज होते."

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
टीआर वर्मा पुढे सांगतात की, "मुलाचं अपहरण करून मग त्याची हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी वाटतं आहे."
जगदीशची आर्थिक परिस्थितीही हलाखीची होती..
जगदीशच्या कुटुंबात त्याची आई भागुली देवी, मोठा भाऊ पृथ्वीपाल, धाकटा भाऊ दिलीप कुमार आणि धाकटी बहीण गंगा असे चार जण आहेत.
त्याचा मोठा भाऊ पृथ्वीपाल गावातच मोलमजुरी करून कुटुंबाचं पोट भरतो.
लहान भाऊ दिलीप कुमार हा वीज ठेकेदाराकडे मजुरी करतो. तर लहान बहीण गंगा 12 वी शिकली आहे. ती आई सोबत घरीच असते.
जगदीशच्या निधनाने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जगदीशचं गाव रामनगरमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कपासून 40 किलोमीटर अंतरावर वसलंय.
जगदीशने आपलं शालेय शिक्षण गावातच पूर्ण केलं. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाचं ओझं त्याच्यावर पडलं.
जगदीश मागच्या 12 वर्षांपासून जल संस्थानमध्ये कंत्राटावर पाईप लाईनची देखभाल आणि दुरुस्तीचं काम करत होता. आणि त्याच्या या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता.
तसेच जगदीश हा उत्तराखंडच्या परिवर्तन पार्टीशीही संबंधित होता. त्याने परिवर्तन पार्टीच्या तिकिटावर मागच्या दोन विधानसभा निवडणूकाही लढवल्या होत्या. दोन्ही वेळेस त्याला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी तो पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होता.
जगदीशच्या निधनानंतर त्याची वृद्ध आई भागुली देवी अंथरून धरून आहे. त्याच्या घरी सांत्वन करणाऱ्यांची ये जा सुरू आहे. त्याची आई सांगते की, प्रेम करण्याची एवढी मोठी शिक्षा आपल्या मुलाला मिळेल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आपल्या मुलाला न्याय मिळायला हवा अशी तिची इच्छा आहे.
उत्तराखंड अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष मुकेश कुमार हेही जगदीशच्या घरी भेट देऊन गेले.
ते म्हणाले की, "लोकांमध्ये शिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून येते. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी एक प्रोग्राम सुरू करणार असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी आयोगाची वेबसाइटही तयार करण्यात आली असून, मॉनिटर करण्यासाठी आणि आलेल्या तक्रारींची नोंद ठेवण्यासाठी एक कर्मचारी ठेवण्यात आल्याचं अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितलं."
त्यांनी जगदीश न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. तसंच नारी निकेतनमध्ये राहणाऱ्या गीताच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
गीताच्या गावात सगळे चिडीचूप
तेच गीताच्या गावातले लोक मात्र यावर काहीएक बोलायला तयार नाहीत.

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
बऱ्याच प्रयत्नांनंतर काही लोक बोलायला तयार झाले. त्यातले काही सांगतात की, गीता आणि जगदीशमध्ये प्रेमप्रकरण सुरू आहे याची त्यांना माहितीच नव्हती. आमच्यासाठीही ही घटना अतिशय धक्कादायक असल्याचं ते सांगतात.
गावप्रमुख भावना देवी बीबीसीशी बोलताना सांगतात, "जर गीताला भविष्यात गावात येऊ वाटलं तर गावकरी परस्पर चर्चा करतील आणि मगच निर्णय घेण्यात येईल."
पोलिसांचं काय म्हणणं आहे?
या प्रकरणाचा तपास करणारे सर्कल ऑफिसर टीआर वर्मा सांगतात की, जगदीश आणि त्याचा एक मित्र ठेकेदार असलेल्या कविता मनरलच्या हाताखाली काम करायचे.
1 सप्टेंबरला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामावर जात असताना सेलपानी भिकियासैन रस्त्यावर दोन लोकांनी जगदीशला अडवलं. जगदीश सोबत त्याचा मित्र होता त्याला घाबरवून पळवून लावलं.

फोटो स्रोत, Asif Ali/BBC
पळून गेलेल्या जगदीशच्या मित्राने कविताला फोन करून या घटनेची माहिती दिली. पण त्यावेळी कविता तिथे नव्हती. ती सहा वाजता परत आल्यावर तिने या घटनेची माहिती देत तहसीलच्या महसूल उपनिरीक्षकांकडे एफआयआर दाखल केली.
उत्तराखंडच्या पहाडी भागात पोलीस दलाचं कामकाज दोन विभागात विभागलंय. काही भाग रेग्युलर पोलिसांच्या अखत्यारीत येतो तर काही भागावर रेव्हेन्यू म्हणजेच महसूल विभागातील पोलीस देखरेख ठेवतात.
जिथे ही घटना घडली, तो भाग महसूल पोलिसांच्या अखत्यारीत येतो. एफआयआरनंतर दोन्ही पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 च्या सुमारास पोलिसांनी एक व्हॅन अडवली. व्हॅन गीताचा सावत्र भाऊ चालवत होता. तर त्याचे आई वडील मागे बसले होते.
पोलिसांनी व्हॅनची झडती घेतली असता सीटच्या खाली जगदीश मरणासन्न अवस्थेत पडलेला होता. पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात हलवलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
गीताचे आई-वडील आणि भावांविरुद्ध कलम 364 आणि 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच जगदीश शेड्यूल कास्टचा असल्यामुळे मारेकऱ्यांवर 302 एस.सी/एस.टी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन राणीखेतच्या सर्कल ऑफिसरकडे तपासाची सूत्र सोपविण्यात आली आहेत. तर फॉरेन्सिक टीमही तपासात सहकार्य करत आहे.
जगदीश आता हयात नाही, गीता नारी निकेतनमध्ये आहे, तिचं कुटुंब तुरुंगात आहे. तिकडे जगदीशच्या वृद्ध आई आणि भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्याच्या कुटुंबीयांना पुढं काय होईल हे माहीत नाही मात्र जगदीशला न्याय मिळेल, असं त्याच्या वृद्ध आईला वाटत राहतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








