यारसागुंबा- 'हिमालयन व्हायग्रा' म्हणून ओळखली जाणारी वनस्पती विकली जाते 70 लाखांना...

फोटो स्रोत, Neha Sharma
- Author, आमीर पीरजादा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
यारसागुंबा ही जगातील सर्वांत महागडी बुरशी आहे असं म्हटले जाते. या बुरशीला हिमालयन व्हायग्रा जरी म्हटलं जात असले तरी दमा आणि कॅन्सरसारख्या आजारांवर देखील यारसागुंबा प्रभावी आहे असं मानलं जातं.
ही बुरशी महाग असण्याचं कारण म्हणजे याची प्रचंड मागणी. पण जागतिक तापमानवाढीमुळे यारसागुंबाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये नेपाळ पोलिसांनी एका चिनी नागरिकाला अटक केली होती. या व्यक्तीचा विविध अवैध तस्करींमध्ये सहभाग असल्याचे वृत्त एएनआयने दिले होते. ही व्यक्ती एका मोठ्या रॅकेटचा भाग आहे असं पोलिसांनी सांगितले.
हे रॅकेट 'यारसागुंबा'ची देखील तस्करी करतं अशी माहिती आहे. एका बुरशीमुळे ही कारवाई का झाली, ती इतकी महाग असते का याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. बीबीसीने यारसागुंबा इतकं का महाग असतं याबाबतचा रिपोर्ट बीबीसीने 2018 मध्ये केला होता. हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
यारसागुंबा इतकं का महाग आहे, हे शोधण्यासाठी काय केलं जातं, त्याचा व्यापार कसा होतो या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी बीबीसीच्या टीमने थेट हिमालय गाठले होते.
तिबेटियन भाषेत यारसागुंबा म्हणजे 'उन्हाळ्यातलं गवत आणि हिवाळ्यातले कीडे'. सुरवंट आणि बुरशी एकत्र येउन यारसागुंबा तयार होते.
मांसभक्षक बुरशी सुरवंटावर हल्ला करते, मातीखाली तिचे जीवाश्म तयार होतात, मृत सुरवंटाच्या डोक्यातून बुरशी उगवण्यास सुरुवात होते आणि यातूनच यारसागुंबा तयार होतात.
यारसागुंबा फक्त हिमालय आणि तिबेटमध्ये तीन ते पाच हजार मीटर उंचीवरच्या पठारावर सापडतात.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
यारसागुंबा जगातली सगळ्यांत महागडी बुरशी आहे. तिचा वापर वैद्यकीय उपचारांसाठी होतो. दमा, नपुंसकत्व आणि कॅँसर सारख्या आजारांवर यारसागुंबा गुणकारी आहे, असं मानलं जातं. म्हणूनच यारसागुंबा 'हिमालयाचा व्हायग्रा' नावाने प्रसिद्ध आहे.
यारसागुंबा प्रचंड महाग आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक किलो यारसागुंबाची किंमत एक लाख डॉलर्स (अंदाजे 70 लाख रुपये) एवढी आहे.
दरवर्षी मे-जून महिन्यांत हजारो नेपाळी नागरिक पर्वतांच्या दिशेने वाटचाल करतात. गावं रिकामी होतात आणि शाळाही बंद होतात. रस्त्यांवर शुकशुकाट असतो आणि आजूबाजूला चिटपाखरूही दिसत नाही.
दोन महिने तंबू ठोकून राहावं लागतं
यारसागुंबा मिळवण्यासाठी ही माणसं 3,000 मीटर उंचीवर जाऊन राहतात.
पाच वर्षांपासून यारसागुंबाचा व्यापार करणाऱ्या कर्मा लांबा सांगतात, "गोरखा, धाधिंग, लामजुंग अशा दूरवरच्या जिल्ह्यांतून लोक यारसागुंबाच्या शोधात येतात. ते सहसा 4,000 मीटरहून अधिक उंचीवर आढळतात."

फोटो स्रोत, Neha SHarma
यारसागुंबाच्या शोधात येणारे लोक दोन महिने अगदी तुटपुंज्या सुविधांसह तंबूमध्ये राहतात. एक तरुण जोडपं गेल्या तीन वर्षांपासून इथे येत आहे. त्यांनी आपला अनुभव सांगितला. "पहिल्या वर्षी आम्हाला एकही यारसागुंबा सापडला नाही. नंतर आम्हाला ते कसे शोधायचे ते कळलं आणि आता आम्हाला रोज 10-20 यारसागुंबा सापडतात."
"यारसागुंबाच्या शोधात आम्ही सकाळी सकाळी 4,500 मीटर उंचीपर्यंत जातो. अनेक वेळा जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी होते."
स्वयंपाकासाठी मांडलेल्या चुलीवर हात शेकताना सुशीला सांगतात, "यारसागुंबाच्या शोधात आम्ही सकाळी सकाळी 4,500 मीटर उंचीपर्यंत जातो. अनेक वेळा जोरदार पाऊस आणि बर्फवृष्टी होते. आणखी उंचीच्या ठिकाणी गेलं की हिमस्खलनाचा धोकाही असतो."

फोटो स्रोत, Neha SHarma
सीता गुरंग नेपाळच्या मनांग भागात 15 वर्षांपासून यारसागुंबाचा शोध घेत आहेत. "आधी तर रोज मला शंभर यारसागुंबा सापडायचे. आता दिवसभरात जेमतेम दहा वीस सापडतात," असं त्या सांगतात.
तज्ज्ञांच्या मते मोठ्या प्रमाणावर असलेली मागणी आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे यारसागुंबाची उपलब्धता घटली आहे. सीता सांगतात, "मला रोज शेकडो यारसागुंबा मिळायचे. तेव्हा त्याच्या किमती खूप कमी होत्या. आता किमती वाढल्यात तर यारसागुंबाच मिळेनासे झालेत."
यारसागुंबाचा शोध
यारसागुंबा कसा शोधला जातो हे आम्हाला या लोकांनी सांगितलं.
गाईड पसांग शेर्पा आणि दोन कुलींबरोबर आम्ही काठमांडूहून प्रवासाला सुरुवात केली. दिवसभर प्रवास करून आम्ही पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. आमचं विसावण्याचं ठिकाण म्हणजे डोंगरराजीत वसलेलं जगत नावाचं एक गाव.

फोटो स्रोत, Neha Sharma
पुढचा टप्पा पिसांग गाव होतं, जे साधारण 3,200 मीटर उंचीवर वसलेलं होतं. घाटीतल्या खडबडीत रस्त्यांवरून आम्ही पिसांग गाठलं. वाटेत अनेकदा आम्हाला वर्क परमिट दाखवावं लागलं.
चहुबाजूंनी पर्वतराजींनी वेढलेलं पिसांग अत्यंत सुरेख असंगाव आहे. गावातूनच मर्शयांगदी नदी वाहते. गाव जवळजवळ निर्जन होतं कारण बहुतांश गावकरी यारसागुंबाच्याशोधात डोंगरात गेले होते.
आम्ही एका लॉजमध्ये थांबलो. एक जोडपं ते चालवतं. त्यांनी आम्हाला मध, आलं आणि लिंबाचा रस असलेला चहा दिला. हॉटेलचे मालकही यारसागुंबाचे व्यापारी असल्याचं चहा पिता पिता आम्हाला समजलं.
हॉटेलच्या खोलीचं भाडं साधारण 150 रुपये, आंघोळीसाठी गरम पाणी जवळपास 100 रुपये डॉलर आणि पाण्याची बाटली काही पन्नासएक रुपयांपर्यंत होती इथे. फारच कमी ठिकाणी राहण्याचं भाडं आणि आंघोळीसाठीचा खर्च असा असतो.

तिथल्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून आम्ही पिसांगमध्ये एक अख्खा दिवस घालवला. मग आम्ही तिथून पुढे यारसागुंबा हुडकण्यासाठी गेलेल्या लोकांच्या शोधात चढाई सुरू केली.
3,800 मीटर उंचीच्या शिखरावर पोहोचायला आम्हाला सहा तास लागले. तिथे रंगीबेरंगी तंबू आमची वाट बघत होते. आम्ही तिथे रात्र घालवली.
सकाळी अखेर आमची यारसागुंबा शोधणाऱ्या लोकांशी भेट झाली. जसजसं उंची गाठत होतो तसतसं झाडं छोटी होत होती. 4,300 मीटर उंचीवर अन्नपूर्णा 2 च्या बेसकँपवर आम्हाला गवताचं मैदान लागलं.
उंच पर्वतात यारसागुंबाच्या शोधात आलेली माणसं ठिपक्यांसारखी दिसत होती. पण त्यांचं शूटिंग करताना त्यांच्या एवढं पटपट काम करणं अवघड जात होतं.
एवढ्या उंचीमुळे आमच्यापैकी काही जणांना श्वसनाचा त्रास सुरू झाला. डोकेदुखी सुरू झाली, धुसर दिसू लागलं. लवकरात लवकर शूटिंग संपवणं आणि बेस कँपवर पोहोचणं आमच्यासाठी महत्त्वाचं होतं. आम्ही लवकरच खाली उतरलो.
यारसागुंबाचा व्यापार
आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्या हॉटेलचे मालक कर्मा लामा यारसागुंबा खरेदी करायला प्रचंड उंचीवरचं शिखर गाठतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते यारसागुंबा काठमांडूच्या मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात.

फोटो स्रोत, Neha Sharma
एका यारसागुंबाला 300 रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते. मात्र चीन, अमेरिका, UK, जपान, थायलंड, मलेशियाच्या बाजारपेठेत एका यारसागुंबाला अगदी 3,500 रुपयांपर्यंत एवढी किंमत मिळू शकते.
नेपाळ सेंट्रल बँकेच्या पाहणीनुसार यारसागुंबाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नापैकी 56 टक्के पैसे याच व्यापारातून मिळतात. यारसागुंबाची शेतीची कापणी करणारे शेतकरी सरकारला काही निर्धारित रक्कम रॉयल्टी म्हणून देतात.
2014 मध्ये झालेल्या International Centre for Integrated Mountain Developmentच्या एका अभ्यासानुसार यारसागुंबाच्या व्यापारामुळे नेपाळच्याअर्थव्यवस्थेला 51 लाख रुपयांचा फायदा झाला आहे.
विशेषज्ञांच्या मते, सुरवंटरूपी बुरशीची तस्करी अन्य देशातही होते आहे. 18वर्षांपासून यारसागुंबाचा व्यापार करणाऱ्या नागेंद्र बुधा थोकी सांगतात, "या व्यापाराला ज्या पद्धतीने नियंत्रित करायला हवं होतं, तसं करण्यात आलेलं नाही. म्हणूनच यारसागुंबाचं नेमकं उत्पन्न किती आणि त्यातून सरकारदरबारी नेमका किती निधी जमा होतो, हे सांगणं अवघड होतं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








