You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राहुल गांधींना काँग्रेसचे अध्यक्ष का व्हायचं नाहीये?
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शोध तसा 2019 पासून सुरू आहे,
मात्र यावर्षी उदयपूर मध्ये झालेल्या चिंतन शिबिरात अध्यक्षपदाची तयारी पूर्ण करून सप्टेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवड करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
ही डेडलाईन आता संपत आली आहे आणि काँग्रेसजनांचा अध्यक्षपदाचा शोध अद्यापही सुरू आहे.
राजस्थान चे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत सोमवारी जयपूरमध्ये बोलताना म्हणाले, "जर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले नाहीत तर कार्यकर्ते निराश होतील. लाखो कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा स्वीकार केला पाहिजे."
याचाच अर्थ असा आहे की काँग्रेसजन अद्यापही राहुल गांधीच्या नावावर अडून बसले आहेत आण राहुल गांधी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नाहीत.
त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की राहुल गांधींना काँग्रेसचं अध्यक्ष का व्हायचं नाही?
त्याची काही कारणं राजकीय आहेत, काही वैयक्तिक आणि काही पक्षाच्या कामकाजाशी संबंधित आहेत.
2019 च्या पराभवाचं शल्य
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी का कचरतात आहेत याची कारणं जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार औरंगजेब नक्शबंदी यांच्याशी आम्ही संवाद साधला.
त्यांच्या मते राहुल गांधी यांची ही भूमिका समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहास आणि थोडा वर्तमानात डोकावून पहावं लागेल.
2019 मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता.
त्यावेळी त्यांनी एक चारपानी पत्र काढलं होतं आणि त्यात काही मुद्दे उपस्थित केले होते.
या पत्रात एका ठिकाणी लिहिलं होतं की, 'या प्रक्रियेसाठी पक्षाच्या विस्तारासाठी लोकसभेत निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे. त्यासाठी अनेक लोक जबाबदार आहेत. मात्र अध्यक्षपदावर असल्याने मी जबाबदारी न घेणं आणि इतरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे योग्य होणार नाही.'
औरंगजेब म्हणतात, "याचा अर्थ असा होता की त्यांच्याबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या आणखी काही व्यक्तींनीही राजीनामा द्यायला हवा. मात्र त्यांच्याशिवाय कोणत्याही मोठ्या नेत्याने राजीनामा दिला नाही."
पक्षाची साथ नाही
राहुल गांधी त्या पत्रात लिहितात, "मी व्यक्तिगत पातळीवर थेट पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तमाम अशा संस्थांशी लढलो ज्यावर त्यांनी मिळवला."
ते पुढे म्हणतात, "ज्या पद्धतीने त्यांनी राफेल घोटाळा बाहेर आणला होता, आणि 'चौकीदार चोर है' चा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला ज्येष्ठ नेत्यांची साथ मिळाली नाही."
त्याची खंत अद्यापही त्यांच्या मनात आहे असं मला वाटतं. ज्या नेत्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव नाही अशा नेत्यांचं नेतृत्व राहुल गांधी यांना करायचं नाही हेही त्यांच्या कचरण्याचं मुख्य कारण आहे."असंही औरंगजेब म्हणतात.
राहुल गांधी यांचं व्यक्तिमत्त्व
राहुल गांधी यांना अधिकारपद हवं आहे असं अनेकांना वाटतं मात्र त्याबरोबर जबाबदारी नको असं अनेक जाणकारांना वाटतं. ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्तासुद्धा त्यापैकी एक आहेत.
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "2004 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यावर्षी ते अमेठीहून जिंकून आले होते.तेव्हापासून चर्चा होती की ते पक्षाचे अध्यक्ष होतील पण तसं झालं नाही."
2013 मध्ये ते उपाध्यक्ष झाले. पक्षाची कमान त्यांनी 2017 मध्ये सांभाळली आणि 2019 मध्ये राजीनामा दिला. 2004 मध्ये मनमोहन सिंह जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याकडे एका मंत्रिपदाची ऑफर होती मात्र त्यांनी ते स्वीकारलं नाही.
या सर्व गोष्टीतून हे पुरेसं लक्षात येतं की त्यांना अधिकारपद हवं असतं पण जबाबदारी नको असते. हा त्यांचा स्वभावच आहे."
पक्षाचं काम
स्मिता गुप्ता आणखी एक महत्त्वाचा मुदा मांडतात. त्यांच्या मते, "2019 च्या राजीनाम्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णय तेच घेतात. यातून स्पष्ट होतं की त्यांना पक्षात महत्त्वाचं स्थान नक्कीच हवं आहे."
स्मिता यांच्या मते राहुल मागच्या सीटवर बसून त्यांना ड्रायव्हिंगचा आनंद घ्यायचा आहे.
त्या म्हणतात, "उपाध्यक्षपदाच्या दिवसांपासून बघायचं झालं तर राहुल गांधी अनेक वर्षं महत्त्वपूर्ण पदावर आहेत. पक्षाला मजबूत करण्यासाठीचे अनेक दावे ते करत आहेत. मात्र पक्षाची वाढ करण्यासाठी जी निष्ठा आणि चिकाटी लागते ती त्यांच्याकडे नाही. कोणतीही संकल्पना ते पूर्णत्वाला नेऊ शकत नाही."
बिगर गांधी अध्यक्ष
अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी हेही लिहिलं होतं की काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून नियुक्त व्हावा.
त्यामुळे त्यांनी राजीनामा देताना कोणत्याही नेत्याचं नाव अध्यक्ष म्हणून समोर केलं नाही.
त्यांचा रोख बिगर गांधी अध्यक्षांकडे होता.
2019 च्या त्या पत्रानंतर राहुल गांधीनीही अजुनही त्यांची भूमिका बदललेली नाही. सार्वजनिक व्यासपीठावरून तरी त्यांनी कोणतंही असं विधान केलेलं नाही.
त्यामुळे आता राहुल गांधीनी अध्यक्षपदाचा स्वीकार केला तर कथनी आणि करणीत फरक आहे हे पुरेसं स्पष्ट होईल.
तसंही मोदींसकट अनेक नेते काँग्रेसवर वंशवादाचा आरोप लावतात. यावेळी नरेंद्र मोदींनी हा मुद्दा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातही उपस्थित केला.
त्यामुळे राहुल गांधी पक्षाचं अध्यक्षपद घेऊन मोदींना आयता मुद्दा देऊ इच्छित नाही.
अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याचं महत्त्व
काँग्रेस अध्यक्षपदाच्या मुद्द्यावर बोलताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, "अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबातला की बाहेरचा हा वादच कशाला हवाय. हे संघटनेचं काम आहे. ती काय पंतप्रधानपदांची निवडणूक थोडीच आहे. 32 वर्षांपासून या पक्षाचा कोणीही व्यक्ती पंतप्रधान झाला नाही की मुख्यमंत्री झाला नाही. मग मोदी कुटुंबाला इतकं का घाबरतात?"
या वक्तव्याला मोदीच्या वंशवादाच्या वक्तव्याशी जोडून पाहता येऊ शकतं.
स्मिता गुप्ता सांगतात, "राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा स्वीकार करायला हवा या गहलोत यांच्या वक्तव्याला फार महत्त्व आहे. राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी आव्हान देणारा कोणी नाही."
राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्याची ही योग्य वेळ आहे. जी-23 हा गट ही आता विखुरलेला पहायला मिळतोय. गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी राजीनामे दिले आहेत.
जी 23 गटाचीसुद्धा हीच मनीषा आहे की जो कोणी पक्षाचा अध्यक्ष होईल त्याने ती जबाबदारी पूर्ण वेळ घ्यावी.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची चौकशी झाली आहे. अशा परिस्थितीत या दोघांनी अध्यक्षपद न स्वीकारणं हे धोकादायक होऊ शकतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)