भरतसिंह कोश्यारी : 'मोदीपूर्व राजवटीत परदेशात भारतीयांना किंमत नव्हती' #5मोठ्याबातम्या

नरेंद्र मोदी

आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा घेतलेला आढावा.

1.मोदीपूर्व राजवटीत परदेशात भारतीयांना किंमत नव्हती- राज्यपाल कोश्यारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधीच्या राजवटीत परदेशात भारतीयांना किंमत नव्हती. आमच्या परंपरांना लोक नाव ठेवत असत. आता मात्र नरेंद्र मोदींमुळे देशाचा जगात गौरव वाढत आहे, असं राज्यपाल भरतसिंह कोश्यारी म्हणालेत. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

"मी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचाही कार्यकाळ पाहिला आहे. मात्र पहिल्यांदाच देशासाठी 20 तास काम करणाऱ्या नरेंद्र मोदींमुळे जगात भारताचा गौरव वाढला आहे," अशा शब्दात कोश्यारी यांनी मोदींचं कौतुक केलं आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापाठीच्या शतकोत्तर महोत्सावाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.

2. बस चालवताना एसटी ड्रायव्हरला हार्ट अटॅक, तरीही 25 प्रवाशांचे प्राण वाचवले

स्वत:चा जीव धोक्यात असताना एसटी ड्रायव्हरने प्रसंगावधान राखल्यामुळे 25 प्रवाशांचे जीव वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा हायवेवर एसटी बस सुसाट असताना चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला.

बसला गती असतानाही त्याने कशीबशी बस बाजूला घेतली. चालकाने त्याच्यासोबत इतका मोठा प्रसंग घडला असतानाही प्रसंगावधान राखलं. बस थांबवल्यानंतर काही वेळातच चालकाचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी चालकाने दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं जात आहे.

जालिंदर पवार असं 45 वर्षीय चालकाचं नाव आहे. पुणे-सातारा महामार्गावरील नसरापूर गावाजवळ ही घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची पालघर विभागाच्या वसई आगाराची एसटी बस, म्हसवडकडे प्रवाशांना घेऊन जातं होती. पुणे-सातारा महामार्गावरील वरवे, नसरापूर गावाच्या हद्दीत बस आल्यानंतर चालक जालिंदर पवार यांना चक्कर आली. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

3. मल्लिकार्जून खरगे आणि पियुष गोयल यांच्यात शाब्दिक वाद

काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दोघे संचालक असलेल्या 'यंग इंडिया' कंपनीच्या 'हेराल्ड हाऊस'मधील कार्यालयाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाळे ठोकल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये उमटले.

राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये आक्रमक शाब्दिक संघर्ष झाला. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

पियुष गोयल

फोटो स्रोत, Getty Images

'नॅशनल हेराल्ड' प्रकरणात 'ईडी'च्या अधिकाऱ्यांनी 'यंग इंडियन'शी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली होती. पण तिथे पदाधिकारी नसल्याने या कार्यालयाला टाळे ठोकले आणि कंपनीचे संचालक वा पदाधिकारी असल्याशिवाय हे कार्यालय उघडता येणार नाही, असा आदेश काढला.

त्यासंदर्भात 'ईडी'ने कंपनीचे संचालक आणि पदाधिकारी म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस बजावून गुरुवारी साडेबारा वाजता 'यंग इंडियन'च्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितलं. 'ईडी'च्या या नोटिशीला खरगे यांनी विरोध केला.

ईडी ही कृती योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही या चौकशीत हस्तक्षेप करत नाही. काँग्रेसच्या काळात असं होत असेल, असं प्रत्युत्तर पियुष गोयल यांनी दिलं.

4. घटस्फोटाच्या प्रकरणात मुलांच्या कल्याणाचा विचार सर्वप्रथम व्हावा- उच्च न्यायालय

नवरा बायको घटस्फोट घेत असताना मुलांच्या कल्याणाचा विचार सर्वप्रथम व्हावा असा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

सु्प्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

बेंगळुरू येथे राहणाऱ्या एका जोडप्याच्या संदर्भात हा निर्णय दिला आहे. या प्रकरणात मुलगा अमेरिकेत जन्माला आला होता. नवरा बायकोचं भांडण झालं आणि बायको नवऱ्याला न सांगता मुलाला भारतात घेऊन आली.

मात्र वडिलांनी मुलाचा ताबा मागितला. मात्र मुलगा भारतात रुळला होता. अशा परिस्थितीत मुलाला अमेरिकेला परत घेऊन जावं कारण तो तिथला नागरिक आहे आणि त्याच्या भविष्यासाठी तिथे राहणं योग्य होईल, असा निर्णय न्यायालयाने दिला.

न्या. ए. एम. खानविलकर आणि सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

5. मोदी चहावाला नाही, तर चहावाल्याचा मुलगा- प्रल्हाद मोदी

लोकमतने दिलेल्या बातमीनुसार प्रल्हाद मोदी सध्या दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. अखिल भारतीय रास्त भाव फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले आहेत. या आंदोलनात त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

माझा भाऊ पंतप्रधान आहे म्हणून मी काही उपाशी मरू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.

दरम्यान प्रल्हाद मोदी यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वत:ला चहावाला म्हणवून घेतलं मात्र त्यांनी कधीही चहा विकला नाही. तो माझ्या वडिलांनी विकला अशी माहिती नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी या व्हीडिओमध्ये दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)