You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदेंना अजित पवारांचा टोला, 'काहींना गणेशोत्सवातही शो करायची सवय', #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्या थोडक्यात पाहूया,
1. 'काहींना गणेशोत्सवातही शो करायची सवय', अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विविध ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गेल्याचे व्हीडिओ समोर आले. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजित पवार म्हणाले, "यापूर्वी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जाताना कोणी कॅमेरा घेऊन जात नव्हतं. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरे घेऊन जात नाही.
"पण आता कसं गाडीसमोर कॅमेरा लावला जातो, मग कुणीतरी गाडीतून उतरतं, मग दर्शन घेताना व्हीडिओ केला जातो. आता काहींना शो करायची सवय आहे. जसा राज कपूर शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तसा काहींना शो करायची सवय आहे. आता जनतेनेच पहावं काय चाललंय ते." साम या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिलं आहे.
तसंच यावेळी ते दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या राजकारणाविषयी सुद्धा बोलले. यंदा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे एकनाथ शिंदे सुद्धा दसरा मेळावा घेणार असल्याचं बोललं जात आहे. पण, जनता कुणाच्या पाठिशी हे दसरा मेळाव्यानंतर कळेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
ते म्हणाले, "जनता कुणाच्या पाठिशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतर कळेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर सभा घ्यायचे. या शिवाजी पार्कवरच शेवटी त्यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात चालेल. आज ज्यांच्या हातात पॉवर आहे ते त्यांना हवं तसं करतात. पण सामान्य जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल."
2. 'रेशन दुकानांमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो का नाही?', निर्मला सीतारामन चिडल्या
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना रेशनच्या दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्यावरून त्या संतापल्या.
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत त्यांनी तेंलगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकु़र या गावी भेट दिली. त्याठिकाणी काही नागरिकांशी चर्चा करत असताना रेशनाच्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचं त्यांना आढळलं. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा सुद्धा केली. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
त्या म्हणाल्या, "बाजारात 35 रुपये किलो असलेला तांदूळ तुम्हाला केंद्र सरकार 1 रुपयाने देते. 30 रुपये खर्च केंद्र सरकार उचलते तर केवळ 4 रुपये खर्च राज्य सरकार उचलते. तसंच कोरोना आरोग्य संकटात गरीब कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत दिला जातो.
"तरीही तेलंगणाचे सरकार मात्र रेशन दुकानांमध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो लावत नाही. बॅनर्स लावले तर ते फाडण्यात येतात."
पंतप्रधानांचा फोटो दुकानात का नाही? असा प्रश्न विचारत निर्मला सीतारामन यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो लावा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला.
तेलंगणा सरकारने मात्र यावर टीका केलीय. आरोग्यमंत्री टी. हरीश राव यांनी हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
3. अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट होणार?
मनसे आणि भाजपच्या युतीची घोषणा होणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक भाजपाच्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 5 सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात भेट होणार का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं.
पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ही भेट होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
अमित शाह मुंबईत गणेशोत्सवासाठी येणार असून भाजपाच्या एका बैठकीला ते उपस्थित राहणार आहे. याशिवाय त्यांचे कोणतेही कार्यक्रम मुंबईत नियोजित नाहीत असं फडणवीस म्हणाले आहेत.
4. काँग्रेसचं दिल्लीत आज आंदोलन
महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीच्या मुद्यावरून काँग्रेसचं आज आंदोलन आहे. 4 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसकडून रॅली काढली जाणार आहे.
'महागाई पर हल्ला बोल' अशी घोषणाबाजी करत काँग्रेस भाजपला घेरण्याच्या तयारी आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयातून सकाळी नऊ वाजल्यापासून बसची सोय करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा पक्ष मुख्यालयातून बसने दिल्लीतील रामलीला मैदावावर येऊ शकतात.
या आंदोलनात दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
तसंच येत्या 7 सप्टेंबरपासून काँग्रेसचे काश्मीर ते कन्याकुमारी भारत जोडो आंदोलन सुरू होणार आहे.
5. मुंबईत उकाडा वाढला, मराठवाडा आणि विदर्भात मात्र पाऊस
मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून उकाडा सुरू असल्याने नागरिक हैराण झालेत. आतापासूनच ऑक्टोबर हीटची झळ बसत असल्याची प्रतिक्रिया मुंबईकर देतायत. पण केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमाल तापमानात मोठा फरक जाणवत आहेत.
ही परिस्थिती पुढील सात दिवस कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव असून यामुळे तापमानात वाढ झाल्याचं प्रादेशिक हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. पावसाळापूर्वी जाणवणारी उष्णता आणि आर्द्रता मुंबईत जाणवत आहे.
अरबी समुद्रात पश्चिमेकडून वाहणारे वारे कमी झाले असून पावसाळी वारे कमकुवत होतात, तेव्हा तापमानात वाढ दिसू लागते असंही हवामान विभागाने सांगितलं आहे.
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)