You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजन विचारेंचं आनंद दिघेंना पत्र- 'गद्दारांना क्षमा नाही असं तुम्ही म्हटलं होतं; मग...'
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-
1. 'साहेब, गद्दारांना क्षमा नाही असं तुम्ही म्हटलं होतं; मग यांना माफ कसं करायचं?'
शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी रविवारी (31 जुलै) ठाण्यातील शिवसैनिकांसह 'मातोश्री' येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
गेल्या जवळपास 30 वर्षांपासून ठाणे शहर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आनंद दिघे यांच्यानंतर ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत आता त्यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांना ठाण्यातून साथ देणारे राजन विचारे एकमेव खासदार आहेत
याच राजन विचारे यांनी सध्याच्या राजकीय गदारोळावर आपल्या भावना व्यक्त करणारं खुलं पत्र आनंद दिघे यांना उद्देशून लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी म्हटलं आहे-
साहेब, आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली ..
असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही ..
शिवसेनेच्या 56 वर्षांच्या इतिहासात विजयाची नांदी आपल्या ठाण्यात झाली होती ना साहेब ...तेव्हा तुमची 56 इंचाची छाती अभिमानाने भरलेली पाहिली होती आम्ही. साहेब ज्या ठाण्यावर तुम्हाला अभिमान होता...महाराष्ट्रात ज्या ठाण्याने आपल्याला पहिल्यांदा सत्ता दिली, आज त्याच ठाण्यावर गद्दारीचा शिक्का बसलाय.
छातीवर नाही तर पाठीवर वार झालाय साहेब…
ह्या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही …हे तुम्हीच बोलला होता ना साहेब ... आणि आज हे दुसऱ्यांदा झालंय ...पण तुम्ही नाही आहात ...मग ह्यांना कसं माफ करायचं आम्ही ...
तुम्ही असता तर काय केलं असतं ?
हे संपूर्ण पत्र न्यूज 18 लोकमतने प्रसिद्ध केलं आहे.
2. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला लखपती केलं, मात्र मी लोकपती आहे- रावसाहेब दानवे
'सत्तार साहेब, तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे घेतले आणि लखपती झाले. मात्र, मी लोकपती आहे, असं विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सिल्लोड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार, अर्जुन खोतकर आदी नेते उपस्थित होते. यावेळी सत्तार यांना उद्देशून बोलताना रावसाहेब दानवेंनी हे विधान केलं.
दानवे यांनी म्हटलं की, "अब्दुल सत्तार साहेब, ज्यांना-ज्यांना तुम्हाला पक्षात आणायचे त्यांना पक्षात घ्या. तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडून पैसे घेतेले असल्याने तुम्ही लखपती झाला आहात. मात्र मी लोकपती असून रुग्णालयात राहून सुद्धा निवडणून आलो.
मी आणि अर्जुन खोतकार किती जवळचे मित्र आहे हे सर्वांना माहीत आहे," असा टोला त्यांनी शिंदे गटात आलेल्या अर्जुन खोतकर यांनाही लगावला.
एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.
3. काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुंबईचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी रविवारी (31 जुलै) रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'सागर' बंगल्यावर भेट घेतली.
मोहित कंबोज हेदेखील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले होते. अस्मल शेख आणि मोहित कंबोज हे एकाच गाडीतून फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याचे झी24तासने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
अस्लम शेख काँग्रेसचा मुंबईतला एक मोठा चेहरा आहे. पण गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या आरोपांमुळे ते चर्चेत आहेत.
किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्या तब्बल 300 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
गेल्या 2 वर्षांत काँग्रेसचे माजी मंत्री अस्लम शेख यांनी मालवणी, मढ या भागात तब्बल 28 फिल्म स्टुडिओंचे कमर्शियल बांधकाम सुरु केलं आहे. यातील 5 स्टुडिओ हे सी.आर. झेड झोनमध्ये आहेत, असे आरोप सोमय्या यांनी केले आहेत.
4. संजय राऊत यांना शिवसेना सोडा असं कोण म्हणत आहे?- प्रवीण दरेकर
'संजय राऊत यांना कोण म्हणत आहे शिवसेना सोडा, शिवसेना जरी सोडली तरी तुम्हाला भाजपमध्ये घेणार नाही,' असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.
शिर्डीमध्ये बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईविषयी मत व्यक्त केलं.
संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भाजप सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्याबद्दल बोलताना दरेकरांनी म्हटलं की, "भाजप हा संस्कारित आणि वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे. मात्र, दुसरीकडे संजय राऊत यांना प्रसिद्धीचा मोह आहे. राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवली."
"ज्या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, त्यांच्या कायदेशीर चौकटीत राहून त्या तपास करत असतात. त्यांना नीट सामोरे जाऊन उत्तरे द्यायला हवीत. शेवटी ज्यांना कर नाही त्यांना डर कशाला," असंही दरेकर यांनी म्हटलं.
टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
5. केरळमधील मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाचा मृत्यू
संयुक्त अरब अमिरातीतून केरळमध्ये नुकत्याच परतलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा मंकीपॉक्समुळे एका दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचा संशय असून या मृत्यूची कारणे तपासली जातील, अशी माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी रविवारी (31 जुलै) दिली.
या रुग्णाच्या घशातील द्रावाच्या चाचणीचा अहवाल मिळणे बाकी आहे. या तरुणाला अन्य कोणताही आजार किंवा आरोग्याची समस्या नव्हती, असे त्यांनी सांगितले. ही व्यक्ती युएईतून 21 जुलै रोजी परतली, पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात विलंब का झाला, याचीही चौकशी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.
मंकीपॉक्सचा हा विशिष्ट विषाणू करोना विषाणूइतका घातक आणि वेगाने पसरणारा नसला आणि तुलनेत त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी असले तरी, निरोगी दिसणाऱ्या या तरुणाचा मृत्यू का झाला, याची कारणे शोधली जात आहेत, असे त्या म्हणाल्या.
लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)