महागाई: पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाईत घर चालवण्यासाठी महिला कोणत्या युक्त्या वापरत आहेत?

तुम्ही दर महिन्याच्या खर्चाचं बजेट बनवत असता. पण अचानक त्या खर्चात वाढ होते, तेव्हा तुम्ही काय करता?

स्वाभाविकपणे, कोणत्या ना कोणत्या खर्चाच्या बजेटमध्ये कपात करून तो वाटा नव्या खर्चासाठी दिला जातो.

वाढली महागाई आणि उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या खर्चात झालेल्या वाढीमुळे देशातील प्रत्येक कुटुंबात हेच चित्र सध्या दिसून येत आहे.

बीबीसीने भारतात वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या महिलांशी महागाईबाबत चर्चा केली.

कोणत्या वस्तू महाग झाल्यामुळे इतर खर्चात कपात करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, हे बीबीसीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

खर्चात कपात

सिल्व्हिया डेनियन दोन मुलांच्या एकल आई आहेत. प्रति महिना 20 हजार रुपयांमध्ये दोन्ही मुलांचं संगोपन, शिक्षण आणि पालन-पोषण करणं अतिशय अवघड असल्याचं त्या सांगतात.

मुलांच्या शिक्षणासाठी सिल्व्हिया यांनी कर्जही घेतलं होतं. पण वाढत्या महागाईमुळे त्याचे हप्ते भरताना नाकीनऊ येत आहेत.

मुलीला नुकतेच नोकरी लागल्यामुळे या परिस्थितीतून काहीसा दिलासा मिळाला. अन्यथा सिल्व्हिया यांच्या बुटीकमधून होणाऱ्या कमाईतून घर चालवणं शक्य नव्हतं.

घर चालवण्यासाठी कोणत्या खर्चात कपात करावी लागली, या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणतात, "वाढत्या मुलांच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या खर्चात कपात करू शकत नाही. शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तर द्यायचेच आहेत. त्यामुळे कपात करायची तर बचतीच्या पैशांतच करावी लागते."

लग्नासाठीच्या दागिन्यांच्या खर्चात कपात

पंजाबच्या संगरूरमध्ये राहणाऱ्या शर्मा कुटुंबाचा एक छोटा व्यवसाय आहे. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 3 ते 4 लाख रुपये आहे.

रेणू यांना 16 वर्षांची एक मुलगी आहे. दोन-चार वर्षांत या मुलीचं लग्नाचं वय होईल, ते खर्च कसं करावं, याची काळजी त्यांना सतावत आहे.

प्रत्येक महिन्यात काही पैसे जोडून वर्षात एखादा दागिना बनवून घेण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं. पण कोरोना आणि वाढत्या महागाईमुळे या गोष्टी होऊ शकल्या नाही.

सोन्याच्या वाढणाऱ्या किंमतींनी त्यांच्या मुलीच्या लग्नाची चिंता आणखी वाढली आहे.

सद्यस्थितीत दागिने विकत घेणं तर लांब, पण महागाईमुळे पैसेही जमा करता येत नाहीत. त्यामुळे संगरूर कुटुंबाने आता सणासुदीसाठीचा खर्चही कमी केला आहे.

नव्या वस्तूंची खरेदी टाळणं

किस्मत कंवर जयपूरच्या प्रताप नगरमधील रहिवासी आहेत. कुटुंबाचं मासिक उत्पन्न दरमहा 30 हजार रुपये इतकं आहे.

यापैकी किमान 28 हजार रुपये तर कधी-कधी त्यापेक्षाही जास्त पैसे घरखर्चासाठी लागतात.

अन्न-धान्याच्या वाढत्या किंमती, गॅस सिलेंडर आणि भाज्यांसाठीचा वाढता खर्च यांमुळे घरखर्चाचं बजेट बिघडलं आहे.

घरखर्च आवाक्यात ठेवण्यासाठी मुलांचे वाढदिवस, सण-समारंभ यांना होणाऱ्या खर्चावर अंकुश लावणं सुरू केलं आहे.

घरात कोणत्याही नव्या वस्तू घेण्यापूर्वी त्याबाबत पाच वेळा तरी विचार करतात.

तेलाऐवजी उकडलेलं जेवण

महजबीन या उत्तर प्रदेशातील हरदोई येथे राहतात. शिलाई काम करणाऱ्या महजबीन यांचे पती दैनंदिन मजुरीचं काम करतात. दोघांची एका महिन्याची एकत्रित कमाई 12 हजार रुपये आहे.

अनेक दिवस दोघांनाही काहीच काम नसतं. उत्पन्नाचा कोणताच मार्ग नसतो. अशा स्थितीत खाणार काय आणि वाचवणार काय, असा प्रश्न नेहमी निर्माण होतो.

घरात ज्येष्ठ व्यक्ती आणि मुलंही आहेत. त्यांच्या खाण्यापिण्यात किंवा औषधात कपात करू शकत नाही. त्यामुळे मुलांना ट्यूशनला पाठवणं बंद केलं आहे. तेल महागल्याने उकडलेलं जेवण करण्याला त्यांचं प्राधान्य असतं.

पैसे उसने घेण्याची वेळ

मिनोती दास आसामच्या जोरहाट जिल्ह्यात राहतात. त्या एका खासगी शाळेत शिपाई म्हणून नोकरी करतात. त्यांचे पती एका ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक आहेत.

कुटुंबाचं मासिक उत्पन्न 14 हजार रुपये आहे. घरखर्च आणि मुलाचं शिक्षण यामध्ये सगळे पैसे संपून जातात. गेल्या काही महिन्यात वाढलेल्या महागाईमुळे दर महिन्याला पैसे उसने घेण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.

घरखर्च कसा चालतो, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी गॅस सिलेंडर आणि मोहरीच्या तेलाच्या वाढत्या दराबाबत नाराजी व्यक्त केली.

"प्रत्येक महिन्यात 1070 रुपये गॅस सिलेंडरवर खर्च करावे लागतात. मोहरीच्या तेलाची किंमत काही महिन्यांपर्यंत 115 रुपये प्रतिलीटर होती. ती आता 210 रुपये प्रतिलीटर झाली आहे. पूर्वी 4 हजार रुपयांमध्ये एका महिन्याचा किराणा सामानाचा खर्च होता. तो आता वाढून 6 हजार रुपयांपर्यंत गेला आहे. याशिवाय, मुलाच्या शिक्षणाचा खर्चही पूर्वीपेक्षा वाढला आहे. पूर्वी दरमहा 600 रुपये असलेली फी आता 1 हजार रुपये झाली आहे.

मिनोती या पूर्वी महिन्याचा किराणा एकत्रच भरायच्या. पण आता जितकी आवश्यकता आहे, तेवढाच किराणा त्या आणतात. सगळ्यात जास्त चिंता आरोग्यविषयक खर्चाबाबत असते. इतक्या उत्पन्नात कुणी आजारी पडलं तर पैसे कुठून आणायचे, याची चिंता त्यांना सतावत असते.

जगणं कसं सोडू?

नजमुस्सबा उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये राहतात. कुटुंबाचं मासिक उत्पन्न 30 हजार रुपये आहे. त्यापैकी 5-7 हजार त्या पूर्वी वाचवायच्या. पण आता बचत करणं जवळपास अशक्य आहे.

दुधाच्या वाढत्या दरामुळे चहा दिवसातून एकदाच बनतो. तेल महागल्यामुळे पुरी-कचोरी यांच्यासारखे तळलेले पदार्थ अनेक दिवसांत बनवलेलेच नाहीत.

कपात कशी करायची याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "केवळ बचतीत कपात होऊ शकते. बाकीचं जगणं कसं सोडू?"

स्कूटी चालवणं सोडलं..

दीपिका सिंह यांचं कुटुंब छत्तीसगढच्या रायपूरमध्ये राहतं. त्यांच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत.

या मध्यमवर्गीय कुटुंबाचं मासिक उत्पन्न 40 हजार रुपये आहे. त्यापैकी 30-35 हजार रुपये घरखर्चासाठी लागतात.

पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे कुटुंबीयांनी आता स्कुटी वापरणं सोडून दिलं आहे. त्याऐवजी सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्याला सिंह कुटुंबीय प्राधान्य देतात.

खूप गरज असेल तरच स्कुटीचा वापर करण्यात येतो.

पाहुणचार टाळतो..

मौमिता बॅनर्जी या झारखंडच्या रांची येथील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न 36 हजार इतकं आहे. त्यापैकी सुमारे 32 हजार रुपये खर्च होतात. गेल्या काही दिवसांत वाढत्या महागाईने त्यांचं बजेट बिघडवलं आहे.

मासिक खर्च हा उत्पन्नापेक्षा कमी ठेवण्यासाठी त्या अर्ध जेवण इंडक्शन कुकरवर बनवतात. यामुळे वीजबिल वाढलं असलं तरी गॅसच्या वाढत्या किंमतीपेक्षा ते कमी आहे.

हिरव्या भाज्या त्यांच्या जेवणातून नाहिशा झाल्या आहेत. आठवड्यातून त्या केवळ दोन-तीनवेळाच बाजारला जातात. बाकीच्या दिवसांत शेंगदाणे, राजमा किंवा मटर यांचा उपयोग करून त्या जेवण बनवतात.

मुलांसोबत बाहेर जेवायला जाणं, सणासुदीला कपड्यांची खरेदी, घरी मित्रमंडळीला जेवणासाठी बोलावणं, या गोष्टी कमी झाल्याचं त्या सांगतात.

स्वस्त तांदूळ, दाळ शोधते..

महाराष्ट्रात सांगलीत राहणाऱ्या शिरीन सध्या स्वस्त किराणा सामानाच्या शोधात असतात.

800 रुपयांना मिळणारं गॅस सिलेंडर सध्या 1100 रुपयांना मिळतं. त्यामुळे शिरीन यांना काही गोष्टींवरचा खर्च कमी करावा लागला. पूर्वी 300 रुपयांमध्ये त्या पूर्ण महिन्याचं गहू खरेदी करावं लागतं.

खाण्याच्या तेलाबाबतही त्यांना असंच करावं लागलं. पूर्वी पाच लीटरचा डबा त्या विकत घेत असत. पण आता चार लीटर स्वयंपाकासाठी पुरवतात. त्या म्हणतात, घरात लोकांचं पोट तर आपण लहान करू शकत नाही, त्यामुळे पर्याय खूपच कमी आहेत."

या बातमीसाठी महाराष्ट्रातील सांगली येथून सर्फराज सनदी, झारखंडच्या रांची येथून आनंद दत्त, राजस्थानच्या जयपूर येथून मोहरसिंह मीणा, उत्तर प्रदेशातील हरदोई येथून आसिफ, बिजनौरमधून शाहबाज अन्वर, आसामच्या जोरहाटमधून दिलीप शर्मा, कर्नाटकच्या बंगळुरू येथून इमरान कुरेशी, पंजाबच्या संगरूरहून कुलवीर सिंह, छत्तीसगढच्या रायपूरमधून आलोक पुतुलू यांनी माहिती दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)