संजय राऊतांच्या अटकेनंतर आता शिवसेनेचा 'आवाज' कोण बनणार?

फोटो स्रोत, FACEBOOK/SANJAYRAUT.OFFICIAL
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक केल्यानंतर प्रामुख्याने एक मुद्दा उपस्थित केला जात आहे तो म्हणजे, आता शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे कोण मांडणार? शिवसेनेचा 'आवाज' कोण बनणार?
या कारवाईनंतर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (1 ऑगस्ट) आमदार आणि खासदारांची बैठक बोलवली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बोलवली ही पहिलीच बैठक आहे. त्यामुळे यात पक्षाची पुढील रणनिती आणि संजय राऊत यांच्याजागी मुख्य प्रवक्त्याची जबाबदारी कोण पार पाडेल यावरही निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते कोण-कोण आहेत? त्यांची कार्यशैली काय आहे? संजय राऊत यांच्यासारखी आक्रमक भूमिका नेमकी आता कोण मांडणार? या प्रश्नांची उत्तरं या निमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
शिवसेनेचे प्रवक्ते कोण?
संजय राऊत हे शिवसेनेसाठी केवळ राज्यसभेचे खासदार किंवा साधारण प्रवक्ते नव्हते. ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा आहेत. म्हणूनच त्यांच्यावरील कारवाई शिवसेना आणि उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आहेत.
खासदार प्रियंका चतुर्वेदी, आमदार आणि प्रतोद सुनील प्रभू, आमदार आणि माजी मंत्री अनिल परब, आमदार प्रताप सरनाईक, आमदार मनिषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार भास्कर जाधव, अंबादास दानवे, माजी महापौर शुभा राऊळ, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, संजना घाडी, आनंद दुबे ही शिवसेनेच्या प्रवक्त्यांची यादी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रवक्ते म्हणजे पक्षाची भूमिका, निर्णय, विचारधारा माध्यमांसमोर मांडण्यसाठी पक्षाने नेमलेले नेते. कोणत्याही राजकीय प्रसंगी संबंधित पक्षाच्या प्रवक्त्याने दिलेली प्रतिक्रिया पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते.
राजकीय पक्षाची, नेतृत्त्वाची प्रतिमा माध्यमांमधून जनतेसमोर तयार करण्याची जबाबदारी एकप्रकारे प्रवक्त्यांवर असते आणि शिवसेनेसाठी हेच काम अनेक वर्षांपासून संजय राऊत करत आहेत.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, "संजय राऊत हे शिवसेनेची आक्रमक बाजू मांडणारे वक्ते होते. शिवसेनेत त्यांच्याइतकं आक्रमक आणि टोकाची टीका करणारं दुसरं कोणीही नाही. महापालिका निवडणुका जवळ आहेत. पक्षाची प्रतिमा तयार करण्यात प्रवक्त्यांचा मोठा वाटा असतो. शिवसेनेसाठी हे काम संजय राऊत करत होते. त्यामुळे शिवसेनेला नक्कीच याचा फटका बसेल."
विधानपरिषदेच्या सभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे अनेक वर्षांपासून माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडत आहेत. परंतु त्या सभापती असल्याने त्यांच्यावरही मर्यादा आहेत असं त्यांनी अनेकदा प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
दरम्यान, आता या प्रवक्त्यांपैकी आमदार प्रताप सरनाईक आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत.
संजय राऊतांची जागा कोण घेणार?
शिवसेनेकडे एवढे प्रवक्ते असले तरी संजय राऊत यांच्याप्रमाणे राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणावर सडेतोड बोलणाऱ्या वक्त्याची कमतरता पक्षात आहे असं जाणकार सागंतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/ARVIND SAWANT
वरिष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर सांगतात, "संजय राऊत यांच्या अटकेमुळे उद्धव ठाकरेंवरील बोजा वाढणार. लाईन ऑफ कम्युनिकेशनला फटका बसेल. हे अधिक धोकादायक आहे. कारण संजय राऊत केवळ प्रवक्ते नव्हते तर देशभरातील इतर अलायंस पक्ष आणि नेत्यांशी त्यांचे संबंध होते. पक्ष नेतृत्त्वाचा निरोप, राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकारणाची समज, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, ममता बॅनर्जी अशा राष्ट्रीय नेत्यांशी पक्षाच्या भूमिकेबाबत चर्चा असं लाईन ऑफ कम्युनिकेशन संजय राऊत यांच्यामार्फत होत होतं. त्यांना अटक झाल्याने ही पोकळी भरून काढणं उद्धव ठाकरेंसाठी कठीण आहे."
"भास्कर जाधव, मनिषा कायंदे, किशोरी पेडणेकर, संजना घाडी हे प्रवक्ते मुंबईसह राज्यातील इतर घडामोडींवर भाष्य करू शकतात. परंतु संजय राऊत यांच्यासारखा आवाका असलेला दुसरा प्रवक्ता तयार करण्याचं आव्हान शिवसेनेसमोर आहे,"
"शिवसेना आणि शिवसैनिक सगळ्या प्रसंगाला तोंड द्यायला आणि सामोरं द्यायला खंबीर आहेत," असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.
"अरविंद सावंत हे पक्षाचे दुसरे मुख्य प्रवक्ते आहेत. अजून चार पाच प्रवक्ते आहेत. बाकी प्रवक्ते बोलतील. विभागीय प्रवक्ते सुद्धा करणार आहेत. पक्षाची भूमिका स्वत: पक्ष प्रमुख (उद्धव ठाकरे) मांडतातच ना, ते सुद्धा बोलतील." असंही मनीषा कायंदे यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांची आक्रमक शैली
शिवसेना पक्षाची ओळख ही कायम आक्रमकता, रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई अगदी काही तासात बंद करण्याची क्षमता असलेला पक्ष अशी होती. पण कालांतराने पक्षाच्या भूमिकांमध्ये बदल होत गेला.

फोटो स्रोत, ANI
परंतु संजय राऊत यांचं 'सामना'तील 'रोखठोक' सदर आणि माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडण्याची शैली ही बाळासाहेबांच्या शिवसेनेप्रमाणेच आक्रमक राहिली.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत हे पक्षासाठी केवळ राज्यसभेचे एक खासदार नाहीत. तर संजय राऊत हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेचा चेहरा आहेत.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशीही अत्यंत जवळचे संबंध असणारे म्हणून संजय राऊत यांची ओळख आहे.
शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये ते 1993 पासून कार्यकारी संपादक म्हणून काम पाहत आहेत. बाळासाहेब नसतानाही सामनामधून त्यांची शैली जिंवत ठेवण्यात संजय राऊत यांना यश आलं.
केवळ सामनामध्येच नव्हे तर शिवसेनेची आक्रमक ओळख कायम ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे आणि म्हणूनच संजय राऊत यांची अटक ही शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तुलनेत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कार्यशैली मवाळ असल्याची टीका यापूर्वी अनेकदा झाली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना याची तुलना जहाल आणि मवाळ अशी केली जाते. त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत सत्ता स्थापन केल्याने शिवसेनेवर होणारी ही टीका आणखी टोकाला पोहोचली. हिंदुत्ववादी शिवसेनेने धर्मनिरपेक्ष काँग्रेससोबत सत्तेसाठी हातमिळवणी केली असा आरोप भाजपने केला होता.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








