सुपरटेक नोएडा : 32 मजली ट्विन टॉवर पाडण्यासाठी प्रशासनाने नेमकी काय तयारी केली?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सौतिक बिस्वास
- Role, भारत प्रतिनिधी, बीबीसी न्यूज.
दिल्लीजवळच्या नोएडामध्ये अनधिकृतरित्या बांधलेल्या दोन गगनचुंबी इमारती पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यानुसार, इमारती पाडण्याची तयारी पूर्ण झाली असून आज ( रविवार 28 ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास ही कार्यवाही केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, केवळ 12 सेकंदांमध्ये या 32 मजली दोन इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत.
उत्तर प्रदेशमधील नोएडाच्या सेक्टर 93A परिसरात या दोन इमारती आहेत. अॅपेक्स आणि सेयान असं नाव त्यांना देण्यात आलं आहे.
सुपरटेक बिल्डर्स या खासगी बांधकाम व्यावसायिकाने या इमारती बांधल्या होत्या. पण इमारती बांधतांना अनेक नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळेच या इमारती पाडण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
देशात आजवरच्या इतिहासात इतक्या टोलेजंग इमारती पाडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
अशा प्रकारे इमारती पाडण्याची परवानगी सहसा देण्यात येत नाही. घनदाट लोकवस्तीच्या भागात तर हा प्रकार अत्यंत दुर्मिळ म्हणावा लागेल. त्यामुळेच रविवारी करण्यात येत असलेलं पाडकाम प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक असणार आहे.
याचं कारण म्हणजे पाडण्यात येत असलेल्या दोन्ही टॉवरच्या जवळच 12 मजली इमारत आहे. दोन्ही इमारतींमधील अंतर केवळ 9 मीटर इतकंच आहे. याशिवाय, सुपरटेकच्या ट्विन टॉवरच्या आजूबाजूला तब्बल 45 रहिवासी इमारती आहेत. त्यामध्ये सुमारे 7 हजार नागरीक वास्तव्याला असल्याची माहिती मिळाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या सगळ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी रविवार सकाळपर्यंत आपलं राहतं घर रिकामी करावं, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसंच घरात पाळीव प्राण्यांनाही ठेवू नका, असं त्यांना सांगण्यात आलं आहे.
इमारतींचं पाडकाम झाल्यानंतर 5 तासांनीच या सर्वांना घरी परतण्याची परवानगी असेल.
याशिवाय, परिसरातील भटक्या जनावरांनाही हुसकावून लावून प्राणी केंद्रात त्यांची रवानगी करण्यात येईल.
जवळच असलेल्या नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेस वेवरील वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात येईल.
इमारती पडल्यानंतर जमिनीपासून सुमारे 300 मीटरपर्यंत (984 फूट) धुळीचे लोट उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवाई वाहतूक संस्था, वायूदल यांनाही याविषयी सूचना करण्यात आली आहे. या कालावधीत त्यांनी सुरक्षाविषयक दक्षता घ्यावी, असं त्यांना सांगण्यात आलं आहे.
इतकंच नव्हे, तर पाडकाम होत असलेल्या ठिकाणापासून 15 मीटरवर दिल्लीला गॅस पुरवठा करणारी भूमिगत पाईपलाईन आहे. तसंच परिसरातील नागरिकांनी पाडकामानंतर बसणाऱ्या हादऱ्यांमुळे आपल्या इमारतींना नुकसान होण्याची भीतीही व्यक्त केली आहे.
पण पाडकाम प्रक्रियेत सहभागी असलेल्या अभियंत्यांच्या मते, यामुळे इतरांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. नागरिकांनी काळजी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
नोएडा येथील इमारती भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवण्यात आलेल्या आहेत. पाडकाम प्रक्रियेत सहभागी असलेल्या ब्रिटिश अभियंत्यांनी त्याच्या परिणामांविषयी अभ्यास केला. त्यानुसार ट्विन टॉवर पाडल्यानंतर बसणारा हादरा भूकंपमोजक यंत्रावर 4 रिश्टर स्केल इतका असू शकेल.
त्याशिवाय, ट्विन टॉवरचं पाडकाम करताना त्या इमारतींच्या तळघरात मऊ राडारोडा करून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे इमारतींचे अवशेष पडले तरी हा राडारोडा त्याचा दबाव शोषून घेईल, त्यामुळे हादरे जास्त प्रमाणात जाणवणार नाहीत, असा दावा अभियंत्यांनी केला आहे.
"हे पूर्णपणे सुरक्षित आहे," असं साईटवर कार्यरत असलेल्या मयूर मेहता यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.
इमारत कशी पाडली जाईल?
संबंधित दोन्ही इमारती स्फोटकांचा वापर करून पाडल्या जाणार आहेत. दिल्ली येथील एडिफिस इंजिनिअरिंग या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे.
इमारतींच्या पाडकामासाठी करण्यात येणाऱ्या स्फोटाची जबाबदारी देण्यात आलेल्या तीन तज्ज्ञांसह (ब्लास्टर) एक पोलीस अधिकारी केवळ घटनास्थळावर उपस्थित असेल. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात असेल.

फोटो स्रोत, Getty Images
इमारती पाडण्यासाठी सुमारे 3 हजार 700 किलो स्फोटकं वापरण्यात येणार आहेत. स्फोट घडवून शॉक वेव्हच्या मदतीने दोन्ही इमारती पाडण्यात येतील.
याविषयी अधिक माहिती देताना एडिफिस कंपनीचे संस्थापक सदस्य उत्कर्ष मेहता म्हणाले, "आम्ही 30 पैकी 18 मजल्यांवरच स्फोट घडवणार आहोत. बाकीची इमारत त्या ओझ्याने आपोआप खाली येईल. आम्ही त्याला कॅस्काडिंग वॉटरफॉल एक्स्पोजन असं संबोधतो. गुरुत्वाकर्षणाची मदत या कामात घेतली जाते."
गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लास्टर्स 30 मजल्यांवर संबंधित कामासाठी चढउतार करत होते. इमारतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आल्याने लिफ्टही बंद आहे. त्यामुळे स्फोटकं वर नेण्यासाठी पायी जाण्याचाच पर्याय शिल्लक होता.
ब्लास्टर्सनी स्फोट घडवून आणण्यासाठी योग्य अशी ठिकाणं शोधून तिथं स्फोटकं लावली आहेत. या कामात थोडीशीही चूक झाल्यास पाडकाम अर्धवट राहू शकतं, त्यामुळे जास्त काळजी घेतली जात आहे.
मेहता यांच्या एडिफिस कंपनीची स्थापना 11 वर्षांपूर्वी झाली होती. त्यांच्यासाठी हे पाडकाम आव्हानात्मक असलं तरी असं काम ते पहिल्यांदाच करत आहेत, असं नाही.
एडिफिस कंपनीने यापूर्वी जुने विमानतळ टर्मिनल, क्रिकेट स्टेडिअम, पुल आणि स्टील कारखान्यातील जुन्या औद्योगिक चिमण्या पाडण्याचं काम केलेलं आहे.
या सर्व कामांमध्ये बिहारमध्ये गंगा नदीवर असलेला एक पुल पाडण्याचं काम सर्वांत अवघड होतं, असं ते सांगतात. हे काम एडिफिस कंपनीने तीन वर्षांपूर्वी केलं होतं. त्यावेळी पुल पाडत असताना कोणताच अवशेष खाली नदीत पडणार नाही, याची दक्षता घ्यायची होती.
नोएडातील ट्विन टॉवर पडल्यानंतर तब्बल 30 हजार टन इतका राडारोडा-अवशेष खाली शिल्लक राहणार आहे.
हे अवशेष इतरत्र पसरू नयेत, याची काळजी घेण्यात येईल. 1200 ट्रक हे अवशेष घेऊन रिसायकलिंग प्लांटकडे जातील. हे काम सुमारे तीन महिने सुरू असेल.
"पाडकामानंतर पसरलेली धूळ लवकर खाली येईल. पण अवशेष हटवण्यासाठी काही वेळ लागू शकतो," असं मेहता यांनी सांगितलं.
इमारतींचं पाडकाम भारतात पहिल्यांदाच होतं आहे, असं नाही. 2020 मध्ये केरळमध्येही अशा प्रकारे दोन इमारती पाडण्यात आल्या होत्या. या इमारतींचं बांधकाम करताना पर्यावरणविषयक नियमांचं उल्लंघन झालं होतं.
पण नोएडा येथील पाडकाम हे अतिशय उंच इमारतीचं होत असल्याने त्याविषयी अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत.
आजूबाजूच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांनी आपली घरं रिकामी करणं सुरू केलं आहे.
लोकांनी त्यांच्या घरांची तावदाने-खिडक्या बंद करून घेतली आहेत. एसी-टीव्ही भिंतीवरून काढून खाली ठेवले आहेत. इमारती पूर्णपणे सीलबंद करण्यात येत आहेत, असं आम्ही आतापर्यंत कधीच केलं नव्हतं, असं बाजूच्या इमारतीचे व्यवस्थापक एस. एन. बैरोलिया यांनी म्हटलं.
अॅपेक्स आणि सेयान या दोन गगनचुंबी इमारतींनी कधीकाळी खरेदीदारांना उंची राहणीमानाचं स्वप्न दाखवलं होतं. पण याच इमारती रविवारी धुळीस मिळणार आहेत. लोकांनी पाहिलेल्या स्वप्नांचा तर आधीच चुराडा झालेला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








